दृष्टीपलीकडची ‘सप्तरंग’ अनुभूती

संतोष भिसे
शुक्रवार, 12 मे 2017

रंगमंचाचा पडदा उघडतो; झगमगत्या प्रकाशात कलाकारांची टीम प्रेक्षकांना दिसते. सूत्रधार वन, टू, थ्री... मोजतो आणि सुरू होतो... सूर आणि स्वरांचा चिंब वर्षाव. एकामागोमाग सुरिली गाणी पेश होत राहतात. ट्रिबल आणि ढोलकीवर सराईत बोटे आदळत असतात. ऑर्गन, किपॅड आणि ऑक्‍टोपॅड साथ देत असतो. हा अनुपम संगीतसोहळा साकारलेला असतो फक्त अंधांनी. सभागृहातील बहुसंख्य प्रेक्षकांना ते मध्यंतरानंतरच कळते. त्यांची ही धडपड अंधातले जगणे आनंदमय करणारी... डोळसांना प्रेरणा देणारी.

सहानुभूतीच्या अपेक्षेने समोर येणारे अंध चेहरे आपण पाहत असतो. मात्र दया नको असे सांगत हिमतीवर व्यावसायिक कलावंताच्या तोडीस तोड कलेचे सादरीकरण करणारे हे सारे कलावंत अभिमान वाटावा अशीच कामगिरी करीत आहेत. त्यांनी अंधत्वालाच आव्हान दिलेय. अंगभूत कलागुणांना वाव देत त्यांनी ‘सप्तरंग’ नावाने ऑर्केस्ट्रा साकारला आहे. ही सारी  मंडळी मिरजेतील माणिकनगरमध्ये राहणारी. त्यांनी भाड्याच्या खोलीत अंधांसाठीचे वसतिगृह चालवले आहे. सर्वधर्मसमभाव अंध-अपंग सेवाभावी संस्थेची त्यांनी स्थापना केलीय. सिद्धनाथ खोत, दावल शेख, राहुल आपटेकर, सचिन कांबळे यांचा यासाठी पुढाकार आहे. आठवीपासून महाविद्यालयीन शिक्षणासाठीच्या अंधांची इथे मोफत निवासाची सोय केली जाते.  सहानुभूतीदारांच्या देणग्यातून वसतिगृहाचा खर्च चालायचा. त्याला हातभार म्हणून वाद्यवृंदाचा संकल्प सर्वांनी केला. तीन वर्षांपूर्वी हा उपक्रम सुरू झाला. आता त्यात सफाईदारपणा आला आहे.  पंचवीसभर प्रयोग झाले आहेत. मकरंद पारवे आणि स्वप्नाली तेरदाळे गायनाची, राहुल आपटेकर, सिद्धनाथ खोत सूत्रसंचालनाची जबाबदारी सांभाळतात. सचिन कांबळे ऑर्गन किपॅड, प्रवीण पाखरे ऑक्‍टोपॅड  वाजवतो. अर्जुन वाघमोडे ढोलकीसम्राट आहे. कय्युम पठाण ट्रिबल वाजवतो. 

दावल शेख संयोजक आहे. भावगीते, भक्तिगीते, मराठी चित्रपट गाणी, हिंदी चित्रपटांतील लोकप्रिय आणि अगदी ताजी गीतेही ते सादर करतात. 
तुडुंब भरलेले प्रेक्षागृह कोणत्याही कलाकाराला हवेहवेसे वाटणारे ! अनेकवेळा सुरवातीला काही गाणी झाली तरी प्रेक्षकांचा प्रतिसाद म्हणावा तितका येत नाही; त्यामुळे गर्दीचा अंदाज येत नाही. त्यावेळी ते शक्कल लढवतात. एखादी नामी शायरी बाहेर काढली जाते; त्यांना टाळ्यांचा कडकडाट मिळतो; मग प्रेक्षकांच्या गर्दीचा आणि  त्यांच्या आवडीनिवडीचा अंदाज घेत कार्यक्रम पुढे सरकतो. ‘सप्तरंग’च्या टिमचा उत्साह वाढवण्यासाठी  आता अनेकजण पुढे आले आहेत. आपणही त्यांना व्यासपीठ देऊन संधी देऊ शकता.
संपर्क पत्ता - सर्वधर्म समभाव अंध अपंग सेवा संस्था, ख्वाँजा वसाहतीशेजारी, शंभर फुटी रस्ता माणिकनगर, मिरज.