सातारकरांना धुळीचा धोका!

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 23 मार्च 2017

सातारा - बेफिकीरीमुळे शांत आणि हवेशीर साताऱ्याची ओळख आता पुसू लागली आहे. आवाज, धुराच्या प्रदूषणाबरोबरच आता पोवई नाका परिसरात हवेतील धुलिकणांनी मर्यादा ओलांडली असल्याचे प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या पाहणीत आढळले आहे. 

सातारा - बेफिकीरीमुळे शांत आणि हवेशीर साताऱ्याची ओळख आता पुसू लागली आहे. आवाज, धुराच्या प्रदूषणाबरोबरच आता पोवई नाका परिसरात हवेतील धुलिकणांनी मर्यादा ओलांडली असल्याचे प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या पाहणीत आढळले आहे. 

राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाने नोव्हेंबर २०१६ मध्ये राजवाडा, मोती चौक व पोवई नाक्‍यावरील हवेतील गुणवत्तेची तपासणी केली. ही तपासणी करणारे यंत्र (एचव्हीएस) या ठिकाणी बसविण्यात आले होते. त्याचे निष्कर्ष प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या पुणे प्रादेशिक प्रयोगशाळेकडून नुकतेच प्राप्त झाले. त्यानुसार शहरातील सर्वाधिक रहदारी असलेल्या पोवई नाक्‍यावर धुलिकणांनी मर्यादा ओलांडली असल्याची माहिती समोर आली आहे. 

हवेतील सल्फर डाय ऑक्‍साईड (एसओ २), नायट्रोजन ऑक्‍साईड (एनओएक्‍स) व हवेतील धुलिकण (आरएसपीएम) हे घटक तपासण्यात आले. वाहनांमधील इंधनाच्या ज्वलनामुळे हवेत दूषित वायू सोडण्यात येतो. या हवेतील दोन्ही ऑक्‍साईडचे प्रमाण मर्यादेत असल्याचे आढळले; तथापि वाहनांच्या वर्दळीमुळे हवेतील धुलिकणांचे प्रमाण मर्यादेबाहेर पोचले असल्याचे आढळले. सल्फर डाय ऑक्‍साईचे प्रमाण पाच मिलिग्रॅम व नायट्रोजन ऑक्‍साईड ११.५ मिलिग्रॅम हे मर्यादेतच आहे. हवेतील धुलिकणांची सर्वसाधारण मर्यादा १०० मिलिग्रॅम पर न्यूटन घनमीटर आहे. पोवई नाक्‍यावर ती ११२ मिलिग्रॅम पर न्यूटन घनमीटर इतकी आढळली आहे. 

दरम्यान, शहरात काही वेळा इमारतीचे बांधकाम, जुन्या इमारती पाडणे, रस्ता डांबरीकरण आदी कामे सुरू असतात. अशा वेळी हवेतील धूलिकणांचे प्रमाण वाढते. प्रदूषण नियंत्रण मंडळ वर्षातून एकदाच आणि तेही विशिष्ट ठिकाणीच हवेतील धूलिकणांचे प्रमाण मोजत असल्याने संपूर्ण शहराचा अंदाज त्यामुळे बांधता येत नाही. तथापि, महानगरे व इतर मोठ्या शहरांमध्ये गंभीर बनत चाललेला प्रदूषणाचा प्रश्‍न साताऱ्यासारख्या निसर्गरम्य शहरांमध्येही गंभीर होऊ पाहतो आहे, ही धोक्‍याची घंटा आहे. वेळीच सावध होऊन आपले सातारा शहर प्रदूषणापासून रोखणे हे सर्वस्वी आपल्या सर्वांच्या हातात आहे! 

धुलिकणांचा दुष्परिणाम 
हवेतील ऑक्‍साईडचे प्रमाण वाढल्यास माणसाला श्‍वसनाचा त्रास, डोकेदुखी, उलटी यांसारख्या विकारांबरोबरच डोळ्यांची चुरचूर, अस्वस्थपणा, घसा खराब होणे यांसारखे त्रास उद्‌भवतात. हवेतील धुलिकण वाढल्याने श्‍वसनांचे विकार, दमा, काम करण्याची शक्ती कमी होणे यांसारखे दृष्य परिणाम संभवतात. 

बचावासाठी उपाययोजना
शहरातील रस्ते चांगले ठेवावेत
रस्त्यांवर कमीतकमी धूळ असावी
डिझेलच्या वाहनांची तपासणी करावी
नागरिकांनी ‘मास्क’चा वापर करावा
धूळ निर्माण होणाऱ्या ठिकाणी प्रतिबंधात्मक उपाय योजावेत

Web Title: satara danger by dust