साताराः कास पठारावर फुलतोय फुलांचा रंगोत्सव

कास पठारावर फुलतोय फुलांचा रंगोत्सव
कास पठारावर फुलतोय फुलांचा रंगोत्सव

सात दिवसांत पाच हजार पर्यटकांची भेट

सातारा: जागतिक वारसा स्थळ असलेल्या कास पठारावर आता फुलांचा रंगोत्सव सुरू होत आहे. तेरड्याचा लाल गालिचा, टूथब्रश ओर्किड, दीपकाडीचे पांढरे शुभ्र फुल, जांभळी मंजीरीची अंकुचिदार फुले, गोलाकार पांढरी शुभ्र गेंदाची फुले, निळीशार आभाळी फुलांनी हे पठार सजू लागले आहे. दिवसेंदिवस हा फुलोत्सव फुलत जाईल. एक सप्टेंबरपासून आजपर्यंत पाच हजारांहून अधिक पर्यटकांनी भेट दिली आहे.

पश्‍चिम घाटातील जैवविविधतेने नटलेले पठार म्हणजे कास पठार. दुर्मिळ फुलांचा येथे बहर येतो. जूनमधील पहिल्या पावसापासूनच फुलझाडे येण्यास प्रारंभ झाला आहे. काही दुर्मिळ फुले जून, जुलैमध्ये आली. सध्या रानहळद (चवर), टूथब्रश, वायतुरा, पंद, आमरीचे विविध प्रकार आदी पांढऱ्या रंगांची फुले येऊ लागली आहेत. मात्र, अद्यापही संपूर्ण पठार फुलांनी अच्छादण्यासाठी थोडा दिवसांचा अवधी आहे. पठारावरील रंगांची खरी जादू असलेले तेरड्याची लाल, गुलाबी रंगाची फुले आता जोमाने येत आहेत. त्यात गेंद, दीपकाडीची पांढरी शुभ्र फुले भर घालू लागली आहेत. कीटकभक्षी वनस्पती म्हणून ओळख असणारी सीतेची आसवे ही निळी फुलेही आकर्षण ठरू पाहत आहेत. निळ्या रंगाची आभास फुलेही लक्षवेधी आहेत. मिकी माऊस व सोनकीची फुलेही काही प्रमाणात येऊ लागली आहेत. सध्या पठारावर तेरड्याचे मोठे ताटवे दिसतात. तेरड्याची गुलाबी, जांभळ्या रंगाची नाजूक फुले अलगद डोलत आहेत. पिवळी धम्मक सोनकीची फुलेही ठुमदारपणे डुलत आहेत.

कुमुदिनी तळ्यातील कुमुदिनी कमळे फुलली आहेत. हे तळे पाहण्यासाठी सुमारे एक किलोमीटर चालत जावे लागत असले तरी संपूर्ण तळ्यात बहरलेली ही फुले आनंददायी ठरत आहेत. इतर फुले दुर्मिळ व कमी प्रमाणातील येतात. त्यामध्ये कीटकभक्षी गवती दवबिंदू (इंडिका डासेरा व इंडिका बर्मानी), कंदिलपुष्प, हनुमान बठाठा, नीलिमा, अबोलिमा, निळी, काळी व पांढरी निसुर्डी, कापरू, भुईशीर्ड, दगड फूल, तुतारी, मॉस, पिंडा आदी फुलांचा समावेश असून, ती पाहण्यासाठी काही काळ वाट पाहावी लागणार असल्याचे कास व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष ज्ञानेश्‍वर आखाडे यांनी सांगितले.

कसे जाल ः सातारा-बामणोली रस्ता. खासगी वाहने, बसची सोय. स्वतःच्या वाहनाने जाणे सोयीचे.
अंतर ः साताऱ्यापासून 21 किलोमीटरवर.
व्यवस्था ः पठाराजवळ निवास वा भोजनाची सोय नाही; राहायचे झाल्यास साताऱ्यात अथवा मार्गावर हॉटेल उपलब्ध.
सूचना ः ऑनलाइन बुकिंग आवश्‍यक. https://kas.ind.in/ या वेबसाईटवर बुकिंग करता येईल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com