सातारा-लातूर मार्गाचे लवकरच चौपदरीकरण

सातारा-लातूर मार्गाचे लवकरच चौपदरीकरण

दोन हजार ६४ कोटी ८० लाख रुपये खर्च अपेक्षित; राष्ट्रीय महामार्गाचा मिळणार दर्जा
कोरेगाव - महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने सातारा-कोरेगाव-म्हसवड-माळशिरस-अकलूज-लातूर या ३०४.७४७ किलोमीटर लांबीच्या राज्य मार्गाचे रूपांतर महामार्गात करण्याचे काम हाती घेतले असून, या कामाची दोन हजार ६४ कोटी ८० लाख रुपये खर्चाची निविदा नुकतीच काढली आहे. त्यामुळे आता या रस्त्याचे चौपदरीकरण होऊन हा रस्ता सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी सुलभ होणार आहे.   

जिल्ह्यातील काही राज्य मार्गांवर वाहनांच्या वर्दळीचे प्रमाण अधिक आहे. जिल्ह्यातून राष्ट्रीय महामार्ग जात असला, तरी जिल्ह्यातील इतर मार्गांवरही वाहतुकीचे प्रमाण जास्त आहे. त्यात सातारा-कोरेगाव- पंढरपूर-लातूर, सातारा-महाबळेश्‍वर (मेढामार्गे)-पोलादपूर, लोणंद-फलटण-बारामती या मार्गांचा समावेश आहे. सध्या महामार्गाच्या सहापदरीकरणाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. अशा परिस्थितीत जिल्ह्यातील राज्यमार्गही सक्षम होणे गरजेचे आहे. या मार्गावरील वाढती वाहतूक, वाहनांची संख्या, रुंदीकरण आदी समस्या सोडविणे गरजेचे आहे. ज्या मार्गावर सर्वाधिक वाहतूक आहे, असे रस्ते राज्याकडून केंद्राकडे हस्तांतरित करून त्यांचा राष्ट्रीय महामार्गात समावेश केला जातो. त्यानुसार सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी पुढाकार घेऊन जिल्ह्यातील तीन रस्त्यांचा महामार्गामध्ये समावेश करण्याबाबत प्रयत्न केले. त्यानुसार जिल्ह्यातील सातारा-कोरेगाव-पंढरपूर- लातूर, सातारा-महाबळेश्‍वर (मेढामार्गे)-पोलादपूर, लोणंद-फलटण-बारामती या तीन मार्गांचा  महामार्गात समावेश होणार आहे. त्यानंतर हे तीन रस्ते राज्याकडून केंद्राकडे हस्तांतरित होतील. 

दरम्यान, सातारा-कोरेगाव-म्हसवड-माळशिरस-अकलूज-टेंभुर्णी-कुर्डुवाडी-मुरूड-लातूर या ३०८.११७ किलोमीटर अंतराच्या रस्त्याचे रूपांतर महामार्गात होणार असून, या कामाची एकूण चार टप्प्यांतील दोन हजार ६४ कोटी ८० लाख रुपये अंदाजित खर्चाची निविदा राज्य रस्ते विकास महामंडळाने नुकतीच नोव्हेंबरअखेर काढली आहे. प्रशासकीयदृष्ट्या हा रस्ता चार विभागांतून जात असल्याने निविदेत त्याचे चार टप्पे पाडले आहेत. 

पहिला टप्पा ८५.६८६ किलोमीटरचा असून हे काम ५३५.१९ कोटी, दुसरा टप्पा ५७.६७८ किलोमीटरचा असून हे काम ३९७.३५ कोटी, तिसरा टप्पा ८२.७० किलोमीटरचा असून हे काम ५५२.९८ कोटी, तर चौथा टप्पा ८२.६८३ किलोमीटरचा असून हे काम ५७९.२८ कोटी रुपयांचे आहे. अशा एकूण ३०४.७४७ किलोमीटर लांबीच्या रस्त्याच्या कामाची दोन हजार ६४ कोटी ८० लाख रुपये खर्चाची निविदा काढण्यात आली आहे. प्रत्येक टप्प्याचे काम पूर्ण करण्याची कालमर्यादा २४ महिने देण्यात आली असून, देखभाल अवधी प्रत्येकी चार वर्षांचा आहे.  

१७ जानेवारी २०१७ रोजी या निविदा उघडण्यात येणार आहेत. होऊ घातलेल्या या महामार्गाची नेमकी रुंदी, महामार्गादरम्यान असलेल्या मोठ्या शहरांतून हा मार्ग जाणार, की बाह्यावळण होणार, आदी माहितीसह सातारा-महाबळेश्‍वर (मेढामार्गे)-पोलादपूर, लोणंद-फलटण-बारामती या मार्गांच्या कामाबाबत अधिक माहिती मिळू शकली नाही.

टोलनाके वाढणार...?
रस्ते केंद्रांकडे हस्तांतरित होणार असल्यामुळे या रस्त्यांचे चार किंवा सहापदरीकरण होणार हे निश्‍चित आहे. परिणामी या रस्त्यांवरून जाणाऱ्या वाहनांना टोल आकारणी होण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे रस्त्यांची सुविधा झाली तरी सोयीसाठी टोलनाक्‍यांची कात्री वाहनचालकांच्या खिशाला बसणार आहे. यावर उपाय काढूनच या मार्गाचे हस्तांतरण व्हावे, अशी अपेक्षा सर्वसामान्य वाहनधारकांतून व्यक्त होत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com