नगरपालिका घेतेय "गळती'चा शोध! 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 31 जुलै 2018

सातारा - आमदन्नी अठन्नी खर्चा रुपैया असे सर्वसाधारण चित्र पालिकांच्या पाणीपुरवठ्यामध्ये असते. सातारा पालिकाही त्याला अपवाद नाही. जलवाहिन्यांतील गळतीतून वाया जाणारे पाणी व पाणी चोरी अशा दोन प्रकारच्या पालिकेच्या पाण्यातील गळत्या शोधून त्यावर उपाययोजना करण्यात येणार आहे. पुण्यातील खासगी कंपनीच्या तंत्रज्ज्ञांनी आज लेखा परीक्षणासाठी साताऱ्यात येऊन प्राथमिक माहिती संकलित केली. 

पाणी उपसा व वितरणातील तफावत शोधणे, पाण्याची नासाडी, गळतीची जागा शोधणे, वितरणातील त्रुटी शोधून नागरिकांना समान पाणी वितरण होण्यासाठी उपाययोजना सुचवण्यासाठी पाण्याचे लेखापरीक्षण (वॉटर ऑडिट) साहाय्यभूत ठरते. प्रत्येक पालिकेने हे लेखापरीक्षण करणे आवश्‍यक आहे. या लेखापरीक्षणासाठी सातारा पालिकेला सुमारे 20 लाख रुपयांचा भार सोसावा लागेल. गेल्या वर्षी पालिकेने लेखापरीक्षण करण्याचा ठराव झाला. "युआयडीएसएसएमटी' योजनेंतर्गत शहरासाठी सुमारे 60 कोटी रुपये खर्चाची सुधारित पाणीपुरवठा योजना राबविण्यात आली. सहा वर्षांनंतरही काम अर्धवट आहे. 

प्राधिकरणाच्या ठेकेदाराने योजनेच्या कामात अनेक गोंधळ घातलेत. या तांत्रिकतेचा फटका शहराच्या काही भागांतील नागरिकांना भोगावा लागत आहे. नव्या योजनेतून पुरेसे पाणी मिळत नाही. गळती व नासाडीतून हजारो लिटर पाणी वाया जाते. काही भागांत ठराविक जलवाहिन्यांवरील कनेक्‍शनना पुरेशा दाबाने पाणी मिळत नाही, अशा तक्रारी आहेत. या योजनेतील तांत्रिक त्रुटी शोधण्यासाठी पालिकेने पाण्याचे लेखापरीक्षण करून घेण्याचा निर्णय घेतला. 

पालिकेचे मुख्याधिकारी शंकर गोरे म्हणाले, ""पाच वर्षांतून एकदा पाण्याचे लेखापरीक्षण करणे आवश्‍यक असते. लेखापरीक्षणात नव्या योजनेचे पूर्ण सर्वेक्षण होईल. हे करताना अत्याधुनिक यंत्रणेचा वापर केला जाणार आहे. अहवाल मिळाल्यानंतर नेमकी उपाययोजना करणे शक्‍य होईल.'' 

आकडे बोलतात... 
- पालिकेच्या पाणीपुरवठा योजनेवर अवलंबून लोकसंख्या - 67 टक्के 
- पालिकेच्या ग्राहकांना प्रतिदिनी दरडोई मिळणारे पाणी - 97.50 लिटर 
- प्राधिकरणाचे पाणी घेणारे पालिका हद्दीतील लोक - 21 हजार 759 
- कास व शहापूर योजनेवर अवलंबून असलेले सातारकर - 65 हजार 232 
- विहिरीचे पाणी पिणारे लोक - 620 
- बोअरचे पाणी पिणारे लोक - 8 हजार 500 
(आधार : नगरपालिकेचा 2010-11 मधील पाणी लेखापरीक्षण अहवाल) 

Web Title: satara municipal Water leakage issue