साताऱ्यातील 28 टक्के नागरिक लठ्ठ !

विशाल पाटील
सोमवार, 25 सप्टेंबर 2017

  • कौटुंबिक आरोग्य सर्वेक्षणाचे निष्कर्ष
  • कुपोषित बालकांचे प्रमाणही चिंताजनक 

सर्वेक्षणातील काही निष्कर्ष 

  • रुग्णालयात प्रसुती होण्याचे प्रमाण : 96.3 टक्‍के 
  • शासकीय रुग्णालयात प्रसूतीचे प्रमाण : 31.4 टक्‍के 
  • घरांमध्ये प्रसूती होण्याचे प्रमाण : 1.6 टक्‍के 
  • खासगी रुग्णालयातील सिझेरियन प्रसूती : 40.2 टक्‍के 
  • प्रथम तिमाही गरोदर तपासणी प्रमाण : 70.1 टक्‍के 

सातारा : दिवसेंदिवस जाडजूड दिसणाऱ्या लोकांचे प्रमाण वाढू लागले आहे. बदलती जीवनपद्धती ही लठ्ठपणामागील प्रमुख कारण बनत आहे. सातारा जिल्ह्यात महिलांमध्ये 19 टक्‍के, तर पुरुषांत 28 टक्के लठ्ठपणाचे प्रमाण आढळले आहे. लठ्ठपणामुळे इतर आजारांना आमंत्रण मिळत आहे ही यातील गंभीर बाब आहे. राष्ट्रीय कौटुंबिक आरोग्य सर्वेक्षणातील (2015-16) निष्कर्षानुसार हे अनुमान काढले आहे. 

केंद्र सरकारच्या राष्ट्रीय आरोग्य व कुटुंबकल्याण मंत्रालयामार्फत राष्ट्रीय कौटुंबिक आरोग्य सर्वेक्षण केले जाते. एक एप्रिल 2015 ते 25 सप्टेंबर 2015 या कालावधीत सातारा जिल्ह्यात सर्वेक्षण झाले. त्यामध्ये 734 कुटुंबातील 74 महिला, 111 पुरुषांची प्रश्‍नोत्तरे घेण्यात आली होती. त्याचे निष्कर्ष नुकतेच जाहीर केले आहेत. यामध्ये साताऱ्यातील महिलांपेक्षा पुरुषांमध्ये लठ्ठपणाचे प्रमाण अधिक आहे. स्त्रियांमध्ये 19.3 टक्के, तर पुरुषांत 28.6 टक्के इतके लठ्ठ असण्याचे प्रमाण आहे. राज्याच्या तुलनेत ते अधिक असून, राज्याच्या सर्वेक्षणात 14.5 टक्‍के पुरुष, तर 11.9 टक्‍के महिला या लठ्ठ असल्याचे समोर आले आहे. वय, उंची व वजन याच्या समीकरणानुसार हे लठ्ठपणाचे प्रमाण ठरविण्यात आले असून, त्यामध्ये 15 ते 49 वयोगटातील व्यक्‍तींचे सर्वेक्षण केले आहे. 

लठ्ठपणाची समस्या भेडसावत असताना कुपोषित बालकांचे प्रमाणही चिंताजनक आहे. जिल्ह्यात 27.8 टक्के बालके कुपोषित आहेत, त्यात ग्रामीण भागात 29.6 टक्के बालकांमध्ये कुपोषण आहे. कुपोषणाची सरासरी ही वय व वजनानुसार काढली आहे. मूल जन्माला येताच त्याला मातेचे दूध देणे अत्यंत आवश्‍यक असते. हे प्रमाण 66.5 टक्‍के आहे. त्यामुळे ते वाढविणे गरजेचे आहे. कुटुंब नियोजनात 62.5 टक्‍के लोक विविध प्रतिबंधक साधनांचा वापर करत आहेत. एक हजार पुरुषांमध्ये एक हजार 34 महिला असा सेक्‍स रेशो, तर जन्मदर हा एक हजारामागे एक हजार 18 इतका आहे. महिलांमध्ये 85.4 टक्‍के, तर पुरुषांमध्ये 99.3 टक्‍के साक्षरता आहे. 
पाच वर्षांखालील 55.2 टक्‍के मुलांमध्ये, 49 टक्‍के महिलांमध्ये, 16.6 पुरुषांमध्ये रक्‍ताक्षयाचे (ऍनिमिया) प्रमाण जास्त आहे. 4.4 टक्‍के महिलांच्या रक्‍तातील साखरेचे प्रमाण जास्त, तर 2.1 टक्‍के पुरुषांमध्ये ते जास्त प्रमाण आहे. 8.1 टक्‍के महिलांमध्ये, तर 14.1 टक्‍के पुरुषांमध्ये उच्च रक्‍तदाब आढळला आहे. कर्करोगाविषयी जनजागृती कमी असून, सरासरी 33 टक्‍के महिलांकडून गर्भाशयाच्या पिशवीची तपासणी केली जाते. 

...असे असते सर्वेक्षण 
केंद्र सरकारच्या आरोग्य व कुटुंबकल्याण मंत्रालयाच्या वतीने राष्ट्रीय स्तरावर वेगवेगळ्या कालावधीत राष्ट्रीय कौटुंबिक आरोग्य सर्वेक्षण केले जाते. ज्याला 'नॅशनल फॅमिली हेल्थ सर्व्हे' असे म्हणतात. हे सर्वेक्षण करण्यासाठी केंद्रीय आरोग्य व कुटुंबकल्याण मंत्रालय यांनी मुंबईस्थित आंतरराष्ट्रीय लोकसंख्या विज्ञान संस्था या संस्थेची नोडल एजन्सी म्हणून नेमणूक केलेली असून, ओआरसी ही अमेरिकास्थित संस्था याकामी तांत्रिक सहकार्य करते. 

    Web Title: satara news 28 percent people of satara district obese