जिल्ह्यामध्ये ५९० शेततळ्यांची कामे पूर्ण 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 27 जुलै 2017

काशीळ - शाश्‍वत पाणी उपलब्धतेसाठी राज्य सरकारने सुरू केलेल्या ‘मागेल त्याला शेततळे योजने’स सातारा जिल्ह्यात दिवसेंदिवस प्रतिसाद वाढत आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी जिल्ह्यातून उद्दिष्टापेक्षा जास्त म्हणजे दोन हजार ८६७ अर्ज प्राप्त झाले असून, आतापर्यंत ५९० शेततळ्यांची कामे पूर्ण झाली आहेत. त्यातील शेतकऱ्यांना अनुदानापोटी दोन कोटी ११ लाख रुपयांचे वितरण करण्यात आले आहे.  

शेती उत्पादनात शाश्‍वतता आणण्यासाठी, तसेच दुष्काळावर मात करण्यासाठी शेततळे उपयुक्त ठरेल या उद्देशाने राज्य शासनाने फेब्रुवारी २०१६ मध्ये ‘मागेल त्याला शेततळे’ ही योजना जाहीर केली आहे. योजनेतील गावांची पैसेवारी ५० पैशांपेक्षा कमी असल्याची अट ऑक्‍टोबर महिन्यात शिथिल करण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व गावांतील शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घेता येणे शक्‍य झाले होते. या योजनेतून जिल्ह्यात दोन हजार शेततळ्यांचे उद्दिष्ट ठेवण्यात आले. मात्र, उद्दिष्टापेक्षा जास्त म्हणजे दोन हजार ८६७ अर्ज प्राप्त झाले. त्यामध्ये दोन हजार ३३६ अर्ज पात्र तर ४८५ अर्ज अपात्र ठरले असून, ४६ अर्जांच्या छाननीचे काम सुरू आहे. पात्र अर्जांपैकी एक हजार ७५५ अर्जांना मंजुरी देण्यात आलेली आहे. एक हजार ७३४ शेततळ्यांची आखणी करून दिली आहे. सध्या ७२५ शेततळ्यांचे काम सुरू असून, ४६५ शेततळ्यांसाठी दोन कोटी ११ लाख रुपयांचे अनुदान वितरीत करण्यात आले आहे. दुष्काळी माण, खटाव, फलटण, खंडाळा, कोरेगाव या तालुक्‍यांसह कऱ्हाड व वाई तालुक्‍यांतून या योजनेला सुरवातीपासून प्रतिसाद चांगला मिळाला होता. मात्र, पश्‍चिमेकडील सातारा, महाबळेश्वर, जावळी, पाटण या तालुक्‍यांत प्रतिसाद मिळाला नव्हता. आता या चार तालुक्‍यांतूनदेखील प्रतिसाद वाढला आहे. त्यामध्ये सातारा तालुक्‍यातून सर्वाधिक प्रतिसाद मिळत असून, महाबळेश्वर, जावळी, पाटण या तालुक्‍यांत कमी प्रमाणात का होईना शेततळ्यांची कामे सुरू झाली आहेत.