औंधला उद्यापासून यमाईदेवीचा जागर 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 20 सप्टेंबर 2017

औंध -  महाराष्ट्रासह उत्तर कर्नाटकातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असणाऱ्या कुलस्वामिनी, मूळपीठ निवासिनी श्री यमाईदेवी व राजवाड्यातील कराडदेवीच्या शारदीय नवरात्र उत्सवानिमित्त गुरुवारपासून (ता. 21) ते एक ऑक्‍टोबरअखेर येथे विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाणार आहे. 

औंध -  महाराष्ट्रासह उत्तर कर्नाटकातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असणाऱ्या कुलस्वामिनी, मूळपीठ निवासिनी श्री यमाईदेवी व राजवाड्यातील कराडदेवीच्या शारदीय नवरात्र उत्सवानिमित्त गुरुवारपासून (ता. 21) ते एक ऑक्‍टोबरअखेर येथे विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाणार आहे. 

श्री यमाईदेवी देवस्थानच्या मुख्य विश्‍वस्त गायत्रीदेवी पंतप्रतिनिधी यांनी ही माहिती दिली. या कार्यक्रमांतर्गत गुरुवारी येथील राजवाड्यात गायत्रीदेवी पंतप्रतिनिधी यांच्या हस्ते देवीची मकरात प्रतिष्ठापना केली जाणार आहे. या वेळी पुण्यहवाचन, मंत्रपुष्पांजली, महाआरती आदी कार्यक्रम होणार आहेत. या वेळी गणेशशास्त्री इंगळे व वसंत देशपांडे हे पुण्यहवाचन करणार आहेत. शुक्रवारी (ता. 22) ते सोमवार (ता. 25) दरम्यान सकाळी व रात्री नियमित महानैवेद्य, महाआरती, मंत्रपुष्पांजली, गजानन बुवा कुरोलीकर यांचे कीर्तन होणार आहे. मंगळवारी (ता. 26) दुपारी 12 वाजता महानैवेद्य, महाआरती, देवीचे पाद्यपूजन, ओटीपूजन, मूळपीठ डोंगरावरील श्री यमाईदेवीचे ओटीभरण, तसेच महानैवेद्य, महाआरती आदी कार्यक्रम होणार आहेत. गुरुवारी (ता. 28) दुपारी 12 वाजता नियमित पूजा झाल्यानंतर दुपारी चार वाजता येथील मूळपीठ डोंगरावर देवीची यात्रा भरविली जाणार आहे. या वेळी हरिजागर, श्री यमाईदेवीची पालखीतून मिरवणूक, पूजा व आरती होईल. गायत्रीदेवी पंतप्रतिनिधी यांच्यासह राजघराण्यातील मान्यवरांच्या उपस्थितीत हे कार्यक्रम होणार आहेत. शुक्रवारी (ता. 29) देवी उत्थापना, घटस्थापना, कुमार- कुमारी पूजन केले जाणार आहे. रविवारी (ता. 1) लळिताचे कीर्तन, आरती, जोगवा मागून गायत्रीदेवी पंतप्रतिनिधी यांच्या हस्ते मानकऱ्याना नारळ, बिदाग्या देऊन गुलाल उधळून उत्सवाची सांगता होणार आहे. 

दसऱ्यानिमित्त 30 सप्टेंबरला शस्त्रपूजन 
विजयादशमी उत्सवानिमित्त शनिवारी (ता. 30) राजवाड्यात शस्त्रपूजन केले जाईल. त्यानंतर सायंकाळी सीमोल्लंघन मिरवणूक निघेल. "श्रीं'ची पालखीतून मिरवणूक काढली जाणार आहे. या वेळी वेशीवर आपटा पूजन होईल. त्यानंतर "श्रीं'ची पालखी परत मंदिरात आणून कराडदेवीतील दरबार हॉलमध्ये गायत्रीदेवी पंतप्रतिनिधी यांच्या हस्ते ग्रामस्थ व मानकऱ्यांना सोने (आपट्याची पाने) देण्याचा कार्यक्रम होणार आहे. 

Web Title: satara news aundh yamai devi