बामणोली खोऱ्यात वाहतुकीचे तीन तेरा

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 25 जुलै 2017

कास - पावसाचे आगार समजल्या जाणाऱ्या जिल्ह्यातील कास, बामणोली व तापोळा खोऱ्यात जुलै महिन्यातील मुसळधार पावसाने वाहतुकीचे तीन तेरा वाजवले आहेत. 

कास - पावसाचे आगार समजल्या जाणाऱ्या जिल्ह्यातील कास, बामणोली व तापोळा खोऱ्यात जुलै महिन्यातील मुसळधार पावसाने वाहतुकीचे तीन तेरा वाजवले आहेत. 

या भागातील कांदाटी खोऱ्यात तर महाबळेश्‍वरपेक्षा अधिक पाऊस पडतो. कोयनेच्या शिवसागर जलाशयाच्या दुतर्फा अनेक छोटी, मोठी गावे वसली आहेत. नदीच्या अलीकडे वाहतुकीसाठी रस्ता व वाहनांची सोय आहे. पण, जावळी व महाबळेश्वर तालुक्‍यांतील नदीच्या पलीकडील गावांना पावसाळ्यात जलवाहतुकीशिवाय पर्याय नाही.  प्रचंड पाऊस व वादळी वाऱ्यामुळे या भागातील वाहतुकीचे महत्त्वाचे साधन असलेल्या लाँच सद्य:स्थितीत बंदच असून लाँच मालकांनी त्या लाँच प्लॅस्टिकच्या कागदाने बंद झाकल्या आहेत. अत्यंत गरजेच्या वेळीच या लाँचचा वापर होत असल्याने जलवाहतुकीचे साधन असलेल्या या बोटी सध्या शटडाउन अवस्थेतच आहेत. 

या विभागात भात लागणीची कामे अंतिम टप्प्यात आहेत. त्यामुळे शेतकरी कामात व्यस्त आहेत. या विभागातील महत्त्वाची ठिकाणे असणारे बामणोली व तापोळा या बाजारपेठ, बॅंक व वैद्यकीय सुविधा असणाऱ्या गावात लोकांना कामानिमित्त यावे लागते. पण, पावसाळ्याच्या दिवसात गरज असेल तरच लोक या ठिकाणी येतात. 

रघुवीर घाटातून कोकणातील खेड या ठिकाणी भागातील लोकांना अत्यावश्‍यक सेवेसाठी जावे लागते. पण, रघुवीर घाटातही दरडी कोसळून हा घाट पावसात बऱ्याच वेळा बंद राहतो. अशा स्थितीत सर्वाधिक जलवाहतुकीवरच अवलंबून असलेल्या या विभागात पावसाळी दिवस लोकांची कसोटी पाहणारे ठरत आहेत. 

सरकारी लाँच १५ ऑगस्टनंतरच...
कांदाटी खोऱ्यात जाण्यासाठी एकमेव साधन असणाऱ्या सरकारी लाँच १५ ऑगस्टनंतरच सुरू होतात. त्यामुळे या खोऱ्यातील लोकांना बामणोली व तापोळा या ठिकाणी येण्यासाठी खासगी लाँचचा आधार असतो. पण, त्याही अशा धोकादायक वातावरणात बंद असल्याने कांदाटी खोऱ्याचा संपर्क तुटलेलाच राहिला आहे.