बॅंडवाल्यांची वरात शासनाच्या दारात!

सातारा - विविध मागण्यांसाठी सातारा जिल्हा बॅंड, बेंजो संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सोमवारी वाद्य वाजवून अनोख्या पद्धतीने आंदोलन करण्यात आले.
सातारा - विविध मागण्यांसाठी सातारा जिल्हा बॅंड, बेंजो संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सोमवारी वाद्य वाजवून अनोख्या पद्धतीने आंदोलन करण्यात आले.

सातारा - त्यांची वाद्ये नेहमीच मंगलमय सूर काढत वातावरणात उत्साह भरता; पण शासनाच्या जाचक नियमांमुळे त्यांचा व्यवसायच नव्हे तर जगणेही अडचणीत आले. त्यामुळेच आज जिल्ह्याधिकारी कार्यालयाच्या दारात क्‍लोरोनेटसह विविध वाद्यांतून आर्त स्वर काढत ‘आम्हालाही जगू द्या...’ अशी साद बॅंड, बेंजो वादकांनी घातली. सारे बॅंड, बेंजो वादक कुटुंबीयासह धरणे धरून बसले. 

शासनाने बॅंड, बेंजो वादकांवर जाचक अटी लावल्याने आमच्यावर उपासमारीची वेळ आली असल्याचा दावा करीत या अटी रद्द कराव्यात या मागणीसाठी आज सातारा जिल्हा बॅंड बेंजो संघटनेद्वारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ‘बिऱ्हाड धरणे आंदोलन’ करण्यात आले. या आंदोलनात सहभागी झालेल्या सर्व वादकांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वाराबाहेर वाद्य वाजवून गाणी गातच मागण्या मांडल्या. जिल्हाधिकारी श्‍वेता सिंघल यांना निवेदन देण्यात आले. या वेळी सातारा जिल्हा बॅंड, बेंजो संघटनेचे अध्यक्ष बाबासाहेब माने, सचिव अशोक जाधव, उपाध्यक्ष बबन जाधव, खजिनदार किरण जाधव, संजय दाभाडे, संतोष माने, गणेश घाडगे, शशिकांत जाधव, हणमंत माने, बबन सय्यद, दीपक जाधव, साहेबराव माने, हिरालाल जाधव आदी उपस्थित होते.  या वेळी आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी मार्गदर्शन केले.

बॅंड, बेंजोवादकांच्या मागण्या
उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांनी (आरटीओ) बॅंड, बेंजोची आधुनिक वाद्ये जुन्या चारचाकीवर बसविण्यास परवानगी द्यावी, बॅंड, बेंजोमुळे नागरी वस्तीवर विपरित परिणाम होत नसतानादेखील शासनाने आणलेले निर्बंध उठवावेत, महाराष्ट्र ध्वनी प्रदूषण मंडळाने बॅंड, बेंजोसाठी स्वतंत्र नियम करावी, पारंपरिक वादक कलाकारांना चांगल्या रुग्णालयात मोफत वैद्यकीय सेवा मिळावी, कलावंतांना किमान वेतनाप्रमाणे मानधन सुरू करावे, वाद्यांसाठी जुन्या वाहनात सोयीनुसार बदल करण्यास परवानगी दिली जावी, आदी मागण्या या निवेदनात करण्यात आल्या आहेत. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com