मातीच्या गोळ्यांना आकार देण्याची गरज

 सिद्धार्थ लाटकर
सोमवार, 9 ऑक्टोबर 2017

पुण्यात नुकत्याच झालेल्या ४४ व्या १३ वर्षांखालील (मिनी) गटाच्या आंतरजिल्हा व राज्य अजिंक्‍यपद बास्केटबॉल स्पर्धेत एकदिवसीय सराव शिबिरातून सातारा जिल्ह्याच्या मुला-मुलींच्या संघाने उज्ज्वल कामगिरी केली. उच्च शिखर गाठण्यासाठी प्रबळ इच्छाशक्तीची आणि प्रयत्नांची गरज असते. ती संघटित असल्यास परिणाम आपोआपाच समोर येतात, याचे उदाहरणच मुला-मुलींच्या यशातून दिसून आले.

पुण्यात नुकतीच ४४ व्या १३ वर्षांखालील (सबज्युनियर) गटाच्या आंतरजिल्हा व राज्य अजिंक्‍यपद बास्केटबॉल स्पर्धा झाल्या. या स्पर्धेत जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करण्यासाठी सातारा जिल्हा बास्केटबॉल संघटनेने स्पर्धेपूर्वीच्या दोन दिवस आधी संघांची निवड केली. युवा प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली दोन्ही संघांचा सराव एकच दिवस झाला. संघ पुण्याला रवाना झाला. साखळी सामन्यांमध्ये मुलांच्या संघाने दोन्ही सामने जिंकले. मुलींनीही या फेरीत अव्वल कामगिरी केली. त्यानंतरच्या फेरीतही दोन्ही संघांनी उत्तम कामगिरी करून उपांत्यफेरीत प्रवेश केला. उपांत्यफेरीत मुलांच्या संघास मुंबई संघाकडून केवळ हाताच्या बोटावर मोजण्याइतका पराभव स्वीकारावा लागला. तर मुलींच्या तोंडातला घास नागपूर जिल्ह्याने हिरावून घेतला. स्पर्धेत मुला-मुलींनी चतुर्थ क्रमांक मिळविला. मुलांच्या संघाची यंदाची कामगिरी यापूर्वीपेक्षा उजवी ठरल्याची चर्चा बास्केटबॉल वर्तुळात आहे. स्पर्धा झाली. संघ जिल्ह्यात परतला. जिल्हा संघाने मिळविलेल्या यशाची जशी-जशी माहिती क्रीडाप्रेमींसमोर येऊ लागली, तसतसे मुला-मुलींचे कौतुक होऊ लागले आहे. 

निश्‍चितच ही मुले-मुली आणीबाणीच्या काळात प्रशिक्षकपदाची जबाबदारी स्वीकारणारे कौतुकास पात्रच ठरत आहेत. खरे तर एक महिन्यापूर्वी राज्यस्तरीय स्पर्धेचा नियोजित कार्यक्रम सातारा जिल्हा बास्केटबॉल संघटनेला समजला होता. या कालावधीत संघटनेकडून ना जिल्हा अजिंक्‍यपद निवड चाचणी घेण्यात आली, ना साधी निवड चाचणी घेण्याचे सोपस्कार झाले. राज्य मिनी अजिंक्‍यपद स्पर्धा जसजशी जवळ येऊ लागली, नेमकी त्याच वेळी जिल्हास्तरीय आंतरशालेय बास्केटबॉल स्पर्धेचा (१४ वर्षांखालील) कार्यक्रमही जवळ आला अन्‌ जिल्हास्तरीय शालेय स्पर्धा संपन्न झाली. यामुळे जिल्ह्यातील खेळाडूंमधील कौशल्य दिसून आले. जिल्हा संघटनेने आणीबाणीच्या काळात राज्य स्पर्धेसाठी निवडलेल्या संघातून तेथील स्पर्धेतील कामगिरीच्या जोरावर दोन खेळाडूंची राष्ट्रीय स्पर्धेसाठी राज्य संघात निवड झाली. आगामी काळात तनय थत्ते प्रमाणे आणखी खेळाडू घडवायचे झाल्यास या सर्व मातीच्या गोळ्यांना आकार देणे आवश्‍यक आहे. त्यासाठी जिल्हा बास्केटबॉल संघटनेने प्रयत्न करणे गरजेचे आहे. 

Web Title: satara news basketball