वीर जिवाजी महालेंचा इतिहास उलगडणार

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 9 ऑक्टोबर 2017

भिलार - ‘होता जिवा म्हणून वाचले शिवा’ या म्हणीतून प्रखर राष्ट्रीय  बाण्याचा वारसा अजरामर करणारे छत्रपती शिवाजी महाराज यांचे अंगरक्षक व एकनिष्ठ सेवक शूरवीर जिवाजी महाले यांची अत्यंत दुर्मिळ तलवार, शिक्के, अप्रकाशित व ऐतिहासिक कागदपत्रे, शिवकालीन नाणी आदी साधने प्रथमच शिवभक्तांसह नागरिकांना पाहण्यास मिळणार आहेत. उद्या (सोमवारी) प्रतापगडावर आयोजित शूरवीर जिवाजी महाले यांच्या ३८२ व्या राष्ट्रीय जन्मोत्सव सोहळ्यात हा दुर्मिळ योग जुळून आला आहे.

वीर जिवाजी महाले यांनी आपल्या प्राणांची आहुती देऊन लाखोंचा पोशिंदा छत्रपती शिवाजी महाराजांचे प्राण वाचविले होते. त्यांच्या बलिदानाचे स्मरण व्हावे यासाठी दरवर्षी विविध ठिकाणी जिवा महाले यांची जयंती साजरी केली जाते. यावर्षी दुर्मिळ साधने व साहित्य प्रथमच शिवभक्तांसह नागरिकांना पाहण्यासाठी मिळणार आहेत. इतिहास संशोधक व लेखक दत्ताजी नलावडे यांच्या संशोधनातून शूरवीर जिवा महाले यांच्यासह त्यांच्या घराण्यातील शूरवीरांचा इतिहास प्रथमच प्रकाशात आला आहे. जिवाजी महाले यांचे वंशज जिवाजी महाले, संतोष सपकाळ-महाले यांच्याकडे हा दुर्मिळ ठेवा आहे. बारामती येथे ते स्थायिक झाले आहेत. त्यांचे मूळ गाव कोंढवली (ता. वाई) आहे. वाई धोम धरणात कोंढवली गाव बुडाले आहे. इतिहास संशोधक व लेखक दत्ताजी नलावडे यांच्या अनेक वर्षांच्या अथक परिश्रमातून शूरवीर जिवाजी महाले व त्यांच्या घराण्यातील शूरवीरांचा प्रखर राष्ट्रीय बाण्याचा इतिहास पुढे आलेला आहे. त्यांनी जिवाजी महाले यांच्या जीवनावर पुस्तक लिहिले आहे. सोमवारी प्रतापगडावर आयोजित करण्यात आलेल्या शूरवीर जिवाजी महाले यांच्या जन्मोत्सव सोहळ्यात महाराष्ट्रासह कर्नाटक, गुजरात आदी राज्यांतील शिवभक्त सहभागी होणार आहेत. कोल्हापूर येथील गिरीश नार्वेकर पथकाचे शिवकालीन मर्दांनी खेळ तसेच व्याख्यान आदी कार्यक्रम आयोजित केले आहेत. शिवाजी महाराज, संभाजी महाराजांना तोलामोलाची साथ देणाऱ्या वीर मावळ्यांचे वंशजही सहभागी होणार आहेत.