रक्त घटकांसाठी हजारोंचा भुर्दंड

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 13 डिसेंबर 2017

सातारा - रक्त घटक मिळण्याची सुविधा निर्माण करण्याची सर्व यंत्रणा जिल्हा रुग्णालयात उपलब्ध असूनही केवळ प्रशासनाच्या दुर्लक्षित कारभारामुळे सर्वसामान्य नागरिकांना रक्त घटकांसाठी हजारो रुपयांचा भुर्दंड सोसावा लागत आहे. या सुविधेसाठी सातारकरांना आणखी किती काळ वाट पाहावी लागणार, असा प्रश्‍न उपस्थित होत आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी या प्रकरणी लक्ष घालण्याची मागणी होत आहे. यापूर्वी आवश्‍यकता नसताना संपूर्ण रक्त रुग्णाला दिल्याने होणारे मौल्यवान असे रक्त वाया जात होते. 

सातारा - रक्त घटक मिळण्याची सुविधा निर्माण करण्याची सर्व यंत्रणा जिल्हा रुग्णालयात उपलब्ध असूनही केवळ प्रशासनाच्या दुर्लक्षित कारभारामुळे सर्वसामान्य नागरिकांना रक्त घटकांसाठी हजारो रुपयांचा भुर्दंड सोसावा लागत आहे. या सुविधेसाठी सातारकरांना आणखी किती काळ वाट पाहावी लागणार, असा प्रश्‍न उपस्थित होत आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी या प्रकरणी लक्ष घालण्याची मागणी होत आहे. यापूर्वी आवश्‍यकता नसताना संपूर्ण रक्त रुग्णाला दिल्याने होणारे मौल्यवान असे रक्त वाया जात होते. 

एका रक्तदात्याच्या रक्ताचा तिघांना फायदा होईल, अशी सुविधा आधुनिक तंत्रज्ञानामुळे उपलब्ध झालेली आहे. वैद्यकीय क्षेत्रातील या क्रांतिकारी संशोधनामुळे रक्ताचा योग्य विनियोग होण्यास मदत झाली आहे. रक्त विघटन प्रक्रियेमुळे रक्तातील लाल रक्तपेशी, प्लाझ्मा व प्लेटलेट हे तीन घटक वेगवेगळे केले जातात. रक्तक्षय, किडनी आणि हृदयविकार, तसेच थॅलेस्मियाच्या रुग्णांना रक्त वाढीसाठी लाल रक्त पेशींची गरज असते. भाजून जखमी झालेल्या, तसेच जलोदराचा आजार असलेल्यांना रक्तातील ‘प्लाझ्मा’ या घटकाची गरज असते, तर डेंगी व कर्करोगाच्या रुग्णांना ‘प्लेटलेट’ आवश्‍यक असतात. या रुग्णांना संपूर्ण रक्ताची गरज नसते. या प्रक्रियेमुळे रुग्णाला आवश्‍यक तो घटक स्वतंत्रपणे देता येतो. त्यामुळे त्यांच्या प्रकृतीतही तातडीने सुधारणा होते. 

सध्या बहुतांश वैद्यकीय अधिकाऱ्यांचा आवश्‍यकतेनुसार ते-ते रक्त घटक देण्यावरच भर आहे. खासगी रक्तपेढीमध्ये त्यासाठी रुग्णाला जास्त पैसे मोजावे लागतात. एका रुग्णाला हजारो रुपये मोजावे लागतात. रुग्णांची ही अडचण ओळखून शासनाने जिल्हा रुग्णालयामध्ये रक्त विघटनाची सोय उपलब्ध करण्याचा निर्णय सुमारे चार वर्षांपूर्वी घेतला. त्यानुसार रुग्णालयात मशिनही आल्या; परंतु त्यासाठी आवश्‍यक असणारी इमारत निधी असूनही तातडीने उभारली गेली नव्हती. त्यामुळे जिल्हा रुग्णालयासाठी आलेल्या मशिन पुन्हा पुण्याच्या मेट्रो ब्लड बॅंकेकडे पाठविण्यात आल्या. 

आता इमारत पूर्ण होऊन दीड वर्ष होऊन गेले आहे. मात्र, मशिन्स मिळालेल्या नाहीत. त्यामुळे जिल्हा रुग्णालयात रक्त विघटन प्रक्रियेला सुरवात झालेली नाही. जिल्ह्यातील रुग्णांच्या आरोग्याशी अत्यंत निगडित असणाऱ्या या बाबीकडे अशी ढिलाई योग्य नाही. योजना येतात, त्यांच्या घोषणा होतात; परंतु अंमलबजावणीच्या पातळीवर बोजवारा अशी काहीशी अवस्था आरोग्य यंत्रणेची झाली आहे. त्यामुळे सर्वसामान्यांच्या पैशाचा अपव्यय होत आहे. दीड वर्ष झाले तरी, अद्याप मशिनरी मागविल्याचेच सांगितले जात आहे. त्यानंतर संबंधित प्रक्रिया सुरू करण्यासाठी आवश्‍यक असणाऱ्या परवानग्यांमध्येच रुग्णालय प्रशासन अद्याप अडकून पडणार आहे. त्यामुळे रुग्णांची हेळसांड होत आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी या प्रकरणात लक्ष घालून रक्त विघटन प्रक्रिया तातडीने सुरू करण्यासाठी प्रयत्न करणे आवश्‍यक आहे. जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनीही त्यासाठी पाठपुरावा करणे गरजेचे आहे.

मशिन्सची मागणी केली आहे
रक्त विघटन प्रक्रियेसाठी आवश्‍यक असलेली इमारत तयार आहे. मशिन्ससाठी मागणी केली आहे. ती आल्यानंतर आवश्‍यक त्या परवानग्या घेऊन प्रक्रिया सुरू करण्यात येईल, असे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्रीकांत भोई यांनी ‘सकाळ’शी बोलताना सांगितले. मात्र, किती वेळ लागेल, या प्रश्‍नाचे उत्तर त्यांना देता आले नाही.

Web Title: satara news blood hospital