सातारा जिल्ह्यातील रक्तपेढ्यांमध्ये रक्ताचा तुटवडा

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 31 मे 2017

सातारा - उन्हाळी सुट्यांमुळे रक्तदान शिबिरे झाली नाहीत. परिणामी जिल्ह्यातील रक्तपेढ्यांना सध्या विविध गटांच्या रक्ताचा तुटवडा जाणवू लागला आहे. तातडीने रक्ताची गरज असलेल्या रुग्णांच्या नातेवाईकांची चांगलीच धावपळ होऊ लागली आहे. विविध सामाजिक संस्था व व्यक्तींनी रक्तदान शिबिरे घेऊन हा रक्ताचा तुटवडा भरून काढण्याचे आवाहन करण्यात येत आहे. 

सातारा - उन्हाळी सुट्यांमुळे रक्तदान शिबिरे झाली नाहीत. परिणामी जिल्ह्यातील रक्तपेढ्यांना सध्या विविध गटांच्या रक्ताचा तुटवडा जाणवू लागला आहे. तातडीने रक्ताची गरज असलेल्या रुग्णांच्या नातेवाईकांची चांगलीच धावपळ होऊ लागली आहे. विविध सामाजिक संस्था व व्यक्तींनी रक्तदान शिबिरे घेऊन हा रक्ताचा तुटवडा भरून काढण्याचे आवाहन करण्यात येत आहे. 

जिल्ह्यात सात रक्तपेढ्या असून, येथील क्रांतिसिंह नाना पाटील जिल्हा रुग्णालयातील रक्तपेढीत सर्व गटाच्या रक्ताचा पुरेसा साठा असल्याचे सांगण्यात आले. तथापि, कऱ्हाडच्या उपजिल्हा रुग्णालयासह उर्वरित ठिकाणी रक्तगटांचा तुटवडा जाणवत आहे. साताऱ्यातील अक्षय ब्लड बॅंकेत ‘ए’ आणि ‘एबी’ तसेच सर्व प्रकारच्या निगेटिव्ह रक्तगटाचा तुटवडा आहे. निगेटिव्ह गटाच्या मोजक्‍याच पिशव्या उपलब्ध असून, त्यांचीही यापूर्वीच मागणी नोंदवण्यात आली आहे. त्यामुळे आम्ही नव्याने आलेल्या मागणीसाठी रक्त उपलब्ध करून देऊ शकत नाही. गरजेनुसार काही ऐच्छिक रक्तदात्यांना फोनवर बोलावून घेऊन त्यांचे रक्त नंतर रुग्णाला उपलब्ध करून देत असल्याचे ‘अक्षय’ बॅंकेतील संपर्क सूत्रांनी सांगितले. 

‘माउली ब्लड बॅंकेचे’ विश्‍वस्त अजित कुबेर यांनी ‘सकाळ’शी बोलताना सांगितले, ‘‘रोज सात ते दहा पिशव्या रक्ताची गरज भासते. सुटीच्या हंगामात रक्तदान शिबिरे न झाल्याने सर्वच गटाच्या रक्ताचा तुटवडा भासत आहे. कसेबसे तीन दिवस पुरेल इतकाच साठा ‘माउली’त आहे.’’

कऱ्हाडच्या उपजिल्हा रुग्णालयाकडेही कोणत्याच गटाचे रक्त सध्या उपलब्ध नसल्याचे रक्तपेढी तंत्रज्ञ कृष्णात दीक्षित यांनी सांगितले.

उन्हाळ्यात महाविद्यालये बंद असतात. लोक सुटीनिमित्त परगावी गेल्याने फारशी रक्तदान शिबिरे होत नाहीत. छोट्या शिबिरातून किरकोळ स्वरूपात रक्त उपलब्ध होते. गरजू रुग्णांना ते कसेबसे देता येते, असे श्री. दीक्षित यांनी स्पष्ट केले. कऱ्हाडच्या गुजर हॉस्पिटल रक्तपेढीतही दोन ते तीन दिवस पुरेल इतकाच मर्यादित रक्तसाठा असल्याचे तेथील विभागप्रमुख विणा ढापरे यांनी सांगितले.

साधारण जूनच्या दुसऱ्या पंधरवड्यात महाविद्यालये सुरू होतील. त्यानंतर शिबिरांतून रक्त उपलब्ध होऊ शकणार आहे. तोपर्यंत कमी-अधिक प्रमाणात जिल्ह्यात तुटवड्याची परिस्थिती कायम राहणार आहे. सध्यातरी विविध सामाजिक संस्था, संघटना, तरुण मंडळांनी रक्तदान शिबिरांच्या माध्यमातून रक्ताची तूट भरून काढण्यासाठी प्रयत्न करणे आवश्‍यक आहे. 
केवळ सातारा जिल्हा रुग्णालयातील पेढी व कऱ्हाडच्या कृष्णा हॉस्पिटलमध्ये सर्व प्रकारच्या गटाचे रक्त उपलब्ध असल्याचे संपर्क सूत्रांकडून सांगण्यात आले. 

रक्तासाठी आणि रक्तदानासाठी येथे संपर्क करा...

सातारा - जिल्हा रुग्णालय रक्तपेढी - (०२१६२) २३७८२७
अक्षय ब्लड बॅंक - २३०७३०
माउली रक्तपेढी - २२२०३१
कऱ्हाड - उपजिल्हा रुग्णालय रक्तपेढी (०२१६४) २२२४५९
कृष्णा हॉस्पिटल रक्तपेढी मलकापूर - २४१५५५ 
गुजर हॉस्पिटल रक्तपेढी कऱ्हाड- २२१८१९