एक मंडळ, एक सीसीटीव्ही..!

एक मंडळ, एक सीसीटीव्ही..!

सातारा - जिल्ह्यातील गणेशोत्सव मंडळांनी सामाजिक कार्याचा मोठा वारसा जपला आहे. ‘आपला सातारा, सुरक्षित सातारा,’ ही संकल्पना प्रत्यक्षात उतरविण्यासाठी पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांनी कार्यकर्त्यांच्या याच सामाजिक जाणिवेला साद घालत ‘एक मंडळ, एक सीसीटीव्ही,’ उपक्रमात सक्रिय सहभाग घेण्याची हाक दिली आहे. युवती व महिलांबरोबरच जिल्ह्याच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देत विविध उपक्रम राबविणाऱ्या ‘सकाळ’नेही पोलिसांच्या या उपक्रमात सक्रिय सहभाग घेण्याचा निर्णय घेतला आहे. ‘सकाळ’चे तनिष्का, यिन तसेच संपूर्ण नेटवर्क या कामासाठी गणेशोत्सव मंडळ व सामाजिक कार्यकर्त्यांना आवाहन करणार आहे. 

सामाजिक जाणिवेतूनच राज्यातील सार्वजनिक गणेशोत्सवाला सुरवात झाली. स्वातंत्र्यपूर्व काळात देशाला स्वातंत्र्य मिळविण्याची चेतना जागविण्यासाठी नागरिकांना संघटित करण्यासाठी गणेशोत्सवाने मोलाची भूमिका बजावली आहे. स्वातंत्र्यानंतरही अनेक सामाजिक उपक्रम राबवत गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांनी आपला सामाजिक वारसा जपला; किंबहुना तो अधिक वाढवला. प्रबोधनाबरोबरच अनेक लोकोपयोगी उपक्रम गणेश मंडळांनी राबविले आहेत. नैसर्गिक आपत्तीमध्ये गणेश मंडळांनी हिरीरिने मदतीची भूमिका घेतली. त्यातून सर्वसामान्य नागरिकांचे जीवन सुसह्य होण्यास मदत झाली आहे. राज्यातील संघटित नागरिक व युवकांची सकारात्मक ताकद गणेश मंडळांच्या या उपक्रमातून अनेकदा दिसून आली आहे. जिल्ह्यातील गणेश मंडळेही सामाजिक उपक्रम राबविण्यात नेहमीच अग्रेसर राहिली आहेत.

गणेश मंडळांच्या याच सामाजिक जाणिवेतून संपूर्ण जिल्हा सुरक्षित करण्यासाठी पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांनी अभिनव उपक्रमाचा संकल्प यंदाच्या गणेशोत्सवाच्या पार्श्‍वभूमीवर केला आहे. मंगळसूत्र हिसकावणे, चोऱ्या, महिला व युवतींची छेडछाड, महाविद्यालयीन युवकांना मारहाण, चौका-चौकांत महिला व युवतींसाठी सुरक्षित वातावरणाचा अभाव, वृद्धांना दिला जाणारा त्रास, विविध कारणांनी होणारी फसवणूक अशा अनेक समस्यांना सध्या सर्वसामान्य नागरिकांना सामोरे जावे लागते. या प्रकारांना आळा घालण्यासाठी पोलिसांचे आपल्या परिने प्रतिबंधाचे व गुन्हेगारांना जेरबंद करण्याचे प्रयत्न सुरूच आहेत. मात्र, त्याला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड मिळाल्यास उपाययोजनांची अधिक प्रभावी अंमलबजावणी होण्यास मदत होऊ शकते.  तंत्रज्ञानामुळे सीसीटीव्ही हे एक प्रभावी माध्यम आपल्याला मिळाले आहे. त्यातून सर्वांसाठी सुरक्षित वातावरणाची निर्मिती होऊ शकते. लोकसभागातून सीसीटीव्ही नेटवर्कची प्रभावी अंमलबजावणी होऊ शकते. यासाठी श्री. पाटील यांनी एक मंडळ एक सीसीटीव्ही या उपक्रमाचे आव्हान जिल्ह्यातील गणेश भक्त व गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांना केले आहे. गणेशात्सवानंतर या सर्व सीसीटीव्हींचे एकत्रित नेटवर्क मॉनिटर करण्याची पोलिसांची तयारी आहे.

गणेश मंडळांनी यंदाच्या गणेशोत्सवात आपल्या परिसरातील नागरिकांच्या, आपल्या कुटुंबाच्या सुरक्षिततेसाठी एक मंडळ एक सीसीटीव्ही या उपक्रमासाठी पुढाकार घेणे आवश्‍यक आहे. त्यातून आपल्या घराबरोबरच सर्वच युवती व महिलांसाठी सुरक्षित वातावरण निर्माण होऊ शकते. डॉल्बी किंवा अन्य कोणत्याही खर्चावर एक वर्ष नियंत्रण आणल्यास या उपक्रमात मदत करणे मंडळांना सहज शक्‍य आहे. जिल्ह्यातील शहरांमध्ये गणेश मंडळांकडून राबविला जाणारा हा उपक्रम संपूर्ण राज्याला आदर्श ठरू शकतो. चला तर, मग आपला सातारा सुरक्षित सातारा करूया. सीसीटीव्ही नेटवर्कसाठी आपला हातभार लावूया.

शहराच्या सुरक्षिततेसाठी सीसीटीव्हीचा प्रभावी उपयोग होऊ शकतो. मंगळसूत्र चोरी, महिला व युवतींची छेडछाड, सार्वजनिक ठिकाणची असभ्य वर्तणूक यावर नक्कीच निर्बंध येतील. गणेशोत्सव मंडळांमध्ये सामाजिक जाणिवेची मोठी ताकद आहे. एखाद्या खर्चावर नियंत्रण ठेवून सीसीटीव्हीसाठी सहज मदत करता येऊ शकेल. सर्व मंडळांचा एकत्रित सहभाग संपूर्ण शहर सुरक्षित करू शकतो. सीसीटीव्हीची ही यंत्रणा पोलिसांकडून कायमस्वरूपी मॉनिटर केली जाईल. गणेशोत्सव मंडळांनी एक मंडळ एक सीसीटीव्ही या उपक्रमात सक्रिय सहभाग द्यावा. जिल्ह्याचा हा यशस्वी उपक्रम संपूर्ण राज्यासाठी आर्दशवत ठरेल.
- संदीप पाटील, पोलिस अधीक्षक

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com