उपचाराच्या नावाखाली कैद्यांचा मानपान! 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 30 जून 2017

सातारा - चांगल्या वैद्यकीय सुविधेअभावी जिल्हा रुग्णालयामध्ये सर्वसामान्य नागरिक नाडला जात असताना जिल्हा कारागृहातील आजारी कैद्यांचा मात्र उपचाराच्या नावाखाली मानपान सुरू आहे. त्यामुळे नागरिकांच्या हक्काच्या अतिदक्षता विभागातील खाटा अडल्या जात असल्याची रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांची तक्रार आहे. 

सातारा - चांगल्या वैद्यकीय सुविधेअभावी जिल्हा रुग्णालयामध्ये सर्वसामान्य नागरिक नाडला जात असताना जिल्हा कारागृहातील आजारी कैद्यांचा मात्र उपचाराच्या नावाखाली मानपान सुरू आहे. त्यामुळे नागरिकांच्या हक्काच्या अतिदक्षता विभागातील खाटा अडल्या जात असल्याची रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांची तक्रार आहे. 

रुग्णालयातील ढिसाळ कारभारामुळे जिल्हाभरातून येणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांना जिल्हा रुग्णालयामध्ये विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे. बाह्यरुग्ण विभागात काही वैद्यकीय अधिकारी वेळेवर हजर नसतात. सायंकाळच्या "ओपीडी'ला तर अनेकजण केवळ नावापुरती उपस्थिती दर्शवत असतात. रुग्णालयामध्ये औषधांची कमतरता आहे. त्यामुळे रुग्णाला पुरेशी औषधे मिळत नाहीत. आंतररुग्ण विभागातही रुग्णांना अनेक समस्या भेडसावतात. एमडी मेडिसीन वैद्यकीय अधिकारी नसल्याने बहुतांश गंभीर परंतु, जिल्हा रुग्णालयातही उपचार होऊ शकतो अशा रुग्णांना दाखल करण्यापूर्वीच पुण्याच्या ससून रुग्णालयाचा रस्ता दाखविला जातो. त्यामुळे आर्थिक तोटा सहन करून एक तर रुग्णाला खासगीत न्यावे लागते किंवा आर्थिक परिस्थिती नसलेल्यांना घरीच जावे लागत असल्याची परिस्थिती आहे. 

रुग्णांच्याबाबतीत नेहमी वापरले जाणारे एमडी मेडिसीन नसल्याचे कारण मात्र, कैद्यांच्याबाबतीत लागू पडत नाही. जिल्हा कारागृहातील कैदी आजारी पडल्यास वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सल्ल्याने त्यांना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात येते. त्यासाठी जिल्हा रुग्णालयात स्वतंत्र कक्षही आहे. मात्र, आजाराच्या स्वरूपापेक्षा कैद्याची राजकीय व आर्थिक स्थिती पाहून त्याला कोठे ठेवायचा, असा निर्णय होताना दिसत आहे. काही "व्हीआयपी' कैदीच अतिदक्षता विभागात अनेक दिवस ठाण मांडून कसे असतात? याचे कोडे ग्रामीण भागातून येणाऱ्या सर्वसामान्य रुग्णांच्या नातेवाईकांना पडले आहे. काही कैदी आरामात हिंडत फिरत असतात, तरीही त्यांना अतिदक्षता विभागातील खाट मिळते. अशा प्रकारांमुळे कायद्याचा धाक उरत नाही. त्यामुळे अनियमितता असल्यास अशा चुकीच्या गोष्टींना जबाबदार असणाऱ्या वरिष्ठ असो वा कनिष्ठ, अशा सर्वांवर वैद्यकीय प्रशासनाने कारवाई करण्याची गरज आहे. 

कैद्यांच्या आजारपणाची तपासणी गरजेची 

जिल्हा रुग्णालयात सर्वसामान्य नागरिकांना मात्र, गरज असूनही वॉर्डमध्ये दाखल केले जात असल्याचा नातेवाईकांचा आरोप आहे. त्यामुळे रुग्णालयात दाखल असलेल्या कैद्यांच्या आजारपणाचीच तपासणी होण्याची गरज असल्याची मागणी होत आहे.