कॉंग्रेसच्या बैठकीत गोरे- नानांचे शड्डू! 

कॉंग्रेसच्या बैठकीत गोरे- नानांचे शड्डू! 

सातारा - कॉंग्रेसच्या जिल्हाध्यक्षपद निवडीवरून एकमेकांविरोधात टीकास्त्र सोडत असलेले आमदार आनंदराव पाटील व माणचे आमदार जयकुमार गोरे यांनी आज कॉंग्रेस भवनात झालेल्या बैठकीत निवडणूक निरीक्षकांसमोरच एकमेकांविरोधात शड्डू ठोकले. एकमेकांच्या शेजारी बसून दोघांनीही तोंडसुख घेतले. या वेळी व्यासपीठावर बसलेले नाना समर्थक स्तब्ध होते, तर गोरेंचे कार्यकर्ते शिट्ट्या अन्‌ टाळ्या वाजवत होते. 

कॉंग्रेसचे निवडणूक निरीक्षक शकील अहमद व शहर प्रभारी तौफिक मुलाणी यांच्या प्रमुख उपस्थितीत आज कर्जमाफी आणि जिल्हाध्यक्ष निवडीसंदर्भात बैठक झाली. या वेळी जिल्हाध्यक्ष पाटील, आमदार गोरे यांच्यासह कार्याध्यक्ष ऍड. विजयराव कणसे, महिला प्रदेश सरचिटणीस रंजनी पवार, धैर्यशील कदम, भीमराव पाटील, नंदाभाऊ जाधव, बाबासाहेब कदम, राहुल घाडगे, दयानंद भोसले, महिला जिल्हाध्यक्षा धनश्री महाडिक, किशोर बाचल यांची प्रमुख उपस्थिती होती. 

जयकुमार गोरे यांनी आनंदराव पाटील यांच्यावर हिंदीतूनच सडेतोड टीका केली. ते म्हणाले, ""पक्षात अनेक जण आले आणि गेले; पण मी कोण आहे, हे सांगण्यासाठी येथे आलो आहे. मी कॉंग्रेसचा सदस्य आहे. नानांच्या दोन टर्ममध्ये सातारा कॉंग्रेसमध्ये ताकद आली; पण कोण कॉंग्रेसचा हे सांगण्याची वेळ आली आहे. पक्षात जे शिल्लक राहिलेत त्यांना बरोबर घेऊन पुढे गेले पाहिजे. कॉंग्रेस पक्ष वाढला पाहिजे हे महत्त्वाचे आहे; पण काही जण जिल्हाध्यक्ष कोण होणार हे सांगत आहेत. त्यांना हे बोलण्याचा अधिकार कोणी दिला? पक्ष कुठे आहे, याचा शोध घ्या. कुणाला गावात किती मते मिळतात हे बघितले आहे. मी पक्षातच आहे, मागे बसलेल्यांना हे माहीत नाही; पण ज्याला कोणाला कायमचा अध्यक्ष व्हायचे आहे, त्यांनी व्हावे; पण आपली उंची किती हेही तपासून पाहा. आपल्याला पृथ्वीराज बाबांच्या उंचीचा सन्मान ठेऊन काम करायचे आहे. त्यामुळे कॉंग्रेसची घटना कोणी मला शिकवू नये.'' 

आनंदराव पाटील म्हणाले, ""मी जिल्हाध्यक्ष व्हायचे ताम्रपत्र घेऊन पक्षात आलेलो नाही; पण तरीही मी पक्षात खूप चांगले काम केले, हे आमच्या आमदारांच्या तोंडून आले, त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. पक्ष वाढविणे हे एकट्या नानाचे काम नाही. अध्यक्ष ज्याला कोणाला व्हायचे ते होऊ देत; पण कोणाची लाज काढू नका.'' 

शकिल अहमद यांनी आपल्या भाषणात गोरे व नानांचे कान धरले. ते म्हणाले, ""पक्ष संघटनेत वाद चालणार नाहीत. पक्ष वाढविण्यासाठी प्रयत्न झाले पाहिजेत. घरातील वाद घरातच ठेवा. पक्ष संघटनेची हानी होईल, असे वागू नका, तसेच फसव्या कर्जमाफीच्या विरोधात पक्षाने जिल्हा, तालुका, गाव व ब्लॉक पातळीवर फलक लावून भाजपचा चेहरा उघडा पाडायचा आहे. त्यासाठी कार्यकर्त्यांनी सज्ज व्हावे.'' या वेळी धैर्यशील कदम, सहदेव अगवणे यांची भाषणे झाली. 

भिलारेंना श्रद्धांजलीचा विसर? 
कॉंग्रेसचे एकेकाळचे जिल्हाध्यक्ष व ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक भि. दा. भिलारे गुरुजी यांचे आज पहाटे निधन झाले. कॉंग्रेस भवनात बैठक सुरू होण्यापूर्वी भिलारे गुरुजींना आदरांजली वाहतील, असे ज्येष्ठ कार्यकर्त्यांना वाटले होते; परंतु तसे झाले नाही. त्यामुळे पदाच्या लालसेने नेते विसरले, अशा शब्दांत ज्येष्ठ कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली. 

""पक्ष कुठे आहे, याचा शोध घ्या. कुणाला गावात किती मते मिळतात, हे बघितले आहे. मी पक्षातच आहे, मागे बसलेल्यांना हे माहीत नाही; पण ज्याला कोणाला कायमचा अध्यक्ष व्हायचे आहे, त्यांनी व्हावे; पण आपली उंची किती हेही तपासून पाहा.'' 
- जयकुमार गोरे, आमदार 

""मी जिल्हाध्यक्ष व्हायचे ताम्रपत्र घेऊन पक्षात आलेलो नाही. पक्ष वाढविणे हे एकट्या नानाचे काम नाही. अध्यक्ष ज्याला कोणाला व्हायचे ते होऊ देत; पण कोणाची लाज काढू नका.'' 
- आनंदराव पाटील, कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com