भाऊगिरी अन्‌ ‘नाना’कळांनी काँग्रेस त्रस्त

भाऊगिरी अन्‌ ‘नाना’कळांनी काँग्रेस त्रस्त

सातारा - जिल्हा काँग्रेसमध्ये अलीकडे कार्यकर्ते कमी अन्‌ नेते जास्त झाले आहेत. प्रत्येकाला आपणच मोठा नेता आहे, असे वाटू लागले आहे. त्यामुळे पक्षाला सक्षम आणि कर्तृत्ववान जिल्हाध्यक्ष हवा, असे कार्यकर्त्यांना वाटत आहे. मात्र, या पदावरूनच काँग्रेसमधील दोन आमदारांत वितंडवाद सुरू आहे. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना सर्व जण मानत असले, तरी त्यांचे ऐकण्याच्या मनःस्थितीत कोणीही नाही. काँग्रेसमधील भाऊगिरी अन्‌ ‘नाना’कळा रोखण्यासाठी बाबांना जालीम उपाय करावा लागेल.

काँग्रेस पक्षाला जिल्ह्यात वैभवशाली परंपरा होती. जिल्ह्यातील काँग्रेसची धुरा माजी उपपंतप्रधान यशवंतराव चव्हाण यांच्यासारख्या नेत्याने भूषविली. त्यांच्या मुशीत अनेक निष्ठावंत कार्यकर्ते जिल्ह्यात घडले. नेता नसताना प्रचार करून सामान्य कार्यकर्त्याला निवडून आणण्याची धमक कार्यकर्त्यांत होती. एवढे कार्यकर्ते तळागाळापर्यंत पोचले होते; पण अलीकडच्या काळात पक्षात नेत्यांची संख्या वाढली आणि कार्यकर्ते कमी झाले आहेत. पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे मुख्यमंत्रिपदाची जबाबदारी आली आणि जिल्ह्यातील काँग्रेसमध्ये चैतन्य निर्माण झाले; पण स्थानिक नेते आपणच ‘बाबा’ असल्यासारखे वागू लागले आणि त्यांचे पाय जमिनीवर आलेच नाहीत. यातून काँग्रेस पक्षात वाद सुरू होऊन ‘मी मोठा की तू मोठा’ अशी अवस्था झाली. अगदी जिल्हाध्यक्षांचा ‘पीए’ देखील आपणच नेता असल्याच्या आविर्भावात कार्यकर्त्यांशी वागतो. आनंदराव पाटील यांच्याकडे काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदाची धुरा गेली १५ वर्षे आहे. ही धुरा संभाळताना त्यांनी पक्षवाढीसाठी प्रयत्न केले; पण त्यांनी ज्यांना ताकद दिली, तेच आता त्यांच्याविरोधात गेले आहेत. सध्या जिल्हाध्यक्षपदावरून आनंदराव पाटील आणि आमदार जयकुमार गोरे यांच्यात शीतयुद्ध सुरू आहे. आमदार गोरे व त्यांच्या समर्थकांना काँग्रेसमधील ‘नाना’कळांना दूर करून पक्षाला समक्ष व कर्तृत्ववान जिल्हाध्यक्ष मिळावा, अशी अपेक्षा आहे. त्यातून काँग्रेसमध्ये आनंदराव पाटील गट विरोधात आमदार जयकुमार गोरे गट असे विभाजन झाले आहे. काँग्रेस माझ्या ताब्यात राहावी, असे गोरेंना वाटते. दुसरीकडे आनंदराव पाटलांना वाटते ‘मी म्हणेल ती पूर्व दिशा पक्षात असावी.’ नव्यांना पदावर संधी मिळाली तरच पक्ष सर्वसमावेशक राहील अन्यथा पक्षाचे तुकडे वेचायला कोण येणार, असा प्रश्‍न आहे. वादातून निर्माण होणारी दुफळी वेळीच रोखली नाही, तर आगामी निवडणुकीत पृथ्वीराज चव्हाण यांना अडचणीचे ठरू शकते. मुळात पृथ्वीराज चव्हाण यांनी पक्षात लक्ष घालून दोन आमदारांसह सर्वांचे कान धरणे गरजेचे आहे. अन्यथा भाऊगिरी अन्‌ ‘नाना’कळांत पक्षाची वाट लागण्यास वेळ लागणार नाही. 

भिलारे गुरुजींना आदरांजली
काँग्रेस भवनात काल (बुधवारी) झालेल्या बैठकीत काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष व स्वातंत्र्यसैनिक उच्चाधिकारी संघटनेचे सदस्य सचिव भि. दा. भिलारे गुरुजी यांना सभा सुरू होण्यापूर्वी श्रद्धांजली वाहण्यात आली होती. त्यानंतर जिल्हाध्यक्ष आनंदराव पाटील भिलारमध्ये गेले. भिलारे गुरुजींना पुष्पचक्र अर्पण करून आदरांजली वाहिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com