कॉंग्रेसच्या हातात भाजपचे कमळ! 

कॉंग्रेसच्या हातात भाजपचे कमळ! 

बिजवडी  - माण तालुका शेतकरी सहकारी खरेदी- विक्री संघाच्या संचालक मंडळाची पंचवार्षिक निवडणूक पुढील आठवड्यात (ता. 24) होत आहे. या निवडणुकीत कॉंग्रेस व भाजपने युती करत राष्ट्रवादीसमोर आव्हान निर्माण केल्याने सत्ता टिकवण्यासाठी राष्ट्रवादीला मोठी कसरत करावी लागणार आहे. राष्ट्रवादीचे वर्चस्व मोडीत काढण्यासाठी कॉंग्रेस- भाजपनेही चांगलीच कंबर कसल्याचे दिसून येत आहे. 

माण शेतकरी सहकारी खरेदी- विक्री संघाची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस व भाजपकडून चर्चा झाली. संचालकांच्या 15 जागांपैकी भाजपकडून पाच जागांची मागणी करण्यात आली होती. त्यात तिन्ही पक्षांत एकमत न झाल्याने 15 जागांसाठी 30 उमेदवार राहिल्याने ही निवडणूक दुरंगी होत आहे. कॉंग्रेसने भाजपला पाच जागा देत आपल्या गोटात घेत सत्ताधारी राष्ट्रवादीसमोर आव्हान उभे केले आहे. या संस्थेचे सोसायटीचे मतदान 66 असून, देवापूर, हिंगणी सामुदायिक शेती सोसायटीचे दोन असे एकूण 68 मतदान आहे. व्यक्तिगत "ब' वर्गातील 342 मतदान आहे. या संस्थेची 1961 मध्ये स्थापना करण्यात येत असून, संस्थेवर वर्षानुवर्षे राष्ट्रवादीची एकहाती सत्ता आहे. या वेळीही ही निवडणूक बिनविरोध होईल, असे वाटत असतानाच राष्ट्रवादी कॉंग्रेस, कॉंग्रेसबरोबर भाजपनेही समान जागांची मागणी केल्याने निवडणूक बिनविरोध होण्याची चर्चा फिस्कटली होती. त्यानंतर कॉंग्रेसने भाजपशी हातमिळवणी करत राष्ट्रवादीसमोर तगडे आव्हान निर्माण केले आहे. 

शेखर गोरे- पोळ गटामध्ये दुरावा 
जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका झाल्यानंतर राष्ट्रवादीतील शेखर गोरे गट व पोळ गट यांच्यात दुरावा वाढत चालला असून, पुढील आठवड्यात होत असलेल्या खरेदी- विक्री संघाच्या निवडणुकीत पोळ गटाने पुढाकार घेतल्याचे, तर शेखर गोरे गट त्यापासून दूर राहिल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे शेखर गोरे गटाचे मतदान कोणाला जाणार, की मतदान बाद करणार, हे पाहणे औत्सुक्‍याचे ठरणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com