काँग्रेस जिल्हाध्यक्षपदाचा तिढा कायम

काँग्रेस जिल्हाध्यक्षपदाचा तिढा कायम

सातारा - काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी राहुल गांधींचे नाव जवळजवळ अंतिम झाले असताना सातारा जिल्हा काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा तिढा मात्र, सुटेनासा झाला आहे. जिल्हाध्यक्षपदावरून दोन आमदारांतील संघर्ष शांत झाला असला, तरी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना सर्वांच्या मताचा जिल्हाध्यक्ष अद्याप सापडलेला नाही. त्यामुळे जिल्हा काँग्रेस अध्यक्षपदासाठी कोणाच्या नावावर एकमत होणार याचीच उत्सुकता आहे.
काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदावरून पक्षात दोन मतप्रवाह निर्माण झाले आहेत. त्यात विद्यमान जिल्हाध्यक्ष आमदार आनंदराव पाटील यांना मानणारा एक, तर दुसरीकडे त्यांना विरोध असणारा एक गट आहे. या वादामुळे खुद्द पृथ्वीराज चव्हाण हे श्री. पाटील यांना जिल्हाध्यक्षपदावरून बदलण्याच्या मानसिकतेत आले. 

श्री. पाटील यांच्या विरोधी गटाला आता आपल्या विचाराचाच जिल्हाध्यक्ष व्हावा, असे वाटत आहे. मुळात काँग्रेसमध्ये सभासद नोंदणीवरून वाद विकोपाला जाऊन अगदी प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्यापर्यंत तक्रारी झाल्या. या तक्रारींचा परिपाक काय तर पृथ्वीराज चव्हाण यांनी दोन्ही गटांना शांत करून सर्वमान्य मध्य काढण्याचा प्रयत्न केला; पण अद्यापपर्यंत एकमत झालेला कार्यकर्ता काँग्रेसला सापडलेला नाही. ज्यांच्या नावाची जिल्हाध्यक्षपदासाठी चर्चा होती त्या- त्या प्रत्येकाशी चर्चा करून पृथ्वीराज चव्हाण यांनी चाचपणी केली; पण काहींनी जिल्हाध्यक्ष होण्यास नकार दिला, तर काहींनी विचार करू, असे सांगून वेळ मारून नेली. दोन मत प्रवाहामुळे अद्यापपर्यंत कोणा एकाच्या नावावर एकमत होऊ शकलेले नाही. आता काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्ष निवडीची प्रक्रिया सुरू होणार आहे. त्यासाठी विद्यमान उपाध्यक्ष राहुल गांधींचे नाव जवळजवळ अंतिम झाले आहे. 

केवळ घोषणेची औपचारिकता आहे; पण राष्ट्रीय अध्यक्ष अंतिम होत असताना सातारा जिल्ह्याच्या अध्यक्षपदासाठी एकमत होताना दिसत नाही. अशा वेळी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना सर्वांनुमते एकमत होणारे नाव शोधून त्यावर निर्णय घेणे गरजेचे आहे. त्यामुळे सध्यातरी काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षाचे नाव गुलदस्त्यात असल्याचे चित्र आहे. 

बाबांची लागणार कसोटी 
काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदासाठीचे नाव हे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हेच निश्‍चित करणार आहेत. त्यांना दोन्ही मतप्रवाहांचा पाठिंबा असणार आहे. त्यामुळे जिल्हाध्यक्ष ठरविताना सर्वमान्य नाव शोधण्यासाठी बाबांची कसोटी लागणार आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com