काळेबेरे निघण्याच्या भीतीने गळचेपी

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 3 नोव्हेंबर 2017

नेत्यांप्रमाणे ‘साविआ’च्या नगरसेवकांचीही दहशत
घंटागाडी, वृक्षारोपणाचे टेंडर सातारा विकास आघाडीने मॅनेज केली असून त्यात झालेली तोडपाणी सभेत जनतेपुढे उघड होऊ नये यासाठी पूर्वनियोजन करून सत्ताधाऱ्यांनी भाजपच्या मदतीने सभा गुंडाळली, असा आरोप विरोधी पक्ष नेते अशोक मोने यांनी केला. ‘साविआ’च्या नेत्यांप्रमाणेच आता त्यांचे नगरसेवकही दमदाटी, दहशत करत आहेत. त्यांना सातारकर जागा दाखवतील, असा टोलाही त्यांनी लगावला.

ते म्हणाले, ‘‘सभागृहात लोकप्रतिनिधी जनतेचे प्रश्न मांडण्यासाठी येतात. दोन महिन्यांतून एकदा सभा असते. त्यावेळी प्रश्न मांडायचे नाहीत का? सातारा पालिकेच्या इतिहासात असे कधीच झाले नाही. विषयपत्रिकेवरील विषय सुरू होण्यापूर्वी नगरसेवक प्रश्न मांडतात हीच परंपरा आहे. परंतु, सत्ताधाऱ्यांना प्रश्न ऐकून घ्यायचे नाहीत. त्यांच्या नेत्यांप्रमाणे नगरसेवकांनाही विरोध सहन होत नाही. विषयपत्रिकेवरील घंटागाडी, हरित क्षेत्राचे टेंडर मॅनेज असून त्यांच्या सदस्यांना मलई चाखायची आहे. त्यामुळे त्यांनी भाजपच्या मदतीने आजची सभा गुंडाळण्याचा घाट घातला होता. विषयावर चर्चा झाली असती तर सातारकरांसमोर सत्ताधाऱ्यांची बोगसगिरी समोर आली असती. ते होऊ नये म्हणून सभा उधळून लावली.’’ 

चर्चा न करताच विषय मंजूर करायचे असतील तर सभा घ्यायची कशाला? स्वतःचे खिसे भरण्यासाठी! आणि ते सातारकरांना कळू नये यासाठी हा खटाटोप सुरू आहे. परंतु, याबाबत जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार देणार आहोत, असा इशाराही त्यांनी दिला.

सातारा विकास आघाडीच्या नेत्यांप्रमाणेच आता त्यांचे नगरसेवकही दहशत करू लागले असून सातारकरांना वेठीस धरत आहेत. त्याला नगरविकास आघाडीचा कडाडून विरोध राहील. सभापती वसंत लेवे स्वार्थी असून ‘नविआ’ने त्यांच्या पत्नीला नगराध्यक्ष केले. परंतु, स्वार्थ साधून झाला की ते बदलले. स्वार्थापोटी आघाडी बदलताना स्वत:च्या ज्येष्ठ बंधूंचे स्मरण त्यांनी ठेवायला पाहिजे होते. त्यांनी केलेली धक्काबुक्की दुर्दैवी असून त्याविरोधात पोलिसांत तक्रार देणार असल्याचेही मोने यांनी स्पष्ट केले. यावेळी नगरसेवक शेखर मोरे-पाटील, रवींद्र ढोणे, शकील बागवान, लीना गोरे, दीपलक्ष्मी नाईक आदी नगरविकास आघाडीचे सदस्य उपस्थित होते.

चर्चा न करताच विषय मंजूर करायचे असतील तर सभा घ्यायची कशाला? स्वतःचे खिसे भरण्यासाठी! आणि ते सातारकरांना कळू नये यासाठी हा खटाटोप सुरू आहे.
- अशोक मोने, विरोधी पक्षनेते

Web Title: satara news corporator politics