रस्ता रुंदीकरणाच्या जागेत शंभर ठिकाणी अतिक्रमणे

सातारा - अशा पद्धतीने पेव्हर टाकून इमारतीपुढील जागेत कट्टे बांधले जातात. त्यामुळे सार्वजनिक उपयोगासाठी या जागेचा वापर करता येत नाही.
सातारा - अशा पद्धतीने पेव्हर टाकून इमारतीपुढील जागेत कट्टे बांधले जातात. त्यामुळे सार्वजनिक उपयोगासाठी या जागेचा वापर करता येत नाही.

सातारा - नव्या बांधकामात पत्र्याचे अडोसे उभे करून रस्ता रुंदीकरण (रोड मार्जिन) व सामासिक (साईड मार्जिन) अंतरात बांधकामे होत आहेत.

कायद्यानुसार विकसकाला सोडावी लागणारी ही जागा पालिकेच्या मालकीची असते. शहरात अशा शंभराहून अधिक मिळकतींमध्ये विकसकाने रस्ता रुंदीकरण व सामासिक अंतरात अतिक्रमण केलेले दिसते. अशा जागांवर केलेल्या बांधकामांवर कारवाई करून पालिकेने रिक्‍त जागा सार्वजनिक उपयोगासाठी ताब्यात घेण्याची गरज आहे.

सातारा नगरपालिका क्षेत्र हे जुन्या गावठाणापुरते मर्यादित आहे. या क्षेत्रातील बहुतांश मिळकती या आता जुन्या व जीर्ण झाल्याने त्यांचा विकास केला जात आहे. वाडे, जुन्या चाळी, बैठी घरं पाडून त्या ठिकाणी नव्या इमारती उभ्या राहात आहेत. हे करताना नियमानुसार सोडाव्या लागणाऱ्या जागेवर विकसक अतिक्रमण करून पायऱ्या, जिने, पेव्हरचा कट्टा, पत्र्याच्या शेड उभे करताना दिसतात. सातारा शहराची सुधारित विकास योजना २००१ मध्ये मंजूर झाली. 

त्यानुसार वाहतुकीच्या दृष्टीने आवश्‍यक बाब म्हणून शहरात रस्ता रुंदीकरणासाठी क्षेत्र निश्‍चित करण्यात आले. या योजनेत दाखवलेल्या ठिकाणी प्रमुख रस्त्यांपासून नियोजित रस्ता रुंदीकरणासाठी एक मीटर अंतर सोडणे बंधनकारक आहे. त्याशिवाय एक मीटर क्षेत्र सामासिक अंतर म्हणून सोडावे लागते. हे प्रत्येकावर बंधनकारक असले तरी साताऱ्यात उलटे चित्र आहे. बांधकाम सुरू करण्यापूर्वी जागा विकसक आपल्या पूर्वीच्या जागेच्या हद्दीवर, दर्शनी भागात पत्रे उभे करून आडोसा निर्माण करतो.

मालमत्तेच्या संरक्षणासाठी हे आवश्‍यक असले तरी त्या इमारतीचे बांधकाम पूर्ण झाल्यानंतरच त्या बांधकामातील त्रुटी लक्षात येतात. तोपर्यंत उशिर झालेला असतो. नियमानुसार विकसकाने या जागेचा ताबा पालिकेला दिलेला असतो. मात्र, प्रत्यक्ष जागेवर नियोजित रस्ता रुंदीकरणात व सामासिक अंतरात बांधकाम करून अतिक्रमण केले जाते. त्याकडे पालिका प्रशासन डोळेझाक करत आहे. त्यामुळे साताऱ्यातील खण आळीसारखे बाजारपेठेचे प्रमुख रस्ते नवीन बांधकामे झाली तरीही वर्षानुवर्षे आहे तेवढेच राहतात. त्यामुळे नागरिकांना पार्किंगचा प्रश्‍न, वाहतूक कोंडीसारख्या समस्यांना तोंड द्यावे लागते.

रस्ता रुंदीकरण व सामासिक अंतरात धडधडीतपणे अतिक्रमणे होत आहेत. पालिका प्रशासन ध्रृतराष्ट्राच्या भूमिकेत कर्मचाऱ्यांना पाठीशी घालत आहे. एका निरीक्षणानुसार सातारा शहरात १०० हून अधिक बांधकामांमध्ये विकसकांनी अतिक्रमणे केल्याचे दिसते. 
- सुशांत मोरे, सामाजिक कार्यकर्ते, सातारा  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com