शाळाविकासासाठी आता ‘सीएसआर’

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 15 जुलै 2017

सोयी- सुविधा वाढवण्यासाठी कंपन्यांनी पुढे यावे - संजीवराजे निंबाळकर
सातारा - प्राथमिक शिक्षणातील पायाभूत सुविधा वाढविण्यासाठी जिल्ह्यातील कंपन्या, बॅंकांचा ‘सीएसआर’ मिळविण्यासाठी जिल्हा परिषदेने एक पाऊल टाकत सहविचार सभा घेतली. यापुढे हे काम वाढवून प्राथमिक शाळा, अंगणवाड्यांना शैक्षणिक सुविधा देण्यासाठी समिती नेमून त्यामार्फत ‘सीएसआर’मधून विकासकामे करण्याचा निर्णय पदाधिकारी, अधिकारी, कंपन्यांच्या प्रतिनिधींनी काल घेतला.

सोयी- सुविधा वाढवण्यासाठी कंपन्यांनी पुढे यावे - संजीवराजे निंबाळकर
सातारा - प्राथमिक शिक्षणातील पायाभूत सुविधा वाढविण्यासाठी जिल्ह्यातील कंपन्या, बॅंकांचा ‘सीएसआर’ मिळविण्यासाठी जिल्हा परिषदेने एक पाऊल टाकत सहविचार सभा घेतली. यापुढे हे काम वाढवून प्राथमिक शाळा, अंगणवाड्यांना शैक्षणिक सुविधा देण्यासाठी समिती नेमून त्यामार्फत ‘सीएसआर’मधून विकासकामे करण्याचा निर्णय पदाधिकारी, अधिकारी, कंपन्यांच्या प्रतिनिधींनी काल घेतला.

जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाच्या वतीने प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमांतर्गत छत्रपती शिवाजी सभागृहात सामाजिक उत्तरदायित्व (सीएसआर) संदर्भात सहविचार सभेचे आयोजन केले होते.

अध्यक्ष संजीवराजे नाईक- निंबाळकर, उपाध्यक्ष वसंतराव मानकुमरे, शिक्षण सभापती राजेश पवार, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य प्रशासन) सत्यजित बडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (महिला व बालकल्याण) जावेद शेख, प्राथमिक शिक्षणाधिकारी पुनीता गुरव उपस्थित होत्या. श्री. संजीवराजे म्हणाले, ‘‘प्राथमिक शाळांमध्ये भौतिक, शैक्षणिक साहित्यांतून बदल करण्यासाठी कंपन्या मदत करत असतात; परंतु ती मदत ठराविक शाळांना मिळत आहे.

दुर्गम शाळांपर्यंतही मदत पोचण्यासाठी कंपन्यांना पुढे आले पाहिजे. जिल्हा परिषदेमार्फत कऱ्हाड, पाटण, सातारा या तीन तालुक्‍यांत इंग्लिश मीडियम शाळा सुरू करण्याचा प्रयत्न सुरू आहेत. कंपन्यांना इतर शाळांचा दर्जा सुधारण्यासाठी प्रयत्न केल्यास त्यातून सर्वसामान्यांच्या मुलांना दर्जेदार शिक्षण मिळेल. शाळांमध्ये योग्य बदल घडण्यासाठी सर्वांना एक सारखी मदत मिळण्यासाठी ‘सीएसआर’ची रक्‍कम खर्च करण्याबाबत समिती नेमली जाईल. त्यामध्ये पदाधिकारी, अधिकारी, कंपन्या, बॅंकांचे प्रतिनिधी घेतले जातील. ही समिती ठरवेल, त्यानुसार कामे केली जातील.’’

असा आहे डोलारा
जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळा दोन हजार ७१३ असून, त्यात एक लाख ४८ हजार ९२९ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. ६१८ शाळा आयएसओ, एक हजार ५६२ शाळांत डिजिटल क्‍लासरूम, ११५ शाळा टॅबयुक्‍त, तर १८०० शाळांमध्ये संगणक सुविधा आहेत. आठ हजार ६३२ शिक्षण अध्यापनाचे काम करत आहेत. जिल्ह्यात चार हजार ८१० अंगणवाड्या आहेत.

...या सुविधा हव्यात
सुविधा    खर्च (प्रति वर्ग)

शाळांस ३१७ वर्ग खोल्या    सात लाख 
शाळा दुरुस्ती, रंगरंगोटी    तीन लाख 
संगणक, डिजिटल क्‍लासरूम    सव्वा लाख 
स्वच्छतागृह, दुरुस्ती    तीन लाख
सांस्कृतिक हॉल, वाचनालय    १५ लाख
प्रयोगशाळा, शैक्षणिक साहित्य    ५० हजार
शारीरिक, बौद्धिक खेळणी    ५० हजार
मध्यान्ह भोजन, शुद्ध पाणी    अडीच लाख
बायोमेट्रिक, सौरऊर्जा संयंत्र    सव्वा लाख
 

‘सकाळ’चा पुढाकार
जिल्हा परिषदेच्या अनेक शाळांनी गुणवत्ता, भौतिक दर्जा सुधारण्यात यश मिळविले, अशा शाळांची लेखमालिका ‘सकाळ’ने नुकतीच प्रसिद्ध केली. आता शैक्षणिक साहित्य, इन्फ्रास्ट्रक्‍चरची आवश्‍यकता आहे, अशा शाळांना ‘सीएसआर’मधून मदत मिळावी, अशी आग्रही भूमिका मांडली होती. त्यादृष्टीने जिल्हा परिषदेने प्रयत्न सुरू केले.