धरणग्रस्तांनी मोर्चा काढून मारला ठिय्या

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 24 जानेवारी 2018

सातारा - जमीन आमच्या हक्काची, नाही कोणाच्या बापाची, धरण आमच्या हक्काचे, नाही कोणाच्या बापाचे.. आमच्या मागण्या मान्य करा, नाही तर खुर्च्या खाली करा...अशी घोषणाबाजी करत कोयना धरण विस्थापितांनी ५८ वर्षांनंतर शंभर टक्के पुनर्वसनासह इतर मागण्यांसाठी आज येथील जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू केले.  

सातारा - जमीन आमच्या हक्काची, नाही कोणाच्या बापाची, धरण आमच्या हक्काचे, नाही कोणाच्या बापाचे.. आमच्या मागण्या मान्य करा, नाही तर खुर्च्या खाली करा...अशी घोषणाबाजी करत कोयना धरण विस्थापितांनी ५८ वर्षांनंतर शंभर टक्के पुनर्वसनासह इतर मागण्यांसाठी आज येथील जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू केले.  

गांधी मैदानावरून कोयना धरणग्रस्तांच्या मोर्चास ‘श्रमिक’चे राज्य कार्यालय प्रमुख संपत देसाई यांच्या नेतृत्वाखाली सुरवात झाली. मोर्चा मोती चौकातून खालच्या रस्त्याने पोलिस मुख्यालयमार्गे पोवई नाका व तेथून जिल्हाधिकारी कार्यालयावर आला. येथे मोर्चाचे सभेत रूपांतर होऊन धरणग्रस्तांनी ठिय्या आंदोलन सुरू केले. यावेळी बोलताना संपत देसाई म्हणाले, ‘‘कोयनेच्या आधारावर महाराष्ट्राचा विकास साधला, त्या कोयना धरणग्रस्तांना मात्र, देशोधडीला लावले आहे. हा आवाज दडपण्याचा कोणी प्रयत्न केल्यास कोयनेचा वाघ व वाघिणी तुम्हाला धडा शिकविल्याशिवाय राहणार नाहीत. १९६० मध्ये धरण पूर्ण झाले. अनेक जिल्ह्यात येथील धरणग्रस्त विस्थापित झाले. सर्व सरकारांनी आम्हाला फसविले, आता फसणार नाही. आमच्या न्याय्य मागण्या मान्य करून घेणार आहोत. डॉ. भारत पाटणकर, श्रमिक मुक्ती दल जे आंदोलन करते ते यशस्वी होते, हा इतिहास आहे.’’

यावेळी दिलेल्या निवेदनात श्रमिक मुक्ती दलाने म्हटले की, कोयना धरणग्रस्तांचे रखडलेले पुनर्वसन तातडीने पूर्ण करा, सह्याद्री व्याघ्र प्रकल्पामुळे बाधित होण्याची वेळ धरणग्रस्तांवर आली आहे. ही पुनर्वसनाची प्रक्रिया तातडीने पूर्ण करावी. कोयना व्याघ्र प्रकल्प बफर आणि कोअर झोनमधील पर्यावरण विकास समिती कायद्याच्या आराखड्याप्रमाणे चालल्या पाहिजेत. पण, तसे न होता संबंधित निधी पडूनच राहात आहे. त्यासंदर्भात ठोस निर्देश देवून गावांच्या विकासाची वाट मोकळी करावी, भूसंपादन पुनर्वसन कायद्याच्या सर्व तरतुदी लागू करा, धरणग्रस्तांच्या सर्व वसाहती अधिकृत म्हणून जाहीर करा, प्रकल्पग्रस्तांच्या दोन व्यक्तींना खासगी व सहकारी कारखान्यांमध्ये नोकऱ्या द्या आदी मागण्यांचा समावेश आहे. या आंदोलनात हरिश्‍चंद्र दळवी, प्रकाश साळुंखे, सीताराम जंगम, मालोजीराव पाटणकर, चैतन्य दळवी, संतोष गोटल, दाजी शेलार, संजय लाड यांच्यासह कोयना धरणग्रस्त महिलांसह सहभागी झाले आहेत. 

Web Title: satara news Dam affected rally