नवा ‘वादा’ धनगर समाजाला रुचणार का?

नवा ‘वादा’ धनगर समाजाला रुचणार का?

सातारा - नागपूरमध्ये झालेल्या धनगर आरक्षण निर्णायक मेळाव्यामध्ये मुख्यमंत्र्यांनी आरक्षणाच्या मुख्य मागणीबाबत कोणतेही ठोस आश्‍वासन दिले नाही. त्यामुळे आरक्षण अंमलबजावणी अजूनही कोसो दूर असल्याचे पुन्हा सिद्ध झाले आहे. त्यामुळे भाजपला आगामी काळात समाजाच्या रोषाला सामोरे जावे लागणार आहे. कालच्या मेळाव्यात मुख्यमंत्री व्यासपीठावर येताच लावण्यात आलेले ‘क्‍या हुआ तेरा वादा’ हे गाणे ऐकल्यावर मुख्यमंत्र्यांचा चेहरा जसा पाहण्यासारखा झाला, तसाच मुख्यमंत्र्यांनी या मेळाव्याच्या निमित्ताने दिलेला नवा ‘वादा’ धनगर समाजालाही रुचलेला नाही. कालच्या कथित निर्णायक मेळाव्याचे हेच फलित मानावे लागेल.

अनुसूचित जमातीच्या आरक्षणाची अंमलबजावणी करण्याची धनगर समाजाची बऱ्याच वर्षांपासून मागणी होत होती. विधानसभा निवडणुकीपूर्वी समाज त्यासाठी आक्रमक झाला होता. पंढरपूर ते बारामती पदयात्रा झाल्यानंतर बारामतीमध्ये बेमुदत उपोषण सुरू करण्यात आले. समाजाच्या या आक्रोशाचा आपल्या सत्तेसाठी लाभ करून घेण्यासाठी तत्कालीन विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस व भापजचे पदाधिकारी बारामतीत गेले. सत्तेत आल्यावर १५ दिवसांत पहिल्या कॅबिनेट बैठकीत आरक्षणाची अंमलबजावणी करण्याचे आश्‍वासन फडणवीस यांनी उपोषणकर्त्यांना दिले. त्यानंतर समाजाने उपोषण मागे घेतले. त्यामुळे तत्कालीन सत्ताधाऱ्यांविरोधात समाजाची लाट उभी राहिली. त्याचा फायदा भाजपला नक्कीच झाला.

मात्र, सत्तेत येऊन तीन वर्षे उलटली, शेकडो कॅबिनेट बैठका झाल्या, तरी आरक्षण अंमलबजावणीचा प्रश्‍न मार्गी लागला नाही. टाटा विकास संशोधन संस्थेमार्फत अहवाल तयार करण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी घेतला. त्याच्या वैधतेबाबतही समाजातून प्रश्‍न उपस्थित होत आहेत. तो विषय वेगळा. मात्र, संबंधित संस्थेकडूनही अद्याप अहवाल आलेला नाही. असे असताना समाजातील सत्तेतील नेते मात्र, त्याबाबत काहीच आवाज उठवताना दिसत नव्हते. त्यामुळे जनतेत असंतोष खदखदत होता. मल्हार क्रांतीच्या माध्यमातून माण तालुक्‍यातील दहिवडी येथे मोर्चा काढून या असंतोषाला वाट मिळाली. 

आरक्षणाबाबत खदखद वाढत असताना धनगर आरक्षण कृती समितीचे अध्यक्ष खासदार डॉ. विकास महात्मे यांनी मार्चमध्ये मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. या वेळी नोव्हेंबरपर्यंत अहवाल देण्याच्या सूचना फडणवीस यांनी केल्या. त्यामुळे समाजाचे डोळे टिसच्या अहवालाकडे लागले होते. मात्र, टिसचा अहवाल येण्यापूर्वीच डॉ. महात्मे यांनी काल धनगर आरक्षण निर्णायक मेळावा घेतला. निर्णय घेण्याची जबाबदारी असणाऱ्यांनीच निर्णायक मेळावा का घ्यायचा, असा प्रश्‍न उपस्थित करत समाजातून त्याला विरोध होऊ लागला होता. या विरोधाच्या पार्श्‍वभूमीवर मेळाव्यात आरक्षणाबाबत ठोस निर्णय होईल, अशी अपेक्षा समाजाला होती. मात्र, काल ती फोल ठरली. सोलापूर विद्यापीठाच्या नामांतराची घोषणा करून मुख्यमंत्र्यांनी आरक्षणाच्या मुद्याला बगल दिली. नोव्हेंबरपर्यंत अहवाल येईल असे म्हणणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी काल डिसेंबरचा वायदा सांगितला. त्यातही अहवाल आल्यावर केंद्राकडे प्रस्ताव पाठवू असे मुख्यमंत्री म्हणाले. त्यामुळे आरक्षणाचा चेंडू केंद्राच्या कोर्टात ढकलून मुख्यमंत्री मोकळे होणार, असे समाजबांधवांना वाटत आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांचा कालचा वादा समाजाला काही रुचलेला नाही. कालच्या मेळाव्यात लावलेल्या ‘क्‍या हुआ तेरा वादा’ या गाण्यावर उपस्थितांमधून आलेली प्रतिक्रिया व संयम बाळगा म्हणणाऱ्या मंत्री महादेव जानकरांना झालेला विरोध नागरिकांची मानसिकता दर्शवत आहे. याची दखल भाजपच्या धुरिणांनी घेणे आवश्‍यक आहे. आता केवळ आश्‍वासनांवर भागणार नाही, हे त्यांनी ध्यानात घेणे गरजेचे आहे; अन्यथा त्यांना राज्यातील धनगर समाजाच्या रोषाला सामोरे जावे लागणार हे निश्‍चित.

भाजपसाठी डोकेदुखी ठरणार
राज्याने प्रस्ताव पाठवून धनगर समाजाचे आता समाधान होणार नाही. अंमलबजावणीचा निर्णयच समाजाचा रोष थांबवू शकतो. केंद्रामध्ये मात्र धनगर आरक्षणाबाबत सकारात्मकता दिसत नाही. आरक्षणाबाबत झालेल्या चर्चेत धनगड व धनगर एक नसल्याचे आदिवासी मंत्री ज्युएल ओराम यांनी स्पष्ट केले होते. खासदार सुप्रिया सुळे व शिवाजीराव आढळराव-पाटील यांनी विचारलेल्या प्रश्‍नावरील चर्चेत धनगर समाजाचा अनुसूचित जातीमध्ये समावेश असल्याच्या दाव्याबाबत ओराम यांनी नकारघंटाच वाजविली होती. राज्याकडून प्रस्ताव आल्यावर बघू असे म्हणत त्यांनी वेळ मारून नेली होती. त्यामुळे केंद्र या प्रश्‍नाबाबत कितपत अनुकूल राहील, हा प्रश्‍नच आहे. आरक्षण देण्याचे आश्‍वासन भाजपसाठी डोकेदुखीचा मुद्दा ठरणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com