‘चायना’ऐवजी ‘स्वदेशी’ कंदिलांकडे कल

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 12 ऑक्टोबर 2017

सातारा - प्रकाशाच्या उत्सवाला लखलखीत दिव्यांच्या साथीत न्हाऊन टाकण्यासाठी बाजारपेठेत विविध रंगांतील आणि आकारांच्या आकाशकंदिलांची रेलचेल झाली आहे. मात्र, बहुतेक नागरिकांनी ‘चायना’कडे पाठ फिरविली असून, अस्सल स्वदेशी पद्धतीचे व बनावटीचे आकाश कंदील घेण्याकडे कल वाढला आहे. 

सातारा - प्रकाशाच्या उत्सवाला लखलखीत दिव्यांच्या साथीत न्हाऊन टाकण्यासाठी बाजारपेठेत विविध रंगांतील आणि आकारांच्या आकाशकंदिलांची रेलचेल झाली आहे. मात्र, बहुतेक नागरिकांनी ‘चायना’कडे पाठ फिरविली असून, अस्सल स्वदेशी पद्धतीचे व बनावटीचे आकाश कंदील घेण्याकडे कल वाढला आहे. 

मध्यंतरीच्या भारत-चीन तणावानंतर ‘स्वदेशी वापरा’चा नारा घुमू लागल्याचा हा परिणाम असावा, असे बोलले जात आहे. दिवाळीसाठी घरावर आकाश कंदील लावल्याशिवाय दिवाळसण झाल्यासारखे वाटत नाही. त्यामुळे झोपडीपासून महालापर्यंत सर्वत्र दिवाळी येताच आकाश कंदील प्रकाशमान होतात. पूर्वी कळकांच्या काड्यांना आकारात दोऱ्याने बांधून त्यास चिरमुरी कागद चिटकवून घरीच आकाश कंदील केले जात असत. 

पुढे अनेक कलाकार असे  कंदील विक्रीस आणू लागले आणि बघता बघता बाजारपेठ दरवर्षी कलात्मक आकाश कंदिलांनी भरून जाऊ लागली; अर्थातच त्यावर ‘चायना मेड’ ची छाप असायची. पारदर्शक अन्‌ चकचकीत  कागद आकर्षक आकार दिलेल्या कंदिलांनी बाजारपेठ काबीज केली होती. मात्र, गेल्या वर्षीपासून नागरिकांनी या चायना बनावटीच्या कंदिलांकडे पाठ फिरवली आहे. यावर्षी तर ग्राहक आवर्जून देशी कलाकारांनी तयार केलेले कंदील आहेत का, अशी विचारणा करत असल्याची माहिती विक्रेत्यांनी दिली. त्यामुळेच पारंपरिक भारतीय पद्धतीचे आकाश कंदील विक्रेत्यांकडे प्राधान्याने आढळत आहेत. येथील कलाकारांनीही त्यासाठी चांगल्या चकचकीत कागदांचे नियोजन करून त्यामध्ये आकर्षकता आणली 

आहे. तर काही कलाकारांनी चायना आकाराचेही काही कंदील विक्रीसाठी केलेले आढळतात. आता बाजारपेठेत आकर्षक कंदील निवडण्यासाठी नागरिक वेळ देऊ लागलेले आहेत. जास्तीत जास्त आकर्षक कंदील खरेदीकडे कल वाढला आहे. गोल, बलून, पॅगोडा, हंडी अशा विविध आकाराचे कंदील उपलब्ध झाले आहेत.

साधारणपणे ५० ते ३०० रुपयांपर्यंत किंमत
डेरेदार हंडी, चमचमणारी चांदणी, तबकडी अशा विविध आकाराचे आणि रंगांचे आकाश कंदील तसेच पणतीच्या आकाराचे कंदीलही बाजारात उपलब्ध आहेत. त्याच्या किमती साधारणपणे ५० ते ३०० रुपयांपर्यंत आहेत. मात्र, आजही दोऱ्याचे जाळीदार कंदील, कापडी कंदीलही विविध आकारांत दाखल होऊ लागले आहेत. 

Web Title: satara news diwali festival Lantern