चांगल्या कामात रिक्त पदांचा अडसर

आयाज मुल्ला
गुरुवार, 20 जुलै 2017

वडूज - खटाव तालुक्‍यातील सात प्राथमिक आरोग्य केंद्रे व ४० उपकेंद्रांतील एकूण मंजूर असणाऱ्या २०३ विविध पदांपैकी १४५ पदे भरली आहेत. तब्बल ५८ पदे रिक्त आहेत. तालुक्‍यात आरोग्य विभागाच्या वैद्यकीय सेवेचे काम समाधानकारक असले तरी ही रिक्त पदे तातडीने भरल्यास हेच काम आणखी चांगले होण्यास गती मिळेल. 

वडूज - खटाव तालुक्‍यातील सात प्राथमिक आरोग्य केंद्रे व ४० उपकेंद्रांतील एकूण मंजूर असणाऱ्या २०३ विविध पदांपैकी १४५ पदे भरली आहेत. तब्बल ५८ पदे रिक्त आहेत. तालुक्‍यात आरोग्य विभागाच्या वैद्यकीय सेवेचे काम समाधानकारक असले तरी ही रिक्त पदे तातडीने भरल्यास हेच काम आणखी चांगले होण्यास गती मिळेल. 

तालुक्‍यात पुसेगाव, डिस्कळ, पुसेसावळी, कातरखटाव, निमसोड, खटाव, मायणी या ठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्रे आहेत. त्याअंतर्गत अनेक उपकेंद्रेही आहेत. तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयात असणारी आरोग्य विस्तार अधिकारीपदाची दोन्ही पदे रिक्त आहेत. अधिकारी गटाची (अ) १४ पदे आहेत. त्यापैकी आठ पदे भरली असून पुसेगाव, डिस्कळ, खटाव, कातरखटाव, निमसोड, मायणी येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांची सहा पदे रिक्त आहेत. म्हासुर्णे येथील आयुर्वेद वैद्यकीय अधिकारी वर्ग दोनचे एक पद रिक्त आहे. आरोग्य सहायकपदाची १३ पदे असून त्यापैकी ११ भरली आहेत. मायणी, पुसेसावळी येथील दोन पदे रिक्त आहेत. महिला आरोग्य सहायकपदाची १२ पदे असून त्यापैकी दहा भरली असून खटाव, निमसोड येथील दोन पदे रिक्त आहेत. औषध निर्मातापदाची नऊ पदे मंजूर असून त्यापैकी सात पदे भरली आहेत. पुसेगाव, अंबवडे येथील दोन पदे रिक्त आहेत. महिला आरोग्यसेवक पदाची ४७ पदे मंजूर असून ४५ पदे भरली आहेत. मायणी, निढळ येथील दोन पदे रिक्त आहेत. पुरुष आरोग्यसेवक पदाची २९ पदे मंजूर असून त्यापैकी १८ पदे भरली आहेत. बुध, जयराम स्वामींचे वडगाव, होळीचागाव, कटगुण, जांब, चोराडे, वडूज, येरळवाडी, पुसेसावळी, खटाव, पेडगाव येथील ११ पदे रिक्त आहेत. पुरुष आरोग्यसेवक (मलेरिया) पदाची १३ पदे मंजूर असून त्यापैकी नऊ पदे भरलीत. भोसरे, पळसगाव, पडळ, पुसेसावळी येथील चार पदे रिक्त आहेत. कातरखटावसाठी प्रयोगशाळा तंत्रज्ञाचे असणारे एक पद रिक्त आहे. मलेरिया प्रयोगशाळा तंत्रज्ञाची पाच पदे मंजूर असून चार पदे भरली आहेत. पुसेगाव येथील पद रिक्त आहे. कुष्ठरोग तंत्रज्ञाची दोन्ही पदे भरली आहेत. वाहनचालक पदाची सातही पदे कंत्राटी पद्धतीने भरली आहेत. कनिष्ठ सहायकपदाची सात पदे भरली आहेत. शिपाई पदाची २३ पदे मंजूर असून त्यापैकी दहा पदे भरली आहेत. १३ पदे रिक्त आहेत. सफाई कामगारांची सात पदे मंजूर असून पाच पदे भरलीत. दोन पदे रिक्त आहेत. स्त्री परिचर पदाची सात पदे मंजूर असून त्यापैकी पाच पदे भरली आहेत. कातरखटाव, डिस्कळ येथील दोन पदे रिक्त आहेत.

तालुक्‍यातील आरोग्यसेवा समाधानकारक आहे. मात्र, रिक्त पदांमुळे सेवेत असणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण वाढत आहे. त्यामुळे रिक्त पदे भरणे गरजेचे आहे.

वडूजमधील उपकेंद्राभोवती दुर्गंधीचे साम्राज्य
गुरसाळे, पडळ येथील आरोग्य केंद्राच्या इमारतीचे काम झाले असले तरी कर्मचारी नेमणुकीअभावी ही आरोग्य केंद्रे कार्यरत नाहीत. वडूज येथील उपकेंद्राच्या इमारतीभोवती दुर्गंधीचे साम्राज्य असते. दर मंगळवारी येथे लहान बालकांसाठी लसीकरण केले जाते. आरोग्य उपकेंद्राच्या इमारतीभोवती असणाऱ्या दुर्गंधीत होणाऱ्या या लसीकरणाबाबत आवाज उठविल्यानंतर हे लसीकरण नजीकच्याच जिल्हा परिषद शाळेच्या खोलीमध्ये केले जात आहे. येथील उपकेंद्राला शहरात अन्य ठिकाणी हलविण्याची नागरिकांची मागणी आहे.