डॉक्‍टर, कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त ताण

रूपेश कदम
बुधवार, 19 जुलै 2017

मलवडी - माण तालुक्‍यात पाच प्राथमिक आरोग्य केंद्रे व ३२ उपकेंद्रांच्या माध्यमातून ग्रामीण जनतेला जिल्हा परिषद आरोग्य सुविधा देत आहे. परंतु, वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या अपुऱ्या संख्येमुळे आरोग्य सेवेवर कमालीचा ताण येत असल्याचे चित्र आहे.

मलवडी - माण तालुक्‍यात पाच प्राथमिक आरोग्य केंद्रे व ३२ उपकेंद्रांच्या माध्यमातून ग्रामीण जनतेला जिल्हा परिषद आरोग्य सुविधा देत आहे. परंतु, वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या अपुऱ्या संख्येमुळे आरोग्य सेवेवर कमालीचा ताण येत असल्याचे चित्र आहे.

माणमध्ये पळशी, मार्डी, मलवडी, म्हसवड व पुळकोटी येथे प्राथमिक आरोग्य केंद्रे आहेत. त्यातील म्हसवड येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांची दोन्ही पदे रिक्त आहेत. तर पळशी व मलवडी येथे प्रत्येकी एक पद रिक्त आहे. पुळकोटी येथे आरोग्य सहायक व सहायिकेचे प्रत्येकी एक पद रिक्त आहे. सर्वात महत्त्वाचे पद असलेल्या आरोग्य सेविकांच्या एकूण ३७ पदांपैकी तब्बल नऊ पदे रिक्त आहेत. आरोग्य सेवकांची तीन पदे रिक्त आहेत. ‘औषध निर्माता’ची दोन, वाहनचालक-तीन, शिपाई-चार, स्त्री परिचर-चार, स्विपर-चार व अर्धवेळ स्त्री परिचर-सात अशी पदे रिक्त आहेत. या रिक्त पदांमुळे कार्यरत कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त ताण येत आहे. त्यामुळे अनेकदा रुग्ण, त्यांचे नातेवाईक व आरोग्य कर्मचाऱ्यांच्यात छोट्या-मोठ्या कारणांवरून खडाजंगी होताना दिसते. मार्डी येथे प्रयोगशाळा नसून तालुक्‍यात फक्त तीन प्रयोगशाळा तंत्रज्ञ कार्यरत आहे. तालुक्‍यातील ३७ उपकेंद्रांपैकी बिजवडी, दहिवडी, वडजल, पिंगळी बुद्रुक, कुकुडवाड व वरकुटे-मलवडी या उपकेंद्रांना इमारती नाहीत, तर बिदाल व गोंदवले बुद्रुक येथील इमारती जीर्ण झाल्या आहेत.

दिलासा देणारी बाब म्हणजे शिंगणापूर येथे नवीन प्राथमिक आरोग्य केंद्र मंजूर झाले असून इमारतीचे बांधकाम प्रगतिपथावर आहे.

माणमध्ये मुळातच चांगल्या वैद्यकीय सेवेची वानवा असून ग्रामीण भागातील रुग्ण सरकारी आरोग्य सेवेवर अवलंबून असतात. जर प्राथमिक आरोग्य केंद्रे चांगली नसली व तेथे आरोग्य अधिकारी उपलब्ध नसतील तर आरोग्यसेवेचा बोजवारा उडतो. त्यामुळे गरीब व गरजू रुग्णांसाठी जिल्हा परिषदेची आरोग्य सेवा अद्ययावत व परिपूर्ण असणे अत्यंत आवश्‍यक आहे.

माण तालुक्‍यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये मोठ्या संख्येने रुग्णांची गर्दी असते. पण, अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या रिक्त पदांमुळे सध्या कार्यरत असलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना अतिरिक्त ताण सहन करावा लागत आहे. 
- डॉ. एल. डी. कोडलकर, तालुका आरोग्य अधिकारी, माण