साताऱ्यात अतिक्रमण मोहीम गारठली 

साताऱ्यात अतिक्रमण मोहीम गारठली 

सातारा - गेल्या आठवड्यात रडतखडत सुरू झालेली पालिकेची अतिक्रमण विरोधी मोहीम येथील तापमानाचा पारा 12 अंशांपर्यंत खाली आल्यामुळे थंडावली. दोन-तीन दिवस अतिक्रमणे हटविण्याचा "रोड शो' पालिकेने केला. या मोहिमेने रस्ते काही मोकळे झाले नाहीत. कोल्हापूरच्या विशेष पोलिस महानिरीक्षकांची पाठ फिरल्याने ही मोहीम गुंडाळल्याचे समजते. 

पालिकेच्या अतिक्रमण विरोधी विभागाने पोलिस बंदोबस्तात पोवई नाका मंडईतील रस्त्यावर पडलेल्या खोक्‍यांची अतिक्रमणे हटविण्यास सुरवात केली. दोन दिवस पालिकेची ही मोहीम त्याच भागात घुटमळत होती. नंतर कालिदास पंप ते पोलिस कवायत मैदान रस्त्यावरील खोकी पालिका कर्मचाऱ्यांनी हटविली. याच काळात रस्त्यावरील विनापरवाना फ्लेक्‍स काढण्यात आले. एवढेच काय ते चार दिवसांच्या मोहिमेचे संचित मानावे लागेल. त्यानंतर जो अतिक्रमण विभाग मोहिमेतून बेपत्ता झाला तो अद्यापपर्यंत. 

साताऱ्यातील तापमानाचा पारा 12 अंशांपर्यंत खाली उतरला आहे. त्यामुळे ही मोहीम थंडावल्याची चर्चा नागरिकांमध्ये आहे. मिळालेल्या माहितीनुसार, साताऱ्यात रस्त्यांवरील अतिक्रमणांबाबत कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक विश्‍वास नांगरे-पाटील यांनी अत्यंत आग्रही भूमिका मांडत पोलिसांना कारवाईच्या सूचना दिल्या होत्या. कोरेगाव रस्त्यावर काही महिन्यांपूर्वी मोठी कारवाई झाली होती. राजकीय हस्तक्षेपामुळे पोलिसांची ही मोहीम बारगळली होती. श्री. नांगरे-पाटील वार्षिक तपासणीसाठी साताऱ्यात येऊन गेले. या दौऱ्यात वरिष्ठांकडून चौकशी झाल्यास "कारवाई सुरू आहे' असे सांगता यावे, या उद्देशाने पोलिसांनी पालिकेला सोबत घेऊन अतिक्रमणांवर जुजबी कारवाई सुरू केली. श्री. नांगरे-पाटील यांची पाठ वळताच कारवाईचा "रोड शो' थांबविण्यात आल्याचे समजते. 

पालिकेच्या दारातच अतिक्रमण 

पोवई नाका परिसर, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण परिसर, गोडोली, राजपथ व कर्मवीर पथ, गणतपराव तपासे पथ, समर्थ मंदिर परिसर, बस स्थानक परिसर, रविवार पेठ जुनी मंडई आदी प्रमुख ठिकाणी अतिक्रमणे तशीच आहेत. एका व्यावसायिकाने पालिका मुख्यालयाच्या दारातच खोके टाकून पालिकेला आव्हान दिले आहे. खोक्‍यांची एवढी अतिक्रमणे बोकाळली असताना पालिका अधिकारी-पदाधिकारी शांत कसे बसू शकतात, असा प्रश्‍न सर्वसामान्यांतून उपस्थित केला जात आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com