इंग्रजी शाळांचे आव्हान पेलले 

विशाल पाटील
सोमवार, 12 जून 2017

सातारा - शहरालगत असल्याने इंग्रजी माध्यमांच्या खासगी शाळांचे आव्हान... 2013 ला पटसंख्या अवघी 85... पालकांचा शाळेविषयीचा तिरस्काराचा दृष्टिकोन... हे आव्हान पेलण्याचे काम केले आहे, खिंडवाडी (ता. सातारा) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेने! अवघ्या तीन वर्षांत शाळेचा शैक्षणिक दर्जा उंचावत 125 पटसंख्या केली. विशेष म्हणजे त्यात 30 विद्यार्थी हे खासगी व इंग्रजी माध्यमांच्या शाळेतून दाखल झाले आहेत. त्याबद्दल शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी शाळेचा सन्मान केला आहे. 

"प्रयत्ने वाळू रगडिता तेल ही गळे' या म्हणीप्रमाणे काम केल्यास यश मिळते, याची प्रचिती खिंडवाडी शाळेने आणून दिली. 2013 मध्ये पहिले ते सातवीपर्यंत वर्ग असलेल्या शाळेत 85 विद्यार्थी संख्या आणि सहा शिक्षकांची संख्या होती. शहरानजीक शाळा असल्याने पालकांचा ओढा खासगी, इंग्रजी शाळांकडे होता, तसेच शाळेविषयी तिरस्काराचा दृष्टिकोनही वाढला होता. ते चित्र बदलण्याची चंग बांधला तो पदवीधर शिक्षक जयवंत लोहार यांनी! शिक्षक कोठे अपुरे पडत आहेत, याचा अभ्यास करून सकारात्मक प्रयत्न सुरू झाले. पालक, ग्रामस्थांचा विश्‍वास संपादन करण्यासाठी दर दोन महिन्यांनी पालक मेळावे घेतले गेले. भाषणबाजीला थारा न देता उपक्रम, विद्यार्थ्यांची प्रगती मांडली. त्यातून पालकांचा विश्‍वासही वाढू लागला. 

शाळा परिसर बंदिस्त करून बाह्यांग, अंतरंग सुशोभित करण्यासाठी पालक मेळाव्यात सविस्तर चर्चा झाली. डिजिटल क्‍लासरूमचे महत्त्व तेथे सांगण्यात आले. पालकांनीही प्रतिविद्यार्थी 500 रुपये मदत केली, तेथेच पहिला शैक्षणिक उठाव होत 60 हजार रुपये जमा झाले. शाळेत होणाऱ्या बदलांची चर्चा गावात होऊ लागली. प्रजासत्ताकदिनी बक्षीस रूपाने प्रोत्साहन देण्यासाठी सात व्यक्‍तींनी प्रत्येक पाच हजार रुपयांची ठेवी शाळेच्या नावे केली. डिजिटल क्‍लासरूमसाठी आणखी 30 हजार रुपये लोकवगर्णीतून जमा झाले. ग्रामपंचायतींकडून 40 हजार रुपयांचा एलसीडी प्रोजेक्‍टर मिळाला. शाळा व्यवस्थापन, सार्वजनिक मंडळांनी 20 हजारांची मदत केली. अशी दोन वर्षांत एक लाख 90 हजारांची मदत शाळेस झाली आणि शाळेचे रूपडेच बदलले. 

हे गवसले... 
: 85 वरून पटसंख्या 125 वर 
: आयएसओ मानांकन प्राप्त शाळा 
: सातारा तालुका स्मार्ट शाळा पुरस्कार 
: शिक्षणवारीत शिक्षणमंत्र्यांकडून सन्मान 
: केंद्रीय सचिव अनिल स्वरूप यांची भेट 
: "प्रगत शैक्षणिक'मध्ये 100 टक्‍के प्रगत