समृद्ध जैवविविधतेत फुलपाखरांचीही संपन्नता...

समृद्ध जैवविविधतेत फुलपाखरांचीही संपन्नता...

सातारा - समृद्ध जैवविविधतेसाठी ओळखला जाणारा सातारा जिल्हा फुलपाखरांबाबतही आपली संपन्नता टिकवून आहे. या जिल्ह्यात ३४५ पैकी २४१ प्रजातींचे अस्तित्व आढळून आले आहे. यामध्ये महाराष्ट्राचे राज्य फुलपाखरू ‘ब्ल्यू मॉरमॉन’, तसेच द्विदल वर्गीय कडधान्यांवर किडीचे काम करणारे पी ब्ल्यू , ग्राम ब्ल्यू, कॉमन सेऱ्युलिन यासारख्या फुलपाखरांचा समावेश आहे. मलाबार बॅंडेड पिकॉक व बनाना स्किपर ही फुलपाखरे महाराष्ट्रात प्रथम कास- ठोसेघर या भागात नोंदवली गेली आहेत. 

येथील यशवंतराव चव्हाण शास्त्र महाविद्यालयात प्राणिशास्त्र विभागातील प्रा. डॉ. प्रतिमा पवार- भोईटे यांनी जिल्ह्यातील फुलपाखरांचा अभ्यास केला. त्यांच्या प्रबंधाला राजस्थानच्या जेजेटी विद्यापीठाने ‘डॉक्‍टरेट’ म्हणून नुकतीच मान्यता दिली आहे. डॉ. प्रतिमा पवार- भोईटे म्हणाल्या, ‘‘सामान्यता फुलपाखरे ही एका आदर्श परिसंस्थेची किंबहुना जंगले व अधिवासाचे परिमाण मानले जाते. त्यामुळे एवढ्या बहुसंख्येने आढळणाऱ्या प्रजाती संख्येमुळे साताऱ्यातील आदर्श निसर्ग- पर्यावरणास पुष्टी मिळाली आहे. बनाना स्कीपर व मलबार बॅंडेड पिकॉकसह अत्यंत दुर्मिळ असणाऱ्या ॲबनॉर्मल सिल्व्हर लाईन, ऑर्किड टिट, क्‍लब बीक, टाऊनी राजा, अनामोलस नवाब, डार्क इव्हिनिंब ब्राऊन यांसह ब्ल्यू ओक लीफ, ब्लॅक राजा व आकाराने सर्वात मोठे असणारे फुलपाखरू सदर्न बर्डविंग व जगभरात सर्वत्र आढळणारे पेंटेड  लेडी या सारख्या फुलपाखरांचा सातारा जिल्ह्यात वावर आढळला आहे. 

सातारा जिल्ह्यात सदाहरित, निम-सदाहरित वनांचा पश्‍चिमेकडील पर्वतीय डोंगराळ प्रदेश, मध्य जिल्ह्याचा सखल व शेतीप्रधान जलयुक्त प्रदेश, तर पूर्वेस सलगपणे विस्तारलेली गवताळ माळराने हे विचित्र भौगोलिक वैशिष्ट आहे. त्यामुळे राज्यातील इतर जिल्ह्यांच्या तुलनेत सातारा जिल्ह्यात फुलपाखरांमध्ये सर्वाधिक विविधता आढळल्याचे डॉ. पवार-भोईटे यांनी सांगितले. समुद्रसपाटीपासून ७०० ते १२०० मीटर उंचीवरील भागात (महाबळेश्‍वर, पाचगणी, कांदाटी खोरे, बामणोली- कास-ठोसेघर, कोयनानगर) तेथील वृक्षराजी व हवामानामुळे जिल्ह्याच्या उर्वरित भागापेक्षा फुलपाखरांची प्रजाती व संख्यानिहाय विविधता अधिक आढळते. ब्लॅक प्रिंस, रेड हेलन, क्‍लब बीक, ॲबनॉर्मल सिल्व्हर लाईन, मलाबार बॅंडेड पिकॉक, ग्रेट ऑरेंज टिप, ग्रे काऊंट, स्ट्राईप्ड अल्बेट्रॉस, चॉकलेट अल्बेट्रॉस या जातीची फुलपाखरे फक्त जिल्ह्याच्या डोंगरी भागात अभ्यासकाळात आढळल्याचे मत त्यांनी नोंदवले. 

जिल्ह्यात पश्‍चिम घाट क्षेत्रातील कोयनानगर, महाबळेश्‍वर, पाचगणी, कांदाटी खोरे, बामणोली- कास- ठोसेघर या परिसरात साधारणता फेब्रुवारी ते मार्च महिन्यांत दक्षिण भारत व तळकोकणातून घाट पार करून स्थलांतरित झालेल्या ब्ल्यू टायगर, स्ट्राईप्ड टायगर, कॉमन क्रो या सारख्या फुलपाखरांच्या लाखोंच्या झुंडी दिसतात.
- प्रा. डॉ. प्रतिमा पवार-भोईटे 

फलटण- माणला विविध प्रजाती
सर्वसाधारणपणे शुष्क प्रदेशात आढळणारी यलो ऑरेंज टिप, स्कॉल सामन अरब, लार्ज सामन अरब, स्मॉल ऑरेंज टिप, बेबी फाईव्ह रिंग, आर्फिकन मार्बल स्किपर ही फुलपाखरेही फलटण, खंडाळा, माण, खटाव, तसेच कोरेगाव तालुक्‍याच्या काही भागांत आढळतात. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com