कोजागरीच्या रात्री साताऱ्यात काय घडले?

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 7 ऑक्टोबर 2017

उदयनराजे-शिवेंद्रसिंहराजे गटांत टोलनाक्‍यावरून राडा; गोळीबार, हाणामारी आणि दगडफेकही!

उदयनराजे-शिवेंद्रसिंहराजे गटांत टोलनाक्‍यावरून राडा; गोळीबार, हाणामारी आणि दगडफेकही!
सातारा - कोजागरी पौर्णिमेच्या रात्री परंपरेनुसार चंद्राच्या साक्षीने दूध पिण्याच्या कार्यक्रमांची ठिकठिकाणी तयारी सुरू असतानाच दोन्ही राजांच्या अर्थात खासदार उदयनराजे भोसले आणि आमदार शिवेंद्रसिंहराजे यांच्या समर्थकांत राडा सुरू झाल्याच्या बातम्या आल्या आणि सर्वसामान्य सातारकरांच्या काळजात धस्स झाले. आनेवाडी (ता. जावळी) येथील टोलनाक्‍याचे व्यवस्थापन बदलाच्या वादाचा मध्यरात्री सुरूची बंगल्यासमोर उद्रेक झाला. खासदार उदयनराजे व आमदार शिवेंद्रसिंहराजे यांच्या कार्यकर्त्यांत तुफान हाणामारी व दगडफेक झाली. बंदुकीचे तीन राउंडही फायर झाले. गाड्यांची मोडतोड करण्यात आली. जमावाने एक कारही उलटून टाकली. या धुमश्‍चक्रीत आमदार गटाचे दोन कार्यकर्ते गंभीर जखमी झाले. रात्री निर्माण झालेली तणावाची परिस्थिती आज सकाळी नियंत्रणात आली असली, तरी साताऱ्यात मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

आनेवाडी टोलनाक्‍याचे व्यवस्थापन उदयनराजे गटाच्या कार्यकर्त्यांकडे होते. गेल्या काही दिवसांपासून ठेक्‍याचे व्यवस्थापन बदलण्याच्या हालचाली सुरू होत्या. त्याला उदयनराजेंचा विरोध आहे. तरीही हा ठेका शिवेंद्रसिंहराजे गटाच्या कार्यकर्त्यांकडे देण्यात आला. काल (ता. ५) रात्री टोलनाक्‍याचा ताबा नवीन व्यवस्थापन घेणार होते. मात्र, उदयनराजेंनी सायंकाळपासूनच टोलनाक्‍यावर ठाण मांडले. रात्री आठपासून बारा वाजेपर्यंत टोल न घेताच वाहने सोडण्यात येत होती. उदयनराजेंच्या पवित्र्यामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. 

आमदार गटाची जमवाजमव
उदयनराजेंकडून टोलनाक्‍यावर होणारा विरोध थांबत नसल्याचे दिसल्यावर शिवेंद्रसिंहराजे यांनीही रात्री आठपासून कार्यकर्त्यांची जमवाजमव सुरू केली. सुरूची बंगल्यावर मोठ्या संख्येने कार्यकर्ते जमा झाले. सुमारे ८० ते ९० गाड्यांच्या ताफ्यासह शिवेंद्रसिंहराजे हे टोलनाक्‍यावर जाण्याच्या तयारी होते. त्याची कुणकुण पोलिसांना लागली. तणाव निर्माण होऊ नये, यासाठी पोलिसांनी त्यांना टोलनाक्‍यावर न जाण्याची विनंती केली. ‘त्यांना’ही टोलनाक्‍यावरून हटवा, असे म्हणत शिवेंद्रसिंहराजेंनी शासकीय विश्रामगृहावर तळ ठोकला. विश्रामगृहाचे आवार कार्यकर्त्यांमुळे पूर्ण भरून गेले होते. या घटनाक्रमामुळे शहरातही तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

स्थगितीने उदयनराजे साताऱ्याकडे
शिवेंद्रसिंहराजेंना विश्रामगृहावर थांबवल्यावर पोलिसांनी आनेवाडीकडे मोर्चा वळवला. स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलिस निरीक्षक पद्‌माकर घनवट, तहसीलदार रोहिणी आखाडे तेथे होते. टोलनाका घेतलेल्या मुख्य कंपनीच्या व्यवस्थापनाशी प्रशासनाची चर्चा सुरू होती. उदयनराजेंचा दबाव वाढतच चालला होता. गाड्या ‘टोल फ्री’ सुरू होत्या. पावणेबाराच्या सुमारास टोलनाक्‍याचे व्यवस्थापन बदलण्याचा निर्णय स्थगित केल्याचा कंपनीचा ई-मेल आला. हस्तांतरणाला स्थगिती मिळाल्यामुळे रात्री बाराला उदयनराजे हे आनेवाडी टोलनाक्‍यावरून साताऱ्याकडे निघाले.

आमदार ‘सुरूची’कडे रवाना
उदयनराजेंनी आनेवाडी टोलनाका सोडल्यानंतर शिवेंद्रसिंहराजेही विश्रामगृहाच्या बाहेर आले. पोलिस प्रशासनाची आपल्याला मदत लागणार आहे. त्यांच्या विनंतीनुसार आपण आता थांबू. थोड्याच दिवसात पुढची प्रक्रिया पूर्ण होईल, असे म्हणत त्यांनी कार्यकर्त्यांना घरी जाण्याचे आवाहन केले. त्यानंतर ते ‘सुरूची’कडे रवाना झाले.

ॲड. विक्रम पवार यांचा पाठलाग
शिवेंद्रसिंहराजे व कार्यकर्ते ‘सुरूची’कडे येत होते. जिल्हा न्यायालयाच्या परिसरात त्यांचे कार्यकर्ते ॲड. विक्रम पवारही होते. त्याचदरम्यान आनेवाडीहून निघालेले उदयनराजे हे साताऱ्यात पोचले. उदयनराजेंच्या कार्यकर्त्यांनी ॲड. पवार यांच्या गाडीकडे मोर्चा वळवला. त्यामुळे पवार यांनी आपली गाडी वेगात पुढे नेली. ती थेट सुरूची बंगल्यापर्यंत. उदयनराजे व त्यांच्या कार्यकर्त्यांनीही सुरूचीपर्यंत त्यांचा पाठलाग केला. त्यामुळे धुमश्‍चक्रीचे केंद्र सुरूची बंगला झाले. 

‘सुरूची’पुढेच धुमश्‍चक्री; गोळीबार 
ॲड. पवारांनी गाडी थेट सुरूची बंगल्यात घातली. पाठीमागून आलेले उदयनराजे ‘सुरूची’समोर गाडी लावून आत गेले. काही वेळात ते बाहेर आले. संतप्त झालेल्या उदयनराजेंनी शिवेंद्रसिंहराजेंना आव्हान द्यायला सुरवात केली. ‘कुणाच्यात दम आहे, बघून घेतो,’ असे उदयनराजेंचे आव्हान सुरू होते. या वेळी राजू भोसले यांनी शाब्दिक प्रत्युत्तर दिले. त्यामुळे सनी भोसले त्यांच्या अंगावर गेला. तेथून दोन्ही गटांच्या कार्यकर्त्यांत धुमश्‍चक्रीला सुरवात झाली. ‘सुरूची’मध्ये मोठ्या संख्येने कार्यकर्ते आधीपासूनच जमले होते. त्यांनीही प्रतिकार केला. खासदारांच्या कार्यकर्त्यांचे प्रत्युत्तर सुरू होते. तेवढ्यात कोणी तरी तीन गोळ्या झाडल्याचा आवाज आला. त्यामुळे गोंधळ आणखी वाढला. पळापळ सुरू झाली. आमदार गटाच्या कार्यकर्त्यांची संख्या वाढल्याने पोलिसांनी उदयनराजे व त्यांच्या कार्यकर्त्यांना तेथून जाण्यास प्रवृत्त केले.

मोठ्या गाड्यांची मोडतोड
उदयनराजे व कार्यकर्त्यांच्या गाड्या तेथून जायला सुरवात झाल्यावर आमदार गटाच्या कार्यकर्त्यांकडून दगड, दांडक्‍याने गाड्यांवर हल्ला सुरू केला. एक कार उलटूनही टाकली. त्यामुळे रस्त्यावर काचांचा सडा पडला होता. दगडफेक सुरू झाल्याने उदयनराजेंच्या कार्यकर्त्यांनी गाड्या वेगाने तेथून काढल्या. या वेळी गर्दीमध्ये असलेले रवी पवार (गोडोली), चंदू पवार (मांडवे) हे गाड्यांच्या धडकेत गंभीर जखमी झाले. या गोंधळामध्ये पोलिस निरीक्षक किशोर धुमाळही जखमी झाले.

मोठा पोलिस फौजफाटा 
उदयनराजे हे आनेवाडीतून तर, शिवेंद्रसिंहराजे हे विश्रामगृहातून घराकडे निघाल्यामुळे पोलिसांना थोडे हायसे वाटले होते. मात्र, अचानक ‘सुरूची’वर झालेला राडा समोर आला. त्यामुळे पोलिसांची चांगलीच धावपळ उडाली. पोलिस अधीक्षकांसह सर्व अधिकारी घटनास्थळावर आले. सुरूची, जलमंदिर परिसराबरोबरच शहरामध्येही बंदोबस्त वाढविण्यात आला. ‘जलमंदिर’ व ‘सुरूची’कडे जाणाऱ्या रस्त्यांवर वाहतुकीस बंदी घालण्यात आली होती. सकाळीही ती सुरूच होती. वातावरण आणखी चिघळू नये यासाठी राज्य सुरक्षा दलाची पथके साताऱ्यात दाखल झाली होती. सांगली व कोल्हापूर जिल्ह्यांतूनही जादा पोलिस बंदोबस्त आला होता. 

संपूर्ण शहरात बंदोबस्त
पहाटे घटनास्थळाची पाहणी केल्यानंतर पोलिस अधीक्षकांनी शहरामध्येही सर्वत्र बंदोबस्त लावण्याच्या सूचना दिल्या. सकाळी सात वाजल्यापासून राजवाडा बस स्थानक, मुख्य बस स्थानक, तसेच शहरातील महत्त्वाच्या सार्वजनिक ठिकाणांवर पोलिसांचा बंदोबस्त लावला गेला. मोतीतळे ते सुरूची बंगला या रस्त्यात अडथळे लावण्यात आले आहेत. दोन्ही निवासस्थानांबाहेर पोलिसांचा कडक बंदोबस्त ठेवलेला आहे. 

सातारा शहरात तणावपूर्ण शांतता
रात्रीचा प्रकार सकाळपर्यंत सातारकरांच्या कानावर गेला होता. त्यामुळे आज बंद नाही ना, या शंकेनेच सातारकरांची पहाट उजाडली. ‘बंद’बाबत माहिती घेण्यासाठी अनेकांचे फोन खणखणत होते. अनेक दुकानदारांनी स्वतःहून दुकाने बंद ठेवली. त्यामुळे सकाळी अत्यंत तुरळक दुकाने उघडलेली दिसत होती. त्यामुळे संपूर्ण शहरात शांतता पसरली होती. दुपारनंतर थोडे चित्र बदलले. दिवसभर शहरात याच विषयाची चर्चा सुरू होती. पुढे काय होणार, या चिंतेने नकळतपणे शहरात तणावाचे वातावरण होते.

पोलिस अधीक्षकांचा पहाटे पाचपर्यंत ठिय्या
टोलनाक्‍याचे प्रकरण शांततेत हाताळण्याचे पोलिसांचे प्रयत्न सुरू होते. मात्र, हा गोंधळ वाढल्याने पोलिस अधीक्षक संदीप पाटीलही रस्त्यावर उतरले. ते स्वतः पहाटे तीन वाजेपर्यंत मोती तळ्याच्या परिसरात तळ ठोकून होते. मध्यरात्री तीनला ते शाहूपुरी पोलिस ठाण्यात गेले. तेथे दोन्ही गटांच्या तक्रारी नोंदविण्याचे काम पहाटे पाच वाजेपर्यंत सुरू होते. पहाटे पाचला ते पुन्हा घटनास्थळी आले. तिथे आवश्‍यक तो पोलिस बंदोबस्त त्यांनी लावला. घटनेचे पडसाद शहरात उमटू नयेत यासाठी रजेवर गेलेल्या सर्व पोलिसांना कामावर बोलावून घेण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.

घटनाक्रम...
सायंकाळी ७.०० - आनेवाडी टोलनाक्‍यावर खासदार उदयनराजे भोसले दाखल
 ७.३० - टोलनाक्‍यावरून वाहने नि:शुल्क सोडण्यास सुरवात
८.०० - उदयनराजे टोलनाक्‍यावरून साताऱ्याकडे परत
८.०० - शिवेंद्रसिंहराजेंच्या ‘सुरूची’ बंगल्यात कार्यकर्ते दाखल होण्यास प्रारंभ
१०.०० - खासदार उदयनराजे पुन्हा टोलनाक्‍यावर
१०.४५ - आमदार शिवेंद्रसिंहराजे हे समर्थकांसह आनेवाडी टोलनाक्‍याकडे रवाना
१०.५० - शहरातून बाहेर जाणाऱ्या सर्व रस्त्यांवर पोलिसांची नाकाबंदी
११.०० - पोलिसांच्या विनंतीनंतर शिवेंद्रसिंहराजे टोलनाक्‍यावर न जाता विश्रामगृहात थांबले
११.३० - पुढील आदेश येईपर्यंत टोलनाका व्यवस्थापन न बदलल्याचा ‘रिलायन्स’कडून ई-मेल
११.४५ - खासदार उदयनराजे हे समर्थकांसह साताऱ्याकडे रवाना
१२.१५ - उदयनराजेंकडून ॲड. विक्रम पवार यांच्या गाडीचा पाठलाग
१२.३० - खासदार उदयनराजे ‘सुरूची’ बंगल्यासमोर
१२.४५ - दोन्ही नेत्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये धुमश्‍चक्री, गोळीबार, वाहनांची तोडफोड 
०१.०० - समर्थकांसह उदयनराजे सातारा शहर पोलिस ठाण्यात दाखल
०३.०० - उदयनराजे हे ‘जलमंदिर पॅलेस’मध्ये
०३.३० - पोलिस अधीक्षक संदीप पाटील हे मोती तळ्याहून शाहूपुरी पोलिस ठाण्यात दाखल
०५.०० - संदीप पाटील हे पुन्हा मोती तळ्याकडे.