अन्नभेसळीवर करडी नजर

प्रवीण जाधव
शुक्रवार, 6 ऑक्टोबर 2017

सातारा - खाद्यपदार्थांतील भेसळीचे दुष्परिणाम आतड्याचे विकार, त्वचा रोग तसेच काही वेळा कर्करोग किंवा अपंगत्वापर्यंतही होऊ शकतात. सणासुदीच्या काळात नागरिकांना याचा त्रास होऊ नये म्हणून अन्न व औषध प्रशासन उद्यापासून (शुक्रवार) अन्नपदार्थ तपासणी मोहीम सुरू करणार आहे. नागरिकांनीही खाद्यपदार्थांची खरेदी करताना सतर्कता बाळगण्याचे आवाहन करण्यात आले आहे. 

सातारा - खाद्यपदार्थांतील भेसळीचे दुष्परिणाम आतड्याचे विकार, त्वचा रोग तसेच काही वेळा कर्करोग किंवा अपंगत्वापर्यंतही होऊ शकतात. सणासुदीच्या काळात नागरिकांना याचा त्रास होऊ नये म्हणून अन्न व औषध प्रशासन उद्यापासून (शुक्रवार) अन्नपदार्थ तपासणी मोहीम सुरू करणार आहे. नागरिकांनीही खाद्यपदार्थांची खरेदी करताना सतर्कता बाळगण्याचे आवाहन करण्यात आले आहे. 

सणाच्या काळात भेसळीची शक्‍यता
सणाच्या कालावधीत नागरिकांकडून मोठ्या प्रमाणावर अन्नपदार्थांची खरेदी केली जाते. त्याचा गैरफायदा घेत जादा नफ्यासाठी भेसळ होण्याची शक्‍यता असते. भेसळीमुळे विषबाधा होऊन सणाच्या आनंदावर विरजण पडू नये, यासाठी त्यामुळे या कालावधीत अन्नपदार्थ खरेदी जागृतपणे करणे आवश्‍यक आहे.

सहा पथकांचे जिल्ह्यावर लक्ष
दिवाळीच्या उत्साहावर विरजण पडू नये यासाठी अन्न व औषध प्रशासनही सज्ज झाले आहे. त्यासाठी जिल्हाभर उद्यापासून खाद्यपदार्थ तपासणी मोहीम राबविली जाणार आहे. जिल्ह्यातील विविध ठिकाणचे खाद्यपदार्थ उत्पादक व विक्रेते यांच्यावर लक्ष ठेवण्यासाठी अन्नसुरक्षा अधिकाऱ्यांची सहा पथके तयार करण्यात आली आहेत. या पथकांच्या माध्यमातून मिठाई उत्पादने व खव्यांचे नमुने तसेच रवा, आटा, मैदा, बेसन, खाद्यतेलाच्या उत्पादनांची तपासणी करण्यात येणार आहे. भेसळ आढळल्यास संबंधित साठा तातडीने जप्त करून कारवाई करण्यात येणार आहे.

भेसळ कशी ओळखावी...
दुधाचा थेंब गुळगुळीत उतरत्या पृष्ठभागावर टाका. पाणीमिश्रित थेंब लवकर खाली येतो तर, शुद्ध दुधाचा थेंब सावकाश खाली येतो. दुधात आयोडिनचा थेंब टाकल्यावर निळा रंग आल्यास स्टार्चची भेसळ असते. खवा आणि पाणी एकत्र उकळून घ्यावे. थंड झाल्यावर आयोडिनचे काही थेंब टाका. निळा रंग आल्यास त्यात पिष्टमय पदार्थांची भेसळ स्पष्ट होते. पातळ तुपामध्ये एक चमचा तीव्र हायड्रोक्‍लोरिक ॲसिड आणि थोडीशी साखर टाका.

हलविल्यानंतर तांबडा रंग आला, तर तुपामध्ये वनस्पतीची भेसळ असल्याचे स्पष्ट होते. लोण्यामध्ये आयोडिनचे काही थेंब टाकल्यावर निळा रंग आल्यास बटाटे, रताळीसारख्या पिष्टमय पदार्थांची भेसळ असते. चमचाभर खाद्यतेलात तीव्र स्वरूपाचे नायट्रिक ॲसिड टाकून हलवल्यावर तळाला लालसर करडा रंग आला, तर धोतऱ्याच्या तेलाची भेसळ असते. काचेच्या ग्लासामध्ये पाण्यात पिठीसाखर विरघळवल्यास तळाला खडूची भुकटी साचते. पिठीसाखरेत हायड्रोक्‍लोरिक ॲसिडचे काही थेंब टाकल्यानंतर फेस व बुडबुडे आल्यास त्यात धुण्याचा सोडा मिसळलेला असतो. 

भेसळ आढळल्यास तक्रार करा - राजेंद्र रुणवाल
नागरिकांनी खाद्यपदार्थ घेताना सतर्क राहावे. स्वच्छ व ताजे पदार्थ खरेदी करावेत. भेसळयुक्त पदार्थ आढळल्यास अन्न व औषध प्रशासनाच्या ०२१६२-२३५२२० या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन अन्न व औषध प्रशासनाचे सहायक आयुक्त राजेंद्र रुणवाल यांनी केले आहे.

Web Title: satara news food mixing watch