कोणी माती देता का माती... 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 14 ऑक्टोबर 2017

तयार किल्ले हा उतारा!  
माती-दगड आणून हात, कपडे चिखलात भरवून किल्ला तयार केल्याशिवाय मुलांना किल्ल्याचा खरा आनंद लुटता येत नाही. त्यासाठी अनेक मुले आणि त्यांच्या होसेसाठी पालकही शहराबाहेर जाऊन दगड-माती शोधताना दिसू लागले आहेत. अनेक पालक मुलांना बाजारात मिळणारे प्लॅस्टर ऑफ पॅरिसचे तयार किल्लेच आणून देऊन स्वत:ची सुटका करून घेत आहेत. 

सातारा - कुसुमाग्रजांच्या "नटसम्राट'मधील अप्पासाहेब बेलवलकर यांचा "कुणी घर देता का घर,' हा संवाद विख्यात आहे. सिमेंट-कॉंक्रिटच्या वाढत्या जंगलात "नटसम्राट'च्या स्वगतात थोडा बदल करून किल्ल्यांसाठी "कोणी माती देता का माती,' असे म्हणण्याची वेळ साताऱ्यातील बालगोपाळांवर आली आहे. 

नुकत्याचा दिवाळीच्या सुट्या लागल्याने बालचमू दिवाळीत मातीचा किल्ला करण्याचे मनसुबे रचून आहेत. किल्ले तयार करून ते आपल्या अंगणात छत्रपतींचा पराक्रमी इतिहास जागवत असतात. मात्र, आता शहरातील मुलांपुढे किल्ल्यासाठी लागणाऱ्या दगड-मातीसाठी मुले आणि पालकांना यातायात करावी लागत आहे. दिवाळी येताच मुलांना किल्ल्यांचे वेध लागतात. किंबहुना सुटी लागण्यापूर्वीच त्यांनी या किल्ल्यांचे नियोजन केलेले असते. सुटी लागताच मुलांची दगड-माती जमविण्याची धांदल सुरू होते. मुले परिसरात फिरून जवळपास मिळेल तेथून दगड-माती गोळा करतात. आपल्या कल्पनेतून छत्रपतींच्या किल्ल्यांच्या प्रतिकृती ते तयार करतात. बुरूज, किल्ल्याच्या उंच डोंगरावरील सिंहासन, डोंगरातील गुहा, पाणवठे, पायथ्याची शेती मुले सुंदरपणे तयार करतात. हे सारे तयार करण्यासाठी दगड-मातीचीच नितांत आवश्‍यकता असते. मात्र, शहरी भागात, अपार्टमेंटच्या जंगलात राहणाऱ्या बालचमूंच्यापुढे आता दगड-मातीचा प्रश्‍न उभा राहू लागला आहे. 

जुने वाडे जमीनदोस्त झाले. शेतजमीन बिगरशेती होऊन सोसायट्या उभ्या राहिल्या. अंगणात आणि परिसरात सुशोभिकरणाच्या नावाखाली कॉंक्रीट आणि पेव्हर पडले. त्यामुळे अपार्टमेंटमधील मुलांना दगड-मातीचे ढिगारे पाहायलाही मिळेनात, अशी परिस्थिती आहे. मातीसाठी मुलांचा पालकांमागे तगादा सुरू झाला आहे. 

Web Title: satara news fort soil

टॅग्स