कल्पक सोसायट्यांमध्ये ‘रुद्राक्ष’ प्रथम

कल्पक सोसायट्यांमध्ये ‘रुद्राक्ष’ प्रथम

सातारा - गणेशोत्सव म्हटलं की, जसा सार्वजनिक मंडळांमध्ये कल्पकतेला वाव मिळतो, तसाच वाव सोसायट्यांच्या गणेशोत्सवालाही मिळावा. त्यातून तेथील रहिवाशांचा दृष्टिकोन अधिकाधिक व्यापक होत जावा, या उद्देशाने आयोजित सोसायट्यांच्या कल्पकतेचा उत्सव अर्थात ‘सकाळ सोसायटी गणेश’ स्पर्धेच्या पहिल्या वर्षी तामजाईनगर येथील रुद्राक्ष रेसिडेन्सी प्रथम पारितोषिकाची मानकरी ठरली. तर याच परिसरातील ‘श्रीनगरी’ द्वितीय, खेड येथील आदर्श प्राईड तृतीय तर शाहूनगरातील साईनगरी आणि कृष्णानगर येथील साई विश्‍व सोसायटी यांचा उत्तेजनार्थ पारितोषिकाने सन्मान करण्यात आला. 

‘एसबीआय लाईफ इन्शुरन्स’ प्रस्तुत ‘सकाळ सोसायटी गणेश स्पर्धे’चे सहप्रायोजकत्व लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑपरेटिव्ह सोसायटीकडे होते. 

मंद वाऱ्याची झुळूक आणि नजरेला खिळवून ठेवणाऱ्या विद्युत रोषणाईत रुद्राक्ष रेसिडेन्सीच्या लॉनवर सोमवारी सायंकाळी उपस्थितांचा उत्साह, विविध सोसायट्यांच्या पदाधिकाऱ्यांची निकालासाठी शिगेला पोचलेली उत्कंठा, सोसायट्यांच्या सभासदांमध्ये ‘आमच्याकडे काय-तुमच्याकडे काय चांगले’ याविषयी झालेल्या चर्चा अशा वातावरणात रंगलेल्या पारितोषिक वितरणाच्या सोहळ्याने साताऱ्यातील सोसायट्यांना अधिक व्यापक कल्पकतेच्या दिशेने नेण्यासाठी महत्त्वपूर्ण पाऊल टाकले. 

या पारितोषिक वितरण सोहळ्यासाठी एसबीआय लाईफ इन्शुरन्सच्या विभागीय व्यवस्थापक अनुपमा देशमुख, सातारा येथील व्यवस्थापक पांडुरंग सातपुते, ‘सकाळ’चे सहयोगी संपादक श्रीकांत कात्रे, शाखा व्यवस्थापक राजेश निंबाळकर, कंग्राळकर असोसिएट्‌सचे श्रीधर कंग्राळकर आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती. 

सोहळ्याच्या प्रारंभी नृत्य साधना ॲकॅडमीच्या सुधांशू किरकिरे यांच्या मार्गदर्शनाखाली मंदार ढवळे, अमेय पंडित, तेजस माने, स्वराज कुलकर्णी यांनी नृत्याद्वारे गणेश वंदना सादर केली. त्यानंतर फुलांची रोपे देवून मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. या स्पर्धेद्वारे मोठ्या शहरातील सोसायट्यांना एकमेकांच्या संपर्कात आणून, एकमेकांकडील चांगल्या उपक्रमांबाबतच्या माहितीची देवाण-घेवाण, त्याचबरोबर परस्परांमध्ये एकोपा निर्माण करण्याचा उद्देश सफल होत असल्याचे श्री. कात्रे यांनी प्रास्ताविकात सांगितले. एसबीआयच्या लाईफ इन्शुरन्सची आवश्‍यकता काय याबरोबरच, सोसायट्यांमध्ये साजरा होणारा गणेशोत्सवही समाजाला वेगळी दिशा देऊ शकतो, असे श्रीमती देशमुख यांनी स्पष्ट केले. त्यानंतर एकापाठोपाठ टाळ्यांच्या कडकडाटात स्पर्धेचा निकाल जाहीर होत गेला आणि प्रथम पारितोषिकासाठी ‘रुद्राक्ष रेसिडेन्सी’ चे नाव घेताच, सर्व सभासदांनी ‘गणपती बाप्पा मोरया...’ चा गजर केला.  साईविश्‍व अपार्टमेंट आणि साईनगरी गृहनिर्माण संस्थेला उत्तेजनार्थ पारितोषिकासाठी १५०० रुपये आणि ट्रॉफी, आदर्श प्राईडला तृतीय क्रमांकासाठी २५०० रुपये आणि ट्रॉफी, श्रीनगरीला द्वितीय क्रमांकासाठी चार हजार रुपये आणि ट्रॉफी तर रुद्राक्ष रेसिडेन्सीला प्रथम पारितोषिकासाठी सहा हजार रुपये आणि ट्रॉफी देऊन सन्मानित करण्यात आले. सोसायट्यांच्या पदाधिकाऱ्यांनी, सभासदांनी या पारितोषिकांचा स्वीकार करून, प्रत्येक सोसायटीतर्फे एका प्रतिनिधीने या अनोख्या स्पर्धेबद्दल मनोगत व्यक्‍त करताना अशा स्पर्धांद्वारे ‘सकाळ’ने आम्हाला विधायक उपक्रमांसाठी प्रेरणा दिली असून, अन्य उपक्रमांमध्येही सहभागी करून घेण्याची अपेक्षा व्यक्‍त केली. श्री. निंबाळकर यांनी ‘सकाळ’च्या वतीने सर्वांचे आभार मानले. मधुरांगणच्या सहायक व्यवस्थापक चित्रा भिसे यांनी सूत्रसंचालन केले. ‘सकाळ’चे सहायक व्यवस्थापक (इव्हेंट) राहुल पवार यांनी कार्यक्रमाचे व्यवस्थापन केले. 

...असाही अनोखा सत्कार 
या कार्यक्रमासाठी ‘रुद्राक्ष’च्या सभासदांनी रेसिडेन्सीची उभारणी करणारे बांधकाम व्यावसायिक श्रीधर कंग्राळकर यांना विशेष निमंत्रित केले होते. जेव्हा प्रथम पारितोषिकासाठी ‘रुद्राक्ष’चे नाव जाहीर करण्यात आले, त्या वेळी सर्व सभासदांनी श्री. कंग्राळकर यांनीच पारितोषिक स्वीकारावे असा हट्ट धरला. तर श्री. कंग्राळकर यांनी चांगल्या पद्धतीने रेसिडेन्सीची बांधणी केल्यानेच आम्ही या पारितोषिकास पात्र ठरल्याचे सांगत सभासदांनी त्यांचा शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देवून अनोखा सत्कार केला. ज्या सोसायटीचे लीडर असे एकोप्याने राहात असतील, ती सोसायटी नेहमीच आदर्श ठरते, अशा शब्दांत श्री. कंग्राळकर यांनी आपल्या भावना व्यक्‍त केल्या. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com