गौराईच्या स्वागताची घराघरांत तयारी

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 27 ऑगस्ट 2017

हलवायांच्या दुकानांत विविध पदार्थांची रेलचेल; बाजारपेठेत महिलांची गर्दी  
सातारा - गणरायाच्या आगमनानंतर लक्ष्मीच्या पावलांनी येणाऱ्या गौराईच्या स्वागतात काही कमी राहू नये, यासाठी घराघरांत फराळाचे पदार्थ तयार करण्यात समस्त महिलावर्ग व्यस्त झाला आहे. तर महिलांच्या या कष्टाला उसंत देण्यासाठी हलवायांनीही विविध पदार्थांनी दुकाने भरून टाकली आहेत. दरम्यान, मंगळवारी येणाऱ्या गौरीला सजविण्यासाठी साहित्य खेरदीस आलेल्या महिलांच्या गर्दीने बाजारपेठ फुलून जात आहे. 

गौरीचा सण महिलांच्या अत्यंत जिव्हाळ्याचा सण असतो. या गौराईच्या स्वागतासाठी आता महिलांची धांदल उडाली आहे. तिला दागिन्यांनी सजविण्यासाठी महिला आता बाजारात इमिटेशन ज्वेलरी खरेदी करू लागल्या असून, आज साताऱ्याची बाजारपेठ महिलांच्या गर्दीने फुलून गेली होती. मोती चौक परिसर आज दागिने विक्रेत्यांनी भरून गेला होता. 

मणीमंगळसुत्रापासून कोल्हापुरी साजापर्यंत आणि राणीहारापासून मुकुट, कमरपट्ट्यांपर्यंतचे रंगीबेरंगी खडे जडवलेले दागिने महिला खरेदी करत होत्या. त्या बरोबरच सुंदर असे गौरीचे मुखवटे बाजारात सर्वत्र उपलब्ध असून, गंगा-गौरी असे दोन मुखवटे खरेदीस महिलांचे प्राधान्य आढळले. पुर्ण अवयव असलेल्या गौरीही महिला हौसेने खरेदी करत होत्या.

दरम्यान, गौरी आगमनादिवशी गौरीस भाजी भाकरीचे भोजन दिले जाते. दुसरे दिवशी मात्र गौरीला विविध पदार्थांचा नैवेद्य दाखविला जातो. त्यासाठी अनेक महिला गणपतीचे आगमन होताच दुसऱ्या दिवशीपासून या पदार्थांच्या तयारीला लागतात. त्यामुळेच आता घरोघरी 

विविध पदार्थांचा दरवळ सुटला आहे. अनेक महिलांना कामातून आणि नोकरी व्यवसायातून पदार्थ तयार करण्यास वेळ मिळू शकत नाही. त्यामुळे काही पदार्थ घरी तयार करून काही तयार पदार्थ खरेदीवर त्यांचा भर असतो. मिठाईतर आवर्जून खरेदी केली जाते. महिलांची गरज भागविण्यासाठी मिठाईचे दुकानदार सज्ज झाले आहेत. आजच सर्वत्र त्याची विक्री सुरू झाली आहे. करंजीपासून चकल्यांपर्यंत अन्‌ गुलाबजामपासून माव्याच्या मोदकांपर्यंत सर्व पदार्थ विक्रेत्यांनी विक्रीस मांडले आहेत. मावा, काजू, स्ट्रॉबेरी, गुलकंद असे विविध स्वादाचे मोदक यावर्षी मिठाई विक्रेत्यांनी बाजारात आणले आहेत.  त्याचे दर साधारण २४० रुपये किलो असे आहेत. मावा, काजू मोदकांचे दर ४८० रुपयापर्यंत आहेत. 

‘जीएसटी’चा परिणाम नाही
यावर्षी इमिटेशन ज्वेलरीसह फराळाच्या पदार्थांच्या किमतीही जास्त वाढतील, अशी भीती नागरिकांना वाटत होती. मात्र, यावर्षी पाच ते दहा टक्के दर वाढलेले आहेत, अशी माहिती विक्रेत्यांनी दिली. थोडी दरवाढ झालेली असली तरी महिलांचा खरेदीतील उत्साह किंचीतही कमी झालेला नाही. महिलांच्या गर्दीने बाजारपेठ आज भरून गेली होती. रविवारच्या बाजारामुळे त्यामध्ये आणखी भर पडली होती.

Web Title: satara news gaurai welcome