आरवची देवराई, चकदेवच्या शिड्या आणि बरंच काही...

शैलेंद्र पाटील
बुधवार, 27 सप्टेंबर 2017

सातारा - घनदाट जंगलातील डेरेदार वृक्षराजी, सदाहरित परिसर, पक्षी, कृमी-कीटक, सरपटणारे प्राणी, फुलपाखरे अशी विपुल जैविक संपत्ती ही पश्‍चिम घाटाची वैशिष्ट्ये सर्वज्ञात आहेत. अनेक अभ्यसकांसाठी ही पर्वणीच असते. मात्र, सौंदर्याच्या बाबतीतही हा परिसर समृद्ध आहे.

सातारा - घनदाट जंगलातील डेरेदार वृक्षराजी, सदाहरित परिसर, पक्षी, कृमी-कीटक, सरपटणारे प्राणी, फुलपाखरे अशी विपुल जैविक संपत्ती ही पश्‍चिम घाटाची वैशिष्ट्ये सर्वज्ञात आहेत. अनेक अभ्यसकांसाठी ही पर्वणीच असते. मात्र, सौंदर्याच्या बाबतीतही हा परिसर समृद्ध आहे.

विशेषतः पावसाळ्यानंतर पश्‍चिम घाटाचे सौंदर्य आणखी खुलते. धरणी आणि डोंगरदऱ्यांवर निसर्गाची हिरवाई पाहताना मन मोहून जाते. ही अनुभूती घ्यायची असेल, तर सध्याचा काळ येथील काही ठिकाणांना भेट द्यायला सर्वोत्तम असाच आहे. सातारा जिल्ह्यातील या भागातील देवराया, चकदेवच्या शिड्या, मल्लिकार्जुनाचे देवालय, महिमानगडसारखा छोटा किल्ला पर्यटकांना नक्कीच भुरळ घालेल.

जिल्ह्याला पश्‍चिम घाटाचे मोठे सानिध्य लाभले आहे. साताऱ्यापासून 40 किलोमीटर, पश्‍चिमेस, शिवसागर जलाशय ओलांडल्यानंतर आरवची देवराई नजरेस पडते. तळकोकण आणि देशावरील दरम्यानच्या या प्रदेशात दोन्ही भूप्रदेशातील संस्कृतीची वैशिष्ट्ये पाहायला मिळतात.

घाटमाथ्यावरील हा सखल प्रदेश. बामणोलीपासून सुमारे दोन तासांच्या जलप्रवासात आकर्षक धबधबे दृष्टीस पडतात. या भागात देवरायांची संख्या अधिक. त्यामुळे देवराईचा प्रदेश म्हणूनही या भागाची वेगळी ओळख आहे. स्थानिकांनी श्रद्धेपोटी, जिवापाड जपलेले जंगल म्हणजे ही देवराई. तिन्ही बाजूने शिवसागर जलाशयाचा वेढा आणि त्यामध्ये हिरवी जर्द वृक्षराजींनी नटलेली टेकडी दृष्टीस पडते. हीच ती आरवची देवराई!
आरवच्या पश्‍चिमेला चकदेव हे ठिकाण आहे. आजच्या काळातही त्या ठिकाणी रस्त्याने जाण्यासाठी मार्ग नाही. त्यामुळे पारंपरिक कड्यांवरील शिड्यांवरून लोकांचे दळणवळण चालते. या शिड्या जवळून पाहताना आणि त्यावरून चालताना वेगळीच अनुभूती मिळते. जवळच पूर्व-पश्‍चिम पसरलेली उत्तुंग अशी "पर्वत' नावाची डोंगररांग आकर्षित करते. समुद्रसपाटीपासून त्याची उंची सुमारे 1200 मीटर असेल. पर्वतावर "मल्लिकार्जुन' नावाच्या भव्य शिवालयाची पुरातन वास्तू आणि पाण्याचे टाके आवर्जून पाहण्यासारखे आहे. निसर्ग पर्यटनासाठी हा आदर्श परिसर आहे. सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या झालर क्षेत्रात (बफर झोन) हा भाग मोडतो. दक्षिणेला महिमानगड नावाचा छोटासा दुर्गम किल्ला दर्शन देतो. हा किल्ला सर करायला फार अवघड आहे. त्यामुळे त्याचे लांबूनच दर्शन घेऊन शिवसागर जलाशयातून नौकाविहार करत परत बामणोलीकडे फिरावे लागते.

अफलातून आंबा घाट
कोल्हापूर जिल्ह्यातील गगनबावडा तालुक्‍यातील करुळ आणि भुईबावडा तर राधानगरी तालुक्‍यातील फोंडा घाट तसेच शाहूवाडी तालुक्‍यातून रत्नागिरीकडे जाताना लागणारा आंबा घाट येथील निसर्गसौंदर्य केवळ अफलातून आहे. आंबोलीचा धबधबा तर राज्यात प्रसिद्ध आहे. राधानगरी- दाजीपूर अभयारण्याला प्रत्येक निसर्गप्रेमीने एकदा तरी आवर्जून भेट द्यावी, असा हा परिसर आहे. दाजीपूरला तुम्हाला गवे पाहायला मिळतात. पर्यटनवृद्धीसाठी काजवा महोत्सव, फुलपाखरू महोत्सव असे नावीन्यपूर्व उपक्रम अलीकडे राधानगरीत आयोजित केले गेले आणि त्याला प्रचंड प्रतिसाद मिळाला.

पाईड हॉनबिलबरोबरच शेकरूही मुबलक
आरव आणि त्याच्या विभागात पहाडी गरुड, पाईड हॉनबिल, हरेल, इमराल्ड डव्ह (कबूतर) इत्यादी पक्षी, बिबट्या, सांबर, गवे, तसेच शेकरू या राज्य प्राण्याचा वावर आहे. साप, नाग, मण्यार, घोणस, सापडासारखे विषारी सापही या भागात आढळतात. वनस्पतींमध्ये गारदी, कासा, हिरडा, कवटी, पिसा, पायर तसेच कानवेल, गुडी, विंचवीसारखी विविध प्रकारची ऑर्किडस आढळतात.