गोंदवले विकास आराखडा  शासन दरबारी धूळ खात!

फिरोज तांबोळी
सोमवार, 24 जुलै 2017

गोंदवले - शासनाचा तीर्थक्षेत्र ‘ब’ वर्ग दर्जा असलेल्या गोंदवले बुद्रुकचा विकास होण्यासाठी वाव आहे. त्यासाठी विविध कामांचा सुमारे पावणेपाच कोटी रुपयांचा आराखडा तयार आहे. मात्र, शासनपातळीवर तो धूळखात पडून आहे.  

गोंदवले - शासनाचा तीर्थक्षेत्र ‘ब’ वर्ग दर्जा असलेल्या गोंदवले बुद्रुकचा विकास होण्यासाठी वाव आहे. त्यासाठी विविध कामांचा सुमारे पावणेपाच कोटी रुपयांचा आराखडा तयार आहे. मात्र, शासनपातळीवर तो धूळखात पडून आहे.  

दहा वर्षांपूर्वी तत्कालीन पर्यटन व तीर्थक्षेत्र विकास विभागाचे मंत्री विजयसिंह मोहिते- पाटील यांच्या माध्यमातून गोंदवले तीर्थक्षेत्राला ‘ब’ वर्ग दर्जा मिळाला. तत्कालीन सचिव अविनाश सुभेदार, तत्कालीन आमदार दिलीप येळगावकर, निळकंठ जोशी, संजय माने यांनीही सहकार्य केले. या योजनेतून पहिल्यांदाच सुमारे ७६ लाखांचा भरघोस निधी ग्रामपंचायतीला मिळाला. त्यातून ‘श्रीं’च्या पालखी मार्गावरील रस्ते काँक्रिटीकरण, पथदिव्याचीही सोय करण्यात आली. मात्र, त्यानंतरच्या काळात आजअखेर तीर्थक्षेत्र विकासासाठी कसलाही निधी उपलब्ध झाला नाही. वास्तविक ग्रामपंचायतीच्या माध्यमातून गावातील मूलभूत गरजादेखील पूर्ण करणे जिकिरीचे असताना तीर्थक्षेत्र म्हणून विकासकामे करण्यासाठी निधीचाच मोठा अडसर असल्याचे दिसते. त्यासाठी ग्रामपंचायतीनी नव्याने पुन्हा विकास आराखडा तयार करण्यात आला आहे. गेल्या तीन वर्षांपूर्वी उपजिल्हाधिकारी भारत वाघमारे यांनी विकासासाठी गोंदवल्याची निवड करून दत्तक घेतले होते. त्याच वेळी त्यांनी माण नदीवर मोदळ ओढ्यापासून स्मशानभूमीपर्यंत घाट बांधण्यासाठी सुमारे ३.२५ कोटी रुपयांचा आराखडा तयार केला होता. याशिवाय गावठानात भूमिगत गटार व वीज वाहिन्यांची व्यवस्था करण्यासाठी सुमारे दोन कोटी रुपयांचा आराखडा, तर सांडपाणी व्यवस्थापन अंतर्गत रिसायकलिंग प्रोजेक्‍ट उभारणीसाठी सुमारे दीड कोटी रुपयांचा विकास आराखडा करून शासनाकडे सादर देखील केला आहे. याशिवाय गावातील अंतर्गत रस्ते, स्वच्छता, पाणी, कचरा व्यवस्थापन यासाठी देखील निधीची आवश्‍यकता आहे. त्यासाठी ग्रामपंचायतीने राज्य शासनाकडे विकास आराखडा प्रस्ताव पाठवले आहेत. मात्र, गेल्या दोन वर्षांपासून हे प्रस्ताव शासनाकडून दुर्लक्षित राहिले आहेत.

तीर्थक्षेत्र विकास योजनेतून करता येण्याजोगी कामे...

 सातारा- पंढरपूर रस्त्यालगतच्या दुकानदारांचे पुनर्वसन करणे.
 समाधी मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांच्या वाहनांसाठी वाहनतळ उभारणे.
 गावामध्ये जागोजागी विशेषतः महिलांसाठी स्वच्छतागृह बांधणे.
 कायमस्वरूपी स्वतंत्र पाणीयोजना निर्माण करणे.
 रस्त्यावरील धोकादायक वीज वाहक तारा काढून अंडरग्राउंड करणे.
 लहान मुले व वृद्धांसाठी बगीचा उभारणे.
 माण नदीलगतच्या धोकादायक कड्यावरील लोकांचे पुनर्वसन करणे.