पश्‍चिम भागातील वर्चस्वासाठी संघर्ष

रूपेश कदम
मंगळवार, 10 ऑक्टोबर 2017

मलवडी - ग्रामपंचायत निवडणुकीची रंगत वाढू लागली असून माणच्या पश्‍चिम भागाचा बालेकिल्ला शाबूत राखण्यात आमदार जयकुमार गोरे यांना यश येणार की, शेखर गोरे या बालेकिल्ल्यावर वर्चस्व मिळवणार, याकडे तालुक्‍याचे लक्ष लागले आहे. त्यातूनच स्थानिक कार्यकर्त्यांपेक्षा नेतेमंडळींची प्रतिष्ठा पणाला  लागली आहे.

मलवडी - ग्रामपंचायत निवडणुकीची रंगत वाढू लागली असून माणच्या पश्‍चिम भागाचा बालेकिल्ला शाबूत राखण्यात आमदार जयकुमार गोरे यांना यश येणार की, शेखर गोरे या बालेकिल्ल्यावर वर्चस्व मिळवणार, याकडे तालुक्‍याचे लक्ष लागले आहे. त्यातूनच स्थानिक कार्यकर्त्यांपेक्षा नेतेमंडळींची प्रतिष्ठा पणाला  लागली आहे.

माणच्या पश्‍चिम भागातील महत्त्वपूर्ण अशा आंधळी गटातील मलवडी व आंधळीसह परकंदी, कासारवाडी या चारही ग्रामपंचायतींवर काँग्रेसचे एकतर्फी वर्चस्व आहे. मात्र, नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत राष्ट्रवादीने आंधळी गटासह आंधळी व मलवडी गणांवर निर्विवाद वर्चस्व मिळवले होते. परकंदीचा अपवाद वगळता सर्व गावांमध्ये राष्ट्रवादीला मोठे मताधिक्‍य मिळाले होते. मागील दहा वर्षे आंधळी गटासह या ग्रामपंचायतींवर वर्चस्व असणाऱ्या काँग्रेसला हा मोठा धक्का होता. जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत आलेले अपयश पुसून टाकण्यासाठी आमदार गोरे यांनी कंबर कसली आहे, तर यशाची पुनरावृत्ती करण्यासाठी शेखर गोरे प्रयत्नशील आहेत.

सध्या मलवडी व आंधळीत काँग्रेस, राष्ट्रवादी व अपक्ष अशी तिरंगी लढत होत आहे. मलवडीत सरपंचपदासाठी काँग्रेसचे संतोष मगर, राष्ट्रवादीचे विकास मगर व पंचायत समिती निवडणूक काँग्रेसकडून लढविलेले परंतु पराभूत झालेले दादासाहेब जगदाळे हे अपक्ष म्हणून नशीब आजमावत आहेत. आंधळीमध्ये काँग्रेसकडून माजी जिल्हा परिषद सदस्या व माजी सरपंच मिनाक्षी काळे, राष्ट्रवादीकडून लता काळे व अपक्ष म्हणून अलमास नदाफ हे सरपंचपदाचे दावेदार आहेत. परकंदीत काँग्रेस व राष्ट्रवादीत बंडखोरी झाली असून तेथे चौरंगी लढत होत आहे. काँग्रेसचे बाळासाहेब कदम, राष्ट्रवादीचे बाळासाहेब इंगळे, जालिंदर माने व सदाशिव पिंगळे (अपक्ष) अशी लढत रंगणार आहे. कासारवाडी येथे काँग्रेसचे कालिदास सस्ते, राष्ट्रवादीचे सचिन सस्ते व अपक्ष दत्तात्रय कदम असा सामना रंगेल.

‘पॅनेल टू पॅनेल’ मतदान होणार का?
प्रमुख उमेदवारांसह अपक्षांनीही प्रचाराचा प्रारंभ दणक्‍यात केला असून आमदार गोरे व शेखर गोरे यांनी कार्यकर्त्यांना चार्ज केले आहे. विजयाचा आत्मविश्वास सर्वजणच व्यक्त करत असले तरी थेट सरपंच निवडणुकीमुळे ‘पॅनेल टू पॅनेल’ मतदान होईल, याची खात्री कोणीही देत नाही. पक्षापेक्षा उमेदवाराकडे बघून मतदान होण्याची शक्‍यता असल्यामुळे नेतेमंडळींची चांगलीच कसरत होणार आहे.

Web Title: satara news grampanchayat election