सुरक्षेसाठी डोक्‍याला ‘कव्हर’ वापरावे - संदीप पाटील

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 15 जुलै 2017

सातारा - दहा- पंधरा हजारांच्या मोबाईलला कव्हर घालण्याची काळजी आपण घेतले. मात्र, अनमोल अशा जीवनासाठी हजाराच्या हेल्मेटचा विचार करत नाही. आपल्या सुरक्षेसाठी नागरिकांनी डोक्‍याला कव्हर अवश्‍य वापरावे, असे आवाहन पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांनी केले.

सातारा - दहा- पंधरा हजारांच्या मोबाईलला कव्हर घालण्याची काळजी आपण घेतले. मात्र, अनमोल अशा जीवनासाठी हजाराच्या हेल्मेटचा विचार करत नाही. आपल्या सुरक्षेसाठी नागरिकांनी डोक्‍याला कव्हर अवश्‍य वापरावे, असे आवाहन पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांनी केले.

सातारा जिल्हा पोलिस को- ऑपरेटिव्ह सोसायटीच्या वतीने आज सर्व सभासदांना हेल्मेट वाटप करण्याच्या समारंभात ते बोलत होते. पोलिस सोसायटीने केलेला हा उपक्रम राज्यात आदर्श असल्याचे त्यांनी या वेळी सांगितले. या वेळी उपअधीक्षक (मुख्यालय) अंबरुषी फडतरे, उपअधीक्षक खंडेराव धरणे, शहर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक नारायण सारंगकर, तालुका पोलिस ठाण्याचे निरीक्षक नाळे, शाहूपुरी पोलिस ठाण्याचे निरीक्षक किशोर धुमाळ, बेंद्रे, सोसायटीचे अध्यक्ष शेखर कडव, उपाध्यक्ष किसन कारंडे यांची प्रमुख उपस्थिती होती. कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक विश्‍वास नांगरे-पाटील यांनी महामार्गावर व वाहनांचा वेग जास्त असलेल्या ठिकाणी हेल्मेट सक्ती करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाच्या अंमलबजावणीत पोलिस पुढे असावेत, यासाठी पोलिस सोसायटीच्या वतीने पोलिस सभासदांना हेल्मेट वाटपाचा निर्णय घेतला. सोसायटीच्या वतीने तब्बल दोन हजार ५९६ पोलिस सभासदांना हेल्मेटचे वाटप करण्यात येत आहे. या वाटपाचा प्रातिनिधिक कार्यक्रम आज पोलिस करमणूक केंद्रात पार पडला.

या वेळी बोलताना श्री. पाटील म्हणाले, ‘‘भौतिक वस्तूंच्या सुरक्षेची आपण काळजी घेतो. मात्र, आपल्या जिवाच्या रक्षणात हलगर्जीपणा करतो. डोक्‍याला मार लागून बहुतांश अपघाती मृत्यू होत असल्याचे अनेकदा स्पष्ट झाले आहे. त्यामुळे आपल्या कुटुंबाची काळजी करून प्रत्येकाने हेल्मेटरूपी कव्हर आपल्या डोक्‍याला घातलेच पाहिजे. 

कायद्याची अंमलबजावणी करताना पोलिसांनी आधी तो पाळला पाहिजे. आता पोलिस सोसायटीने सर्वांना हेल्मेट दिले आहे. त्यामुळे कोणतेही कारण चालणार नाही.’’ दुचाकीवर असताना प्रत्येक कर्मचाऱ्याच्या डोक्‍यावर हेल्मेट दिसले पाहिजे. अन्यथा कारवाई केली जाईल असा इशाराही त्यांनी दिला. पोलिस सोसायटीने घेतलेल्या उपक्रमाचे कौतुक त्यांनी केले. राज्यात अशा प्रकारचा पहिलाच उपक्रम घेतल्याबद्दल त्यांनी पदाधिकारी व संचालकांचे अभिनंदन केले. सोसायटीच्या सचिव अर्चना कानेटकर यांनी सूत्रसंचालन केले. ज्येष्ठ संचालक जोतिराम बर्गे यांनी आभार मानले.