स्वाईन फ्लू रोखण्यासाठी आरोग्य यंत्रणा सतर्क

स्वाईन फ्लू रोखण्यासाठी आरोग्य यंत्रणा सतर्क

जिल्हा रुग्णालयात सहा जणांवर उपचार सुरू; प्रशासनाच्या उपाययोजनांना नागरिकांची साथ हवी

सातारा - गेल्या काही दिवसांत जिल्हा रुग्णालयात स्वाईन फ्लूच्या रुग्णांमध्ये काही प्रमाणात वाढ झाली आहे. सध्या स्वाईन फ्लूची बाधा झालेल्या सहा रुग्णांवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. जिल्ह्यातील विविध भागांतील हे रुग्ण असल्यामुळे आरोग्य यंत्रणाही सतर्क झाली आहे. उपचाराच्या सुविधांबरोबरच प्रबोधानाचे कामही सुरू करण्यात आले आहे. प्रशासनाच्या या उपाययोजनांना नागरिकांनी साथ दिली तरच साथीच्या फैलावाला रोखता येणे शक्‍य आहे.

स्वाईन फ्लूची लक्षणे
याची लक्षणे नेहमीच्या फ्लू सारखीच सर्दी, खोकला, घसा खवखवणे, ताप, अंगदुखी अशी असतात. फार थोड्या रुग्णांना जुलाब व उलट्यांचाही त्रास होतो. रुग्णाला अशी लक्षणे साधारण तीन ते पाच दिवस दिसून येतात. विषाणू शरीरात शिरल्यापासून लक्षणे प्रकट व्हायला एक ते सात दिवसांचा कालावधी आहे.

...असा रोखता येईल प्रसार
शिंकताना, खोकताना नाका-तोंडाला रूमाल लावावा. हात सातत्याने साबणाने धुवावेत. घर व कार्यालयात वापराच्या वस्तू वारंवार स्वच्छ कराव्यात.

सार्वजनिक ठिकाणी थुंकू नये. पारंपरिक पद्धतीने नमस्कार करावा. 
गर्दीत जाणे टाळावे. सर्दी, खोकला, ताप असणाऱ्यांनी घराबाहेर पडू नये. भरपूर पाणी प्यावे. आहारात फळे, हिरव्या पालेभाज्या, मोड आलेल्या धान्यांचा समावेश असावा. साबण किंवा राखेने किमान वीस सेकंद हात धुवावेत.

शाळा, कॉलेजात दक्षता गरजेची
शाळेमध्ये विद्यार्थ्यांची नियमित आरोग्य तपासणी करावी.
सर्दी, ताप, खोकला अशी लक्षणे दिसल्यास संबंधित पालकांशी संपर्क साधावा. स्वच्छता, हात धुणे याबाबत विद्यार्थ्यांना नेहमी मार्गदर्शन करावे.
शालेय परिसर, शौचालये, मुताऱ्या आदींची नियमित स्वच्छता करावी. विद्यार्थ्यांची नखे नियमित कापावीत. विद्यार्थ्यांमध्ये स्वाईन फ्लू आढळल्यास शाळेला काही दिवस सुटी द्यावी. विद्यार्थ्यांना बेंच पुसून स्वच्छ करण्यास सांगावेत. स्वच्छ सुती कापडाचा रूमाल वापरण्याबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावे.

घरच्या घरी उपचार नकोत
रुग्णाने लक्षणे आढळल्यास त्वरित नजीकच्या तपासणी केंद्रात जाऊन तपासणी करावी. प्राथमिक टप्प्यात आजार बरा करणे सोपे असते. त्यामुळे घरच्या घरी उपचार करण्याचा प्रयत्न करू नयेत. तीन दिवसांच्या आत वैद्यकीय अधिकाऱ्याचा सल्ला घ्यावा. संशयिताने एन- ९५ प्रकारचा मास्क सातत्याने वापरावा, नऊ तासांनी तो बदलावा. वापरलेला मास्क इतरत्र फेकू नये. सार्वजनिक ठिकाणी जाऊ नये. टॉमी फ्लू गोळीचा पूर्ण डोस घेणे आवश्‍यक आहे.

उपचार कुठे? 
स्वाईन फ्लूच्या उपचारासाठी जिल्हा रुग्णालयामध्ये स्वतंत्र कक्ष स्थापन करण्यात आला आहे. त्यामध्ये तज्ज्ञ डॉक्‍टर व परिचारिका रुग्णांच्या उपचारासाठी नेमण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर जिल्ह्यामध्ये ९२ ठिकाणी या आजाराच्या उपचाराची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामध्ये ७१ प्राथमिक आरोग्य केंद्रे, १५ ग्रामीण रुग्णालये, दोन उपजिल्हा रुग्णालये व पाच खासगी दवाखान्यांचा समावेश आहे. त्यामुळे जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्‍यात किमान दोन ते तीन ठिकाणी या आजारावर उपचार होतात.
 

‘पीएचसी’त समुपदेशन कक्ष
जिल्ह्यामध्ये स्वाइन फ्लू अधिक गतीने पसरण्याची भीती निर्माण झाली आहे. हा धोका टाळण्यासाठी नागरिकांना जागृत करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने जिल्ह्यातील ७१ प्राथमिक आरोग्य केंद्रांत स्वाइन फ्लू समुपदेशन कक्ष स्थापन केले आहेत. त्यात स्वाइन फ्लूविषयी माहिती दिली जात आहे. शिवाय, ताप, खोकला, सर्दी, घशातील खवखव, अशक्‍तपणा, जुलाब, उलट्या होणाऱ्या रुग्णांची नोंद करून ठेवली जात आहे. रुग्ण बरा झाला आहे का, याची वारंवार तपासणीही केली जात असल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप माने यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com