ग्रामीण रुग्णालयासाठी आलेला  निधी परत जाणार?

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 25 ऑगस्ट 2017

मल्हारपेठ - जागेअभावी मल्हारपेठ ग्रामीण रुग्णायाचा निधी परतीच्या मार्गावर आहे. गेल्या पाच वर्षांपासून सहा कोटींचा निधी पडून आहे. बाजारपेठेतील मूळच्या प्राथमिक आरोग्य केंद्रालगतच जागा मिळत नसल्याने ग्रामीण रुग्णालय सुरू होण्यात अडचण निर्माण झाली आहे.

मल्हारपेठ व परिसरासाठी पुढील दहा-वीस वर्षांच्या कालखंडासाठी अत्याधुनिक सेवांनी सुसज्ज अशा शासकीय ग्रामीण रुग्णालयाची गरज आहे. त्याचा विचार करून या रुग्णालयाला मंजुरी देताना सहा कोटींचा निधीही मंजूर करण्यात आला आहे. 

वैद्यकीय अधिकाऱ्यांवर ताण
मल्हारपेठ आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. शिकलगार यांच्या चांगल्या सेवेमुळे गरीब कुटुंबातील रुग्णांसाठी हे केंद्र वरदान ठरले आहे. मात्र, प्रशिक्षण, अतिरिक्त चार्ज किंवा अन्य कारणांसाठी त्यांना सातत्याने बाहेरगावी पाठवले जाते. मल्हारपेठसाठी त्यांची कायमस्वरूपी नेमणूक करण्याची मागणी ग्रामसभेतही करण्यात आली. तरीही परिस्थितीत बदल झालेला नाही. सध्या या केंद्राचा चार्ज महिला वैद्यकीय अधिकाऱ्यांकडे आहे. डॉ. शिकलगार हे प्रशिक्षणासाठी बाहेर आहेत. त्यामुळे येथील आरोग्य यंत्रणेवर ताण पडताना दिसतो.

वर्षापासून रुग्णवाहिका नादुरुस्त
आरोग्य केंद्राच्या रुणवाहिकेचा अपघात झाल्यामुळे अपघातग्रस्त गाडीची गेल्या वर्षभरापासून दुरुस्ती सुरू आहे. त्यामुळे वर्षभरापासून रुणवाहिकेविनाच कारभार चालू आहे. रुग्णांना खासगी गाडीचा आधार घ्यावा लागत आहे. आठवडा बाजारादिवशी रुग्णांना वाहतूक कोंडीतूनच मार्ग काढत केंद्रात यावे लागते. मुख्य बाजापेठेतच हे केंद्र असल्याने सतत या मार्गावर वाहतुकीची समस्या भेडसावते. त्यातच एखादा रुग्ण आठवडा बाजारादिवशी अत्यवस्थ असेल तर त्यास पुढील उपचारासाठी हलवताना अनेक समस्या निर्माण होतात. 

शासकीय जागाही उपलब्ध
ग्रामीण रुग्णालयासाठी जवळपास तीन एकर क्षेत्राची गरज असते. मात्र, जागेअभावी मल्हारपेठ प्राथमिक आरोग्य केंद्राच्या शेजारी फक्त तीन गुंठेही जागा उपलब्ध होत नसल्याने ग्रामीण रुग्णालयाचे काम पडून आहे. ग्रामीण रुग्णालय व कर्मचारी निवास, पार्किंग इत्यादीची गरज पाहता नवीन जागा उपलब्ध होण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे. बेलदार वस्तीलगत वन विभागाचा परिसर येतो. मल्हारपेठ पोलिस चौकीसमोर सार्वजनिक बांधकाम विभागाचीही जागा पडून आहे. या जागांबाबतही पाठपुरावा होण्याची आवश्‍यकता आहे.

भविष्यकाळाचा विचार करता मल्हारपेठसाठी ग्रामीण रुग्णालय होणे गरजेचे आहे. सद्य:स्थितीत मूळच्या ठिकाणी फक्त तीन गुंठे जागा आवश्‍यक आहे. ती उपलब्ध झाली तरी हा प्रश्न मिटेल. 
- डॉ. श्रीकांत भोई, जिल्हा शल्यचिकित्सक, सातारा

जागेसाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. आरोग्य केंद्राला लागूनच तीन गुंठे जागा उपलब्ध होण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. स्थानिक पातळीवर चर्चा चालू आहे. लवकरच मार्ग निघेल.
- सूर्यकांत पानस्कर, उपसरपंच, मल्हारपेठ