सामान्य रुग्ण वाऱ्यावर सोडून संशयितांना "व्हीआयपी' उपचार 

गुरुवार, 21 सप्टेंबर 2017

एक ना अनेक गैरसोयी... 
- वैद्यकीय अधिकारी ड्युटीतही आरामात 
- सायंकाळच्या ओपीडीला सेवा मिळत नाही 
- रक्त विघटन करणारी यंत्रणा अद्यापही बंदच 
- सिटी स्कॅनच्या सुविधेवर मार्ग नाही 
- औषधांचा कायमचा तुटवडा 
- आर्थोपेडिक विभागात शस्त्रक्रिया कमीच 
- स्वच्छतेचे तीन-तेरा वाजलेत 

सातारा - जिल्हा शासकीय रुग्णालयातील गैरसोयींमुळे सर्वसामान्य नागरिकाला अडचणींचा सामना करावा लागत आहे. रुग्णांसह त्यांच्या नातेवाईकांना आर्थिक भुर्दंड पडतोय. त्याबरोबर संशयितांना दिल्या जाणाऱ्या "व्हीआयपी' उपचाराचा मुद्दाही पुन्हा ऐरणीवर आला आहे. या रुग्णालयाच्या सुधारणेसाठी संघटना आंदोलनात उतरल्या तरीही, कारभारात फरक का पडत नाही, हा प्रश्‍न आहे. 

गेल्या दीड वर्षापासून जिल्हा रुग्णालयाचा कारभार दिवसेंदिवस ढासळत चालला आहे. कायाकल्प योजनेत प्रथम क्रमांकावर असलेला जिल्हा तळाच्या क्रमांकावर गेला. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्रीकांत भोई यांनी पदभार स्वीकारण्यापूर्वीचे जिल्हा रुग्णालय आणि सध्याचे रुग्णालय यात मोठी तफावत पडत चालली आहे. वैद्यकीय अधिकारी वेळेवर बाह्यरुग्ण विभागात उपस्थित राहत नाहीत. सायंकाळच्या ओपीडीच्या वेळी वैद्यकीय अधिकाऱ्यांबरोबर तंत्रज्ञांची सेवाही मिळत नाही. सिटी स्कॅनच्या सुविधेवर मार्ग निघालेला नाही. रक्त विघटन करणारी यंत्रणा सुरू झालेली नाही. औषधांचा तुटवडा भासत आहे. आर्थोपेडिक विभागाच्या पुरेशा शस्त्रक्रिया होत नाहीत. स्वच्छतेचे तीन-तेरा वाजलेत... अशा सर्व परिस्थितीत जिल्हा रुग्णालयाचा कारभार चालला आहे. जिल्हा शल्यचिकित्सक कोणतीही ठोस कारवाईची भूमिका घेत नाहीत. मार्ग काढत नाहीत, असाच कर्मचाऱ्यांपासून वैद्यकीय अधिकाऱ्यांचा सूर आहे. त्यामुळे काम करणाऱ्याला त्रास आणि निवांत फिरणाऱ्यांना आराम अशी रुग्णालयाची स्थिती झाली आहे. 

जिल्हा रुग्णालयातील त्रुटी अनेकदा समोर येवूनही जिल्हाधिकाऱ्यांनीही या प्रश्‍नामध्ये लक्ष घातलेले दिसत नाही. भाजपच्या कार्यकर्त्यांनाही काही सोयरसुतक दिसत नाही. पालकमंत्र्यांची केवळ बोलाचीच कढी झाली आहे. जिल्हा रुग्णालयाच्या या गचाळ कारभाराविरूद्ध नुकतीच राष्ट्रवादी महिला आघाडीने निदर्शने केली. रुग्णालयातील समस्यांवर तातडीने मार्ग काढण्याची मागणी त्यांनी केली आहे. आता जिल्ह्यातील सर्वांत मोठ्या पक्षाच्या महिला आघाडीने आवाज उठवून तरी मार्ग निघतो का, याबाबत उत्सुकता आहे. 

रुग्णालयातील गैरसोयींच्या मुद्यावर मार्ग निघत नसताना संशयितांना "व्हीआयपी' उपचार दिले जात असल्याचा आरोप वारंवार होत आहे. मध्यंतरी खंडाळा तालुक्‍यातील शेतकऱ्यांच्या फसवणुकीच्या गुन्ह्यातील संशयितास व्हीआयपी सेवा दिल्याचा आरोप फिर्यादींनी केला होता. आवश्‍यकता नसताना न्यायालयीन कोठडी मिळाल्यानंतर रुग्णालयात दाखल करून घेतले जात असल्याचे त्यांचे म्हणणे होते. आताही खटाव येथील खरीप निधी घोटाळ्यातील संशयितांना व्हीआयपी सेवा दिली जात असल्याचा आरोप जनता क्रांती दलाने केला आहे. सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या पैशात गैरव्यवहार करणाऱ्यांना अशी सेवा दिली जात असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. हे प्रकार बंद न केल्यास रुग्णालयाला टाळे ठोकण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. या सर्व प्रकारांमुळे रुग्णालयाच्या प्रतिमेला तडा जात आहे. याचा रुग्णालय व्यवस्थापनाने गांभीर्याने विचार करणे आवश्‍यक आहे.

Web Title: satara news hospital patient