देशभूमीच्या रक्षणासाठी २४५ जवानांचे प्राणार्पण

Hutatma-Din
Hutatma-Din

सातारा - छत्रपती शिवरायांच्या स्वराज्य स्थापनेमध्ये साताऱ्याच्या भूमीतील मावळ्यांनी रक्‍ताचा अभिषेक केला. तोच सातारा पुढे ‘क्रांतिवीरांचा जिल्हा’, ‘स्वातंत्र्यसैनिकांची पंढरी’ म्हणून ओळखला जाऊ लागला. आजही देशभूमीच्या रक्षणासाठी सातारा जिल्ह्यातील हजारो जवान छातीची ढाल करत आहेत. स्वातंत्र्यानंतर विविध युद्ध, मोहिमांत तब्बल २४५ जवानांनी प्राण अर्पण केले आहेत. त्यामध्ये तीन अधिकारीही अतिरेक्‍यांशी लढताना हुतात्मा झाले. 

महात्मा गांधी आणि क्रांतिवीरांच्या या दोन्हीही मार्गावर स्वातंत्र्यासाठी लढणारे जवान या जिल्ह्याने देशास दिले आहेत. म्हणून ‘स्वातंत्र्यसैनिकांची पंढरी’ अशी ओळख साताऱ्याची पूर्वीपासून आहे. स्वातंत्र्यापूर्वी १९४१ ते १९४८ या कालावधीत विविध मोहिमांत जिल्ह्यातील सात जणांनी आपले बलिदान दिले आहे. तोच वारसा स्वातंत्र्यानंतरही जिल्ह्याने अविरत सुरू ठेवला आहे. भारत व चीन १९६२ च्या युद्धात २१, भारत व पाक १९६५ च्या युद्धात ५९, नागा होस्टालिटी मोहिमेत आठ, भारत व पाक १९७१ च्या युद्धात ६९, ऑपरेशन फॉल्कॉनमध्ये एक, ऑपरेशन ऑर्चिडमध्ये दोन, ऑपरेशन रिनोमध्ये एक, ऑपरेशन पवनमध्ये ११, ऑपरेशन मेघदूतमध्ये ११, ऑपरेशन विजयमध्ये पाच, ऑपरेशन पराक्रममध्ये पाच, ऑपरेशन रक्षकमध्ये ५२ असे जिल्ह्यातील २४५ जवान हुतात्मा झाले आहेत, अशी माहिती जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी राजेंद्र जाधव यांनी दिली. 

‘नापाकां’ना धडक प्रत्युत्तर
ऑपरेशन मेघदूत हे युद्ध जगातील सर्वांत उंच ठिकाण असलेल्या सियाचिन ग्लेशियर येथे झाले होते. त्यात जिल्ह्यातील ११ जवान हुतात्मा झाले आहेत. ‘नापाक’ कारवायांना ठासून काढण्यासाठी सैन्य दलाने विविध मोहिमा राबविल्या असून, त्यात वेळोवेळी जवानांनी बेधडक प्रत्युत्तर दिले आहे. ऑपरेशन रक्षकमध्ये तर जिल्ह्यातील ५२ जवान देशाच्या कामी आले. तालुकानिहाय हुतात्मा जवान असे : सातारा ८७, जावळी चार, कऱ्हाड २६, खंडाळा आठ, खटाव ३५, कोरेगाव २९, माण ११, पाटण २३, फलटण आठ, वाई १४.

कीर्ती चक्र, शौर्यपदकाने सन्मान
युद्ध, मोहिमांत पराक्रम केल्यानंतर त्यांना विविध चक्र, पदकांद्वारे सन्मानित केले जाते. वडगाव हवेली (ता. कऱ्हाड) येथील हुतात्मा शिवाजी जगताप यांना मरणोत्तर कीर्ती चक्र, तर पोगरवाडी (ता. सातारा) येथील कर्नल संतोष महाडिक यांना शौर्यपदक मिळाले आहे. जगताप यांनी १६ अतिरेक्‍यांना, तर कर्नल महाडिक यांनी अनेक दहशतवाद्यांना कंठस्नान घातले होते. मेजर अरविंद थोरात, कॅप्टन गोपाळ ढाणे हेही हुतात्मा झाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com