साताराः सणासुदीला वाढले चोरीचे प्रमाण; पोलिस मात्र सुस्त

साताराः सणासुदीला वाढले चोरीचे प्रमाण; पोलिस मात्र सुस्त

कऱ्हाड (सातारा): शहरासह तालुक्यात अवघ्या पंधरा दिवसात दोन दरोडे, महिनाभरात झालेल्या जबरी चोऱ्या, सणासुदीला परगावी गेलेल्या चाकरमन्यांच्या बंद घरे फोडून लंपास झालेला ऐवज, सणाला महिलांच्या गळ्यातील धुम स्टाईलने दागिने लंपास करणाऱ्या टोळ्यांचे वाढलेले प्रताप अशी स्थिती असताना पोलिस मात्र सुस्त आहेत. वडगाव हवेलीचा दरोड्याचा तपास वगळता एकाही चोरीची तपासाची तड लावण्यात यश आलेले नाही.

मागील महिन्यात मुंढे येथे झालेली सोळा लाखांची चोरी, त्यानंतर विद्यानगर भागात झालेल्या घरफोड्या, मलकापूरच्या शास्रीनगर भागातील बंद घरात झालेल्या चोऱ्या तपासावर आहेत. ती स्थिती असताना वडगाव हवेली येथे हवेत गोळीबार करून दरोडा टाकून पेट्रोल पंप लुटीची घटना घडली. सुदैवाने त्यातील संशयीत पोलिसांच्या ताब्यात सापडले. त्या पाच जणांच्या टोळीत परप्रांतीय व स्थानिकांचा सहभाग दिसून आला. त्याच्या तपासाचे आव्हान असतानाच आठवडा भराच्या कालवधीत घोगाव येथे चोरट्यांनी धुडगूस घातला. त्यात एकास बेदम मारहाण झाली. त्याच्या तपासाचा काहीच पत्ता नाही. त्या घटनेला आठवडाही उलटत नाही, तोपर्यंत कऱ्हाड शहरातील मध्यवस्तीतील फायनान्स कंपनीच कार्यालय फोडून चोरट्यांनी सात लाखांचा एवज लंपसा केला. एका पाठोपाट एक घटना घडत असताना पोलिसांना त्यावर नियंत्रण ठेवण्यात साफ अपयश आल्याचे दिसते आहे. या मोठ्या चोरीच्या घटनांवर नियंत्रण तर नाहीच त्यात महिलांच्या गळ्यातील सोने लंपास करणारी धुम टोळी पुन्हा डोकेवर काढत आहे. सणासुदीला कपाटात ठेवलेले दागिने महिला घालण्यासाटी बाहेर काढत आहेत. तेच दागिने बाजारात गेले की धुम टोळी लंपास करत आहे. मलकापूरात या घटना विशेष करून घडल्या आहेत. तेथे चोरी केली की पळून जाण्यास हायवे सोपस्कर रस्ता असल्याने त्या भागात महिनाभरात सरासरी चार घटना घडत आहेत. पोलिस पट्रोलींग ठेवत असूनही त्यावर नियंत्रण मिळवताना त्यांना तारेवरची कसरत करावी लागत आहे.

महिनाभरात झालेल्या चोऱ्या व त्याच्या तपासाचा आलेख पोलिसांची कार्यक्षमताच स्पष्ट करणारा आहे. शहारात भरवस्तीत बुधवार पेठेतील अपार्टमेंट मधील बंद घर फोडून मध्यंतरी चोरट्यांनी सात लाखांचा मुद्देमाल लंपास केला. त्यामुळे पोलिसांनी चोऱ्यांच्या नियंत्रणासाठी  अजूनही गंभीर होण्याची गरज दिसते आहे. गणेशोत्सवात बंदोबस्तात असलेल्या पोलिसांना चकवा देत होणाऱ्या चोऱ्यांचे तपास पोलिसांना आव्हान ठरत आहे. सणासुदीला कायदा व सुव्यवस्था टिकावी म्हणून पोलिस त्यावर भल देत असतानाच त्याच काळात होणाऱ्या चोऱ्या त्यांच्यासाठी डोकेदुखी ठरत आहेत. पोलिसांच्या कामाचा अभ्यास करून चोरटे हात सफाई करत आहेत, असे म्हणण्यास वाव आहे. येथे नोकरी निमित्त स्थायिक असलेल्या विशेष करून उपनगरात राहणाऱ्या चाकरमन्यांची घरे चोरट्यांनी लक्ष बनवली आहेत. त्यावरही लक्ष ठेवून त्याच्या नियंत्रणासाठी काय करता येईल, याचा विचार करून त्यासाठीचा आराखडा होण्याची गरज आहे.

पोलिसांनी अनेक ठिकाणी रात्रीची नाकाबंदी ठेवली आहे. त्यासह अनेक ठिकाणी गस्त घातली जाते. मात्र त्या गस्तीच्यै वेळा वाढवणे गरजेचे आहे. बहुतांशी वेळा पोलिस गस्त घालून गेले की, चोरटे तेथील दुकान फोडून ऐवज लंपास करत आहेत. त्यचाही विचार पोलिसांनी करण्याची गरज आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com