स्पेशल प्रोटेक्‍शन फोर्सचा प्रस्ताव धूळ खात

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 25 मे 2017

फोर्सअभावी वन्यजीव विभागासमोर अडचणी; मंजुरीसाठी शासनाच्या हालचाली नाहीत

फोर्सअभावी वन्यजीव विभागासमोर अडचणी; मंजुरीसाठी शासनाच्या हालचाली नाहीत

कऱ्हाड - चांदोली व कोयनेच्या जंगलात साकारलेल्या सह्याद्री व्याघ्र प्रकल्पासाठी स्पेशल टायगर प्रोटेक्‍शन फोर्स द्यावा, असा प्रस्ताव व्याघ्र प्रकल्पाच्या येथील कार्यालयाने पाठवला आहे. दोन वर्षांपासून स्पेशल प्रोटेक्‍शन फोर्सची मागणी आहे, तरीही शासनाने त्याकडे दुर्लक्ष केले आहे. स्पेशल टायगर प्रोटेक्‍शन फोर्सबाबत माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनाही लेखी कळवले आहे. मात्र, शासनाकडून अद्यापही कोणतीच हालचाल नाही. स्पेशल प्रोटेक्‍शन फोर्स उपलब्ध नसल्याने येथे वन्यजीव विभागाला अनेक अडचणींशी सामना करावा लागत आहे.  

व्याघ्र प्रकल्पाच्या कोअर झोनमध्ये श्वापदांच्या शिकारीसह वृक्षतोडीसाठी चोरट्या वाटेने जंगलात आलेल्या सुमारे पंचवीसपेक्षाही जास्त लोकांना वर्षभरात वन खात्याने अटक केली आहे. वन्यजीव विभागाच्या इन्फ्रारेड कॅमेऱ्यावरून काहींना पकडले आहे. वास्तविक राज्यातील बहुतांशी व्याघ्र प्रकल्पासाठी स्पेशल टायगर प्रोटेक्‍शन फोर्स आहे. मात्र, सह्याद्री व्याघ्र प्रकल्पासाठी अद्याप ते पथक दिलेले नाही. त्यामुळे व्याघ्र प्रकल्पात शिकारी बिनधास्त फिरतात. वन्यजीव विभागाने फोर्स देण्याचा मागणीचा प्रस्ताव दिला आहे. मात्र, तो अद्यापही शासनाकडे धूळखात पडला आहे.

सातारा, सांगली, कोल्हापूर व रत्नागिरी जिल्ह्यांचा सीमावर्ती भागात साकारलेल्या व्याघ्र प्रकल्पात स्पेशल टायगर प्रोटेक्‍शन फोर्सची उणीव भासत आहे. या फोर्समध्ये शंभर शस्त्रधारी गार्ड व दोन अधिकाऱ्यांची स्वतंत्र नियुक्ती असते. त्यांना अद्ययावत प्रशिक्षण देऊन वाघांचे संरक्षणाठी त्यांच्या नियुक्‍त्या केलेल्या असतात. कोकण किनारपट्टीवरील चोरट्या वाटांवरून शिकारी बिनधास्त व्याघ्र प्रकल्पात फिरत असतात. वर्षभरात किमान २५ लोकांना विविध शिकार व प्रकल्पाच्या बंदी असलेल्या कोअर झोनमध्ये शस्त्रासह अटक झाली आहे. मध्य प्रदेशातील फासकी शिकारीही त्यात अटकेत आहेत. वेगवेगळ्या घटना व्याघ्र प्रकल्पाचा चार जिल्ह्यांतील विविध भागात घडत आहे.

...यासाठी हवा प्रोटेक्‍शन फोर्स 
प्रकल्पात येणाऱ्या चोरट्या वाटांवर गस्त घालून शिकारींना पकडणे
व्याघ्र प्रकल्पाचा बफर झोनमध्ये २४ तास गस्त घालणे 
परप्रांतीय शस्त्रधारी शिकाऱ्यांना रोखण्यासाठी फोर्स महत्त्वाचा 
वाघासह अन्य श्वापदांच्या संवर्धनासाठी फोर्सचे संरक्षण अत्यंत महत्त्वाचे