थकीत वीजबिलामुळे शेरेमध्ये पिण्याच्या पाण्याची भीषण टंचाई

अमोल जाधव
मंगळवार, 19 सप्टेंबर 2017

गेली दोन दिवस लोकांना पाणीटंचाईच्या संकटाला तोंड द्यावे लागत आहे. पाण्यासाठी ग्रामपंचायतीने पर्यायी टॅंकरची व्यवस्था केलेली नाही. त्यामुळे महिलांसह ग्रामस्थांना खाजगी कूपनलिका किंवा थेट नदीतील पाण्याचा उपसा करावा लागत आहे.

रेठरे बुद्रुक (ता. कऱ्हाड, जि. सातारा) : तालुक्यातील शेरे येथे पाणीपुरवठा करणाऱया योजनेतील विद्युत मोटारीचे वीज कनेक्शन थकीत वीजबिलापोटी कंपनीने तोडल्यामुळे गेल्या दोन दिवसांपासून गावासह वस्तींवरील भागात पिण्याच्या पाण्याची भीषण टंचाई निर्माण झाली आहे. 13 लाख 60 हजार 495 रुपये इतके थकीत वीज बील असलेने कंपनीने ही कारवाई केली असून, सध्या पाण्यासाठी लोकांची सर्वत्र भटकंती सुरू आहे.

गावासह कॅनाॅल वस्ती, नवीन गावठाण, शेरे स्टेशन, संजयनगर, कोलेखिंड या भागात पाणीटंचाई निर्माण झाली आहे. अशावेळी ग्रामपंचायतीने पाण्यासाठी टॅंकरची सोय केली नसल्याने महिलांसह ग्रामस्थांमध्ये संताप आहे. सुमारे सात ते आठ हजार लोकसंख्या असलेल्या या गावास जवळच्या कृष्णा नदीतून पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होतो. हे गाव शेरे स्टेशन, संजयनगर तसेच आजूबाजूच्या मळ्यांमध्ये विस्तारले आहे.

ग्रामपंचायतीने उपशासाठी असलेल्या मोटारीचे वीजबील वारंवार थकीत ठेवल्याने थकीत वीजबिलाचा आकडा 14 लाखापर्यंत पोहचला आहे. हे बील कमी करण्याचा अथवा पूर्णतः निरंक करण्याचा मनसुबा विद्यमान सत्ताधाऱयांकडे नसल्याने कनेक्शन खंडीत झाल्याची नामुष्की ग्रामपंचायतीवर ओढवली आहे. गेली दोन दिवस लोकांना पाणीटंचाईच्या संकटाला तोंड द्यावे लागत आहे. पाण्यासाठी ग्रामपंचायतीने पर्यायी टॅंकरची व्यवस्था केलेली नाही. त्यामुळे महिलांसह ग्रामस्थांना खाजगी कूपनलिका किंवा थेट नदीतील पाण्याचा उपसा करावा लागत आहे. शेरे स्टेशन व संजयनगर येथील ग्रामस्थांना रेल्वे मार्ग तसेच शेणोली ते कऱहाड हा राष्ट्रीय मार्ग ओलांडून पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. हे काम जोखमीचे ठरत असल्याने सर्वत्र संतापाचे वातावरण पसरले आहे. याबाबत सरपंच प्रदिप गावडे यांच्याकडे विचारणा करण्यास त्यांच्या भ्रमणध्वनीवर संपर्क साधला असता, ते नाॅट रिचेबल आहेत.

वीज कंपनीच्या शेणोली शाखेचे शाखा अभियंता आर. वाय. धर्मे म्हणाले, शेरे ग्रामपंचायतीच्या पाणी उपसा करणाऱया विद्युत मोटारीचे 31 आॅगस्टअखेर 13 लाख 60 हजार 495 रुपये वीज बील थकीत आहे. गेल्या मार्च महिन्यात थकीत बिलापोटी ग्रामपंचायतीने एक लाख रुपये रक्कम भरली आहे. त्यानंतर आमच्याकडून वारंवार मागणी करुनही वीजबिल भरण्यास नकार राहिला आहे. आमचे कर्मचारी वीजबील सवलतीची परिपत्रकेदेखील वेळोवेळी ग्रामपंचायतीकडे पोहचवत आहेत. तरीही याकडे दुर्लक्ष केले जाते. परिणामी शनिवारपासून मोटारीचा वीजप्रवाह खंडीत करण्यात आला आहे.

'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या :