विलासराव उंडाळकरांच्या सत्कारातून विधानसभेची साखरपेरणी

विलासराव उंडाळकरांच्या सत्कारातून विधानसभेची साखरपेरणी
विलासराव उंडाळकरांच्या सत्कारातून विधानसभेची साखरपेरणी

कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत फुंकले रणशिंग ः गर्दीतून रयत संघटनेची ताकद अधोरेखित

कऱ्हाड (सातारा): माजी मंत्री विलासराव पाटील-उंडाळकर यांच्या सत्काराचे नेटके नियोजन रयत संघटनेने केले. रयत संघटनेच्या माध्यमातुन उंडाळकरांच्या राजकीय व सामाजिक वाटचालीचा जीवनपट उलगडतानाच कऱ्हाड दक्षिणच्या राजकीय पटावरील कब्जा कायम राहण्यासाठी संघटनेची ताकद दाखवण्यातही कार्यक्रम पुरक ठरला. त्याचबरोबर रयत संघटनेचे कार्यकर्ते चार्ज करण्यात उंडाळकर गटाला यश आले असून, विधानसभेची साखरपेरणीही त्यामाध्यमातून झाली आहे. अजून घोडेमैदान लांब असले तरी त्याचे रणशिंग मात्र कालच्या कार्यक्रमातून फुंकले गेले आहे.

भारतीय स्वातंत्र्य चळवळीच्या १९४२च्या भारत छोडो आंदोलनाचा अमृत महोत्सव आणि माजी मंत्री विलासराव पाटील-उंडाळकर यांच्या राजकीय व सामाजिक वाटचालीचा सुवर्ण महोत्सवानिमीत्त त्यांचा सत्कार माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे व पत्रकार कुमार केतकर यांच्या अध्यक्षतेखाली झाला. उंडाळकरांनी स्थापन केलेल्या रयत संघटनेच्या पन्नासाव्या वर्षाचीही त्याला जोड देण्यात आली होती. रयत संघटनेच्या झेंड्याखाली एकत्र आलेल्या युवकांना एकत्र करुन अॅड. उदयसिंह पाटील यांनी या कार्यक्रमाचे नेटके नियोजन केले. कार्यक्रमास किती लोक येणार याकडे जिल्ह्याचे लक्ष लागून होते. मात्र, उंडाळकरांनी आजपर्यंत अनेकांना केलेली मदत, गावागावात केलेली विकास कामे याची जाण ठेवुन कार्यकर्ते व महिला भर दुपारच्या रणरणत्या उन्हातही मोठ्या संख्येने सत्कार कार्यक्रमासाठी उपस्थित राहिल्या.

उपस्थित लोकांची गर्दी पाहुन माजी खासदार जयवंतराव आवळे यांनी माझे मित्र उंडाळकर सातवेळा आमदार असतानाही काँग्रेस पक्षाने अन्याय करुन विधानसभा निवडणुकीत त्यांच्यावर अन्याय केला. तो अन्याय दूर झाला पाहिजे. या मतदार संघात त्यांना तोड नाही. ते वस्ताद आहेत. पुढील निवडणुकीत ते नक्कीच आमदार होतील, असे राजकीय सुतोवाच केले. त्यादरम्यान कार्यकर्त्यांनी टाळ्यांचा क़डकडाट करुन त्यांच्या वक्तव्याला चांगलीच दाद दिली. त्याचबरोबर त्यांनी अनेकांनी अनेक साखर कारखाने काढले. मात्र, काकांनी कार्यकर्ते निर्माण करण्याचा कारखाना काढला असून, त्यांनी आता काँग्रेसमध्ये यावे, सुशिलकुमार शिंदे साहेबांनी त्यांना हार घालून काँग्रेसमध्ये घ्यावे, असा शाब्दीक टोलाही त्यांनी मारला. त्यांच्या या वक्तव्यातुन उपस्थित जमलेल्या गर्दीला योग्य संदेश मिळाला. त्यामुळे त्यांनी टाळ्यांची दाद देवुन उंडाळकरांच्या नेतृत्वावरही पुन्हा एकदा शिक्कामोर्तब केले. त्यालाच दाद देत उंडाळकरांनीही मी अजुन थकलेलो नाही. कार्यकर्त्यांनो थोडे थांबा, परिस्थिती बदलणार आहे, अशा शब्दात विरोधकांवर शरसंधान साधून कार्यकर्त्यांना सुचक संदेश दिला.

भर उन्हातही गर्दी जमणे हीच विलास काकाची खासियत आहे. एक छदामही न घेता, सातवेळा या जनतेने मला निवडून दिले. हा मोठा विक्रम आहे असेही त्यांनी स्पष्ट करुन कार्यकर्त्यांची त्यांच्यावरील श्रध्दा आजही कायम असल्याचेच दाखवून दिले. एकुणच या सत्कार कार्यक्रमातुन कऱ्हाड दक्षिणच्या राजकीय पटावरील कब्जा कायम राहण्यासाठी उंडाळकर गटाने रयत संघटनेची काल ताकद दाखवली. त्याचबरोबर कार्यक्रमाच्या माध्यमातुन रय़त संघटनेचे कार्यकर्ते चार्ज करण्यात उंडाळकर गटाला यश आले. त्याव्दारे विधानसभेची साखरपेरणीही झाली असुन अजुन घोडेमैदान लांब असले तरी त्याचे रणशिंग मात्र कालच्या कार्यक्रमातून फुंकले गेले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com