कास परिसरात कचरा खपवून घेणार नाही - राजमाता कल्पनाराजे भोसले

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 7 जून 2017

सातारा - कास तलाव परिसरात मोठ्या प्रमाणात प्लॅस्टिक कचरा पडतोय. काही लोक परिसरात छोटा हॉटेल व्यवसाय करून चारितार्थ चालवता हे ठिक; परंतु कास तलावात कचरा जाणार नाही, याची जबाबदारीही त्यांची असेल. अन्यथा त्यांनी आपली दुकाने बंद करावीत, अशी स्पष्ट शब्दात राजमाता कल्पनाराजे भोसले कचरा करणाऱ्यांना खडे बोल सुनावले. पालिका मुख्याधिकाऱ्यांनी कासमध्ये कचरा होणार नाही, यासाठी योग्य बंदोबस्त करावा, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. 

कास तलावावर ओल्या- सुक्‍या पार्ट्या झडतात. तलावाच्या काठावर बाटल्या फोडल्या जातात. थर्माकोलच्या पत्रावळ्या, प्लॅस्टिकचे ग्लास, द्रोण, चहाचे कप, पिशव्या, खाद्यपदार्थांची वेस्टने आदी विघटन न होणाऱ्या कचऱ्याचा ढिग तलावालगतच्या झाडांमध्ये साठलेले आढळत आहेत. काही मंडळी तलावातच वाहने-भांडी धुतात. याबाबत ‘सकाळ’ने सोमवारच्या दैनिकांत अधिक प्रकाश टाकणारे वृत्त प्रसिद्ध केले आहे. हे वृत्त वाचून राजमाता व्याकूळ झाल्या. ‘सातारकरांच्या पिण्यासाठी या तलावातील पाण्याचा वापर होतो. त्यामुळे पिण्याच्या पाण्यातच लोक घाण कशी टाकतात,’ असा उद्धविग्न सवाल त्यांनी ‘सकाळ’शी बोलताना व्यक्त केला. 

‘लोक कासला पार्ट्या करण्यासाठी जातात आणि कचरा, घाण तेथेच टाकून येतात. पावसाळ्यात हा कचरा तलावात जाऊन मिसळतो. तलावालगत काही लोकांनी छोटी हॉटेल उभारली आहेत. त्यावर त्यांचा चरितार्थ चालत असल्याने त्यांचा सहानुभूतीपूर्वक विचार करता येईल; परंतु या लोकांनी तेथे काहीही करावे, असा त्याचा अर्थ नाही. या हॉटेलमधून घेतलेल्या साहित्याचा कचरा कास परिसरात पडतो आहे. त्यामुळे या कचऱ्याची जबाबदारी या व्यावसायिकांची आहे. कास परिसरात पडणारा कचरा उचलण्यासाठी पालिकेची उपलब्ध यंत्रणा पुरी पडणारी नाही. या व्यावसायिकांनी कचरा होणार नाही, याची जबाबदारी स्वीकारावी नाहीतर असे व्यवसाय बंद करावेत,’’ अशा कडक शब्दात राजमातांनी इशारा दिला. 

‘कास तलावात वाहने धुणे, परिसरात धिंगाणा घालणे, बाटल्या फोडणे, कचरा करणे असले प्रकार रोखण्यासाठी पालिका प्रशासनाने उपाययोजना करावी. प्रसंगी पोलिस दलाचे सहकार्य घ्यावे. याबाबत आपण मुख्याधिकाऱ्यांना सूचित केले आहे.’
- राजमाता कल्पनाराजे भोसले, सातारा