कासच्‍या स्वच्छतेसाठी सरसावले शेकडो हात

सातारा - ‘एकच ध्यास, स्वच्छ कास’ अशी साद घालताच रविवारी कास स्वच्छता मोहिमेस सातारकर नागरिक, विविध संघटना, संस्थांनी भरघोस प्रतिसाद दिला. अवघ्या दीड तासात दोनशे पोती कचरा स्वयंसेवकांनी गोळा केला.
सातारा - ‘एकच ध्यास, स्वच्छ कास’ अशी साद घालताच रविवारी कास स्वच्छता मोहिमेस सातारकर नागरिक, विविध संघटना, संस्थांनी भरघोस प्रतिसाद दिला. अवघ्या दीड तासात दोनशे पोती कचरा स्वयंसेवकांनी गोळा केला.

जागतिक निसर्ग वारसास्थळाचा दर्जा लाभलेल्या कास परिसरास लागलेले अस्वच्छतेचे ग्रहण दूर करण्यासाठी आज सातारकरांचे शेकडो हात सरसावले. परिसरातील पर्यावरणाची साखळी भक्कमपणे संवर्धित करण्यासाठी ‘सकाळ माध्यम समूहा’च्या वतीने ‘एकच ध्यास, स्वच्छ कास’ हे ब्रीदवाक्‍य घेऊन लोकसहभागातून कास परिसर स्वच्छ करण्याच्या आवाहनाला आज पहिल्याच रविवारी भरभरून प्रतिसाद मिळाला. विविध संस्था, संघटनांबरोबरच युवक, महिलांसह ज्येष्ठांनी कृतिशील सहभाग नोंदवत कास परिसर कचरामुक्त व प्लॅस्टिकमुक्त करण्याचा निर्धार केला. 

बोचऱ्या थंडीत पहाटेपासूनच कासच्या रस्त्याकडे गेल्या काही दिवसांपासून थंडीत पुन्हा वाढ झाली आहे. अशा बोचऱ्या थंडीतही लोक हळूहळू ‘सकाळ’ कार्यालयाच्या दारात जमू लागले. याठिकाणी कासला जाण्यासाठी बसची व्यवस्था होती. काहींनी स्वत:च्या खासगी वाहनांतून सकाळी सहा वाजताच कासचा रस्ता धरला होता. घोषणा देत पोवई नाक्‍यावरून प्रवाशांनी भरलेल्या दोन मिनी बस यवतेश्‍वरचा घाट चढू लागल्या. बसवर लावण्यात आलेले ‘कास बचाव’चे बॅनर वाचून सकाळी फिरण्यासाठी बाहेर पडलेले नागरिक व यवतेश्‍वरच्या घाटात धावण्याचा सराव करणारे धावपटू यांनी या बसमधील नागरिकांना कास स्वच्छतेसाठी हात उंचावून जाहीर शुभेच्छा दिल्या. 

बंगल्याजवळ जमू लागले स्वच्छतेचे सवंगडी
सकाळी सात वाजल्यापासूनच कासच्या डाक बंगल्याजवळ स्वच्छतेचे सवंगडी जमू लागले होते. मोहिमेच्या समन्वयकांनी आधीच कचरा गोळा करण्यासाठी पोती, जाड प्लॅस्टिकच्या काळ्या पिशव्या, हातमोजे आदी आवश्‍यक साहित्य गोळा करून ठेवले होते. श्रमदानासाठी आलेल्या कार्यकर्त्यांचा वयोगट लक्षात घेऊन कोणी कोठे श्रमदान करायचे, याचे वाटप करण्यात आले. राष्ट्रगीत झाल्यानंतर श्रमदानास सुरवात झाली. 

कचऱ्यामध्ये प्लॅस्टिकचे प्रमाण सर्वाधिक 
बरोबर आठ वाजता श्रमदानास मोठ्या उत्साहात सुरवात झाली. पाहता पाहता अडीचशे-तीनशे जणांचा जथ्था कासच्या खुरट्या, सदाहरित जंगलात विखुरला गेला. झाडा-झुडपांमध्ये, काटेरी जाळीतही कचरा विखरून पडला होता. या कचऱ्यामध्ये प्लॅस्टिकचे प्रमाण सर्वाधिक आढळले. नागरिकांनी हॅंडग्लोज घालून कचरा वेचला. प्लॅस्टिकचे कागद, बाटल्या व इतर साहित्य आणि काचेच्या बाटल्या असे कचऱ्याचे वर्गीकरण तो गोळा करतानाच करण्यात आले. 

श्रमदानात अनेकांचे योगदान
ढाणे क्‍लासेसचे ५० विद्यार्थी आजच्या श्रमदानात सहभागी झाले होते. याशिवाय विजयसिंह बर्गे, महेश भूतकर, वंदे मातरम्‌ ट्रेकर्स ग्रुप कोडोलीचे ॲड. पंकज पवार व सहकारी, ‘सकाळ’च्या ‘यिन’चे समन्वयक अभिजित बर्गे व त्यांचे २० सहकारी विद्यार्थी, विविध तनिष्का गटांच्या समन्वयक, मिलिंद खाडे, रोटरी क्‍लब सातारा कॅम्पचे अजित कदम व सहकारी, बिल्डर असोसिएशनचे किरण गेंगजे व सहकारी, रोहित जगदाळे, सह्याद्री ट्रेकिंगचे कैलास बागल व सहकारी, दीपलक्ष्मी ग्रुपचे अभिनंदन मोरे व सदस्य, फिटनेस स्पॉवी जिमचे हेमंत ताटे व सहकारी, टॉप गिअरचे शशिकांत पवार आदींनी श्रमदानात भाग घेतला. 

तरुण पिढीमध्ये श्रमदानाबद्दल कुतूहल 
नागरिकांमध्ये विशेषत: तरुण पिढीमध्ये श्रमदानाबद्दल कुतूहल जाणवले. कोणताही दंगाधोपा न करता युवकांनी शांतपणे कामावर लक्ष केंद्रित केले होते. शिस्तबद्धपणे कचरा गोळा करण्यात आला. युवकांनी रांगा लावून कचऱ्याची पोती वाहून नेली. ही पोती कास बंगल्यासमोर ठेवण्यात येत होती. बघता बघता या पोत्यांचा ढिगच्या ढीग गोळा झाला. सुमारे दोन तासांच्या श्रमदानानंतर आजच्या दिवसाचे काम थांबविण्यात आले. 

पाहावे तेथे आढळली दारूची रिकामी बाटली 
प्लॅस्टिकच्या पाण्याच्या व इतर बाटल्या, खाद्यपदार्थांचे वेस्टन, कॅरिबॅग्ज, थर्माकोलचे ताट-वाट्या, ग्लास, चहा व पाण्याचे ग्लास, डायपर, कंडोम, चॉकलेटचे कागद, सिगारेटची पाकिटे, तुटक्‍या चपला- सॅंडल आदी साहित्याचा कचऱ्यात समावेश आहे. दारूच्या रिकाम्या बाटल्यांचा खच पडला होता. पाहावे तेथे दारूची रिकामी बाटली आढळत होती. काही ठिकाणी या बाटल्या फोडल्याने काचांचे दुकडे विखुरलेले होते. संयोजकांनी टोक वाकवलेल्या सळ्यांची व्यवस्था केल्याने झाडा- झुडपातून, अडचणीतून कचरा ओढून काढणे सोपे जात होते.

मोहिमेसाठी धावले तरुण
आजच्या श्रमदानात विविध वयोगटांतील लोकांचा सहभाग मिळाला. चार वर्षांच्या ‘एका पाटील’ नावाच्या मुलीपासून सुमारे ७० वर्षांच्या जुलेखा बागवान या ज्येष्ठ नागरिकापर्यंत लोकांनी श्रमदानात हिरिरीने सहभाग घेतला. सदरबझारमधील डॉ. दीपक निकम या तरुणाने साताऱ्यातून ३१ किलोमीटर अंतर धावत पार करून कास स्वच्छतेच्या मोहिमेस शुभेच्छा दिल्या. त्यांनी सकाळी बरोबर साडेचार वाजता पुष्कर मंगल कार्यालयापासून धावण्यास सुरवात केली. बरोबर आठ वाजता ते कासमध्ये पोचले. त्यांच्या चेहऱ्यावर कोठेही थकवा अथवा धावून आल्यानंतरचा शीण जाणवत नव्हता. डॉ. निकम या तरुणाचे वय आहे ५९ वर्षे ! येथील स्पंदन फाउंडेशनचे पंकज नागोरी या मॅरेथॉनपटूने सांबरवाडी ते कास हे सुमारे २२ किलोमीटरचे अंतर धावून पूर्ण केले. त्यानंतर त्यांनी श्रमदानही केले. 

शुभेच्छा देण्यासाठी विशेष उपस्थिती 
वन विभागाचे उपवनसंरक्षक अनिल अंजनकर, मेढ्याचे वनक्षेत्रपाल सचिन डोंबाळे, प्रदूषण नियंत्रण मंडळाचे उपविभागीय अधिकारी बाबासाहेब कुकडे, नगरपालिकेच्या नगराध्यक्षा माधवी कदम, कर्तव्य सोशल ग्रुपच्या संस्थापिका वेदांतिकाराजे भोसले, मुख्याधिकारी शंकर गोरे, बांधकाम सभापती मनोज शेंडे, आरोग्य सभापती यशोधन नारकर, पाणीपुरवठा सभापती श्रीकांत आंबेकर, माजी पाणीपुरवठा सभापती सुहास राजेशिर्के, माजी नगरसेविका स्नेहल राजेशिर्के, पक्षप्रतोद निशांत पाटील, गटनेत्या स्मिता घाडके, नगरसेविका सुजाता राजेमहाडिक, स्नेहा नलावडे, सविता फाळके, भाजपच्या नगरसेविका प्राची शहाणे, धनंजय जांभळे, ज्ञानेश्‍वर फरांदे, कास पठार कार्यकारी समितीच्या अध्यक्षा विमल शिंगरे, सोमनाथ जाधव, व्यावसायिक महेश कोकीळ आदी प्रमुख उपस्थित होते.  

विशेष योगदान देणाऱ्या व्यक्ती, संस्था
श्रमदानासाठी सातारा-कास-सातारा अशा प्रवासाकरिता रवींद्र सासवडे यांनी दोन बसचा आर्थिक भार उचलला होता. कन्हैयालाल राजपुरोहित व स्पंदन ग्रुप सातारातर्फे ११ कचराकुंड्या यवतेश्‍वर ते कास रस्त्यावर, गरजेच्या ठिकाणी बसविण्यात आल्या. श्री. राजपुरोहित यांनी श्रमदानासाठी आवश्‍यक हत्यारे व इतर गरजेचे साहित्य मोफत पुरविले. जीवन मेडिकलच्या शिवाजी काटकर यांनी प्रथमोपचार पेटी दिली. कास पठार कार्यकारी समितीने बैठक व्यवस्था तसेच श्रमदान करणाऱ्यांसाठी रिफ्रेशमेंटची व्यवस्था केली होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com